"फडणवीसांनी दिलेल्या व्हिडिओतील प्रत्येक शब्द खरा!"

तेजस मोरे यांचा मोठा गौप्यस्फोट

    13-Mar-2022
Total Views |

Tejas More
 
 
 
मुंबई : "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेल्या व्हिडिओमध्ये मी उपस्थित असून त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.", असा खुलासा तेजस मोरे यांच्याकडून रविवारी करण्यात आला. तेजस मोरे यांनी दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यातून स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी केला होता. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना तेजस मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
 
"माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब मी इंग्रजीत टाईप त्यांना करून देत होतो; तेही ते सांगतील अगदी त्या पद्धतीने. इतर अनेक खटल्यांप्रमाणे गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाबही मी नोंद केले आहेत. परंतु प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांच्या मदतीने भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे रचण्यात आले, त्यानंतर मी प्रविण चव्हाण यांच्यापासून दूर होत गेलो.", असा गौप्यस्फोट तेजस मोरे यांनी केला आहे. काहीही करुन गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
"प्रविण चव्हाण हे गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे यांना सांगत होते. सध्या मला प्रविण चव्हाण हे खोट्या गुन्ह्यात अडकवतील याची भीती आहे. त्यामुळे लवकरच मी माध्यमांसमोर येणार आहे.", असेही ते पुढे म्हणाले.