‘तिच्या’ सांगण्यासारख्या आणि न सांगण्यासारख्या गोष्टी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2022   
Total Views |

depression
 
 
 
नुकताच साजरा झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपवाद वगळून काही महिलांच्या जगण्याचा वा मरण्याचाही विचार करायलाच हवा. त्यांच्या अशा जगण्यात किंवा मरण्यात चूक कोण, बरोबर कोण, हा प्रश्नच नाही. हे कसे थांबेल? हे कधी बदलेल याबद्दलची आस्था आहे. दररोजचे प्रसंग, घटना आहेत. त्या घटना घडतात. शहाणा समाज विसरूनही जातो. पण ती? तिचे काय? तिच्या सांगण्यासारख्या आणि न सांगण्यासारख्याही गोष्टी माणूस म्हणून समजून घ्यायलाच हव्यात...
 
 
 
महिन्याच्या सुरुवातीला न चुकता तो त्याच्या आईला घेऊन बँकेत जायचा. इतरवेळी जुनेर्‍यात असलेली ती आई त्या दिवशी ठेवणीच्या साडीत दिसायची. केव्हातरी कळले की, बँकेतून ‘पेन्शन’ काढायला तो आईला न्यायचा. पैसे काढले की, तिची रवानगी पुन्हा त्या वापरात नसलेल्या खोलीत. काही ठिकाणी अशा पेन्शनधारी आयांची रवानगी अंगणातच किंवा पथपथावर.अशा एक-दोघा महिलांच्या मुलांना विचारले की, “असे का?” तर त्यांचे म्हणणे, “म्हातारी कटकट करते. आता या वयात पैसे ठेवून तिला काय करायचे आहे? तिची दवादारू तर मीच करतो ना?” कदाचित असेलही असे, पण म्हणून तिची रवानगी अशी नकोशा जागेत? आईकडचे होते नव्हते, ते सर्व घेऊन तिला रस्त्यावर आणलेले मूल आणि मुलींसुद्धा मी पाहिलेल्या. एका ठिकाणी आईला मारण्यापर्यंत गोष्ट गेली. तेव्हा त्या आईला ‘पोलिसात तक्रार करू का,’ विचारले,तर तिचे म्हणणे, “मुलगा कसाही असला तरी त्याला पोलीस स्टेशनची पायरी चढवली, तर लोक म्हातारपणी तोंडात शेण घालतील आणि तो तुरूंगात गेला, तर मला अन्न गोड लागणार आहे का?” या सत्य घटना आहेत आणि मुंबई, पुण्यासारख्या शहरांत राजरोसपणे घडणार्‍या घटना. जागतिक महिला दिनी स्त्रीशक्तीचा गौरव करताना या आयाबाया माझ्यासमोर येतातच येतात. रडगाणे गाऊ नये किंवा सारखे काय ‘नाही रे’ आणि निराशात्मक बोलायचे? लिहायचे? जगात चांगलेही आहेच, त्याबद्दल लिहावे, असे मलाही वाटते. पण, तरीही मातृशक्तीची ही परिस्थिती चिंतनीय आहे.
 
 
 
दुसरीकडे रेशनकार्ड किंवा सरकारी कागदपत्रात घरच्या सूनबाईंचे नाव न नोंदवणे यासुद्धा घटना घडत असतात. कारण काय? तर तिने तिचा कसलाही हक्क सासरी मागू नये, म्हणून किंवा तिने स्वत:ला मालकीण समजू नये म्हणून. दुर्दैवाने अशा महिलेच्या पतीचे निधन झाले की, तिची परिस्थिती शब्दातीत करूण होते. असो. मुलगा नाकर्ता असेल, व्यसनी असेल, गुन्हेगार असेल, दुर्गुणी असेल, तर त्याला सुधारायचे कसे? तर त्याचे लग्न करून देणे. दोन पोर पदरात पडली की, पोरगा सुधारणार ही समाजाची थेअरी. ही ‘थेअरी’ आजही किती मुलीबाळींचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेली, हे देवच जाणो! योग्य सर्वेक्षण केले, तर दिसेल की, १०० मधील चार-पाच मुलं सुधारत असतील. सुधरू न शकलेल्या मुलांच्या त्या निष्पाप पत्नींचे काय? या सगळ्या परिप्रेक्षात घटस्फोटित, विधवा किंवा अविवाहित महिलांच्या आयुष्यात काय घडत असेल? एकट्या महिलेने या समाजात जगणे गुन्हा आहे का? असा प्रश्न पडावा असेच अनुभव या भगिनींना येतात. या तीनही वर्गवारीतल्या महिलांसंदर्भात ठरावीक विधानं असतात. ‘घटस्फोट घेतला म्हणजे नवर्‍याने नांदवली नाही, म्हणजेच ती वाईटच असणार’ तसेच ‘नवरा मेला, विधवा झाली म्हणजे काही तरी घडलेच असेल. त्याशिवाय काय नवरा आधी वर गेला?’ अविवाहित महिला असेल, तर विधान ठरलेले, ‘तिच्याशी कोणी लग्नंच केलं नाही, बिचारी किंवा तिचं कुठेतरी लफडं असेल म्हणून तिने लग्न केले नाही. आता म्हातारपणी तिचं कसं होणार वगैरे वगैरे.’ पण,सर्वांत दुःखद आणि संतापजनक हे असते की, एकटी महिला पुरुषाशिवाय कशी राहत असेल? पुरुषाशिवाय म्हणजे तिच्या लैंगिक इच्छा कशा पूर्ण होत असतील? यावर कपोकल्पित कथा रचल्या जातात. जागतिक महिला दिनानिमित्त या परिस्थितीने किंवा स्वेच्छेने एकट्या राहणार्‍या (म्हणजे त्यांच्यासोबत पती नसतो) या महिलांचा संघर्ष जाणून घेतला, तर कळेल की, जावे तिच्या वंशा...
 
 
 
जल्लोषात महिला दिन साजरा करताना मी कितीही दुर्लक्ष केले, तरी काहीजणी माझ्या डोळ्यांसमोर येतात. वर्ष २०१६, सप्टेंबर महिना होता. अचानक माझ्या ओळखीची ‘ती’ महिला समोरून आली. म्हणाली, “तुम्ही ‘सोशल वर्क’ करता. माझ्या मुलाला वाचवा. त्याला क्षयरोग झाला आहे शेवटच्या पातळीचा.” तिच्याशी बोलताना मला तिची मुलगी आठवत होती. मला ती दररोज रेल्वेस्थानकावर भेटायची. सात-आठ वर्षांची चुणचुणीत आणि हसमुख. तिच्या गुजरातीमिश्रित मराठीमध्ये ती शाळेत काय झाले इथपासून तिला मोठेपणी कोण बनायचे आहे, असे सगळे न चुकता दररोज सांगे. दोन-तीन वर्षे हे सगळे सुरूच राहिले. त्यानंतर सहा वर्षांनी तिची आई भेटली. तिला विचारले, “तुझी मुलगी कशी आहे?” यावर ती गप्प उभी राहिली. इतक्यात, तिच्या पाठीमागे लपलेली अशक्त हाडाची काडं झालेली, एक मुलगी धापा टाकत पुढे आली. ती अतिशय प्रयत्नपूर्वक हसत गळ्यात पडणारच होती. पण, तिने स्वत:ला चटकन सावरले. ही कोण? मी क्षणभर विचारात पडले. इतक्यात, ती मुलगी क्षीण आवाजात म्हणाली, “मांसी मैं आपकी दोस्त.”
 
 
 
क्षयरोगाच्या खुणा तिच्या पूर्ण शरीरावर,हालचालीवर दिसत होत्या. बोलतानाच काय हसतानाही तिला दम लागत होता. अविश्वासाने मी त्या महिलेला विचारले की, “तू तर मुलगा आजारी आहे म्हणत होतीस?” यावर ती महिला म्हणाली, ”हो, खरेच मुलगा आजारी आहे आणि हीसुद्धा आजारीआहे.” मी विचारले, “तू हीसुद्धा आजारी आहे, हे का नाही सांगितलेस? यावर तिचे म्हणणे ”हे बघा, मदत करताना कुणीही एकाचवेळी दोन पोरांना मदत करेल का? म्हणून पोराबद्दलच सांगितलेे. तो वाचला, तर सगळं टिकेल आणि या मुलीला क्षयरोग झाल्याचे हिच्या काका लोकांनासुद्धा आम्ही सांगितले नाही. बरी झाली तरी तिचे लग्न होणार नाही. आता तुम्हाला माहिती झाले आहे, तर कुणाला सांगू नका. पाया पडते मुलाला वाचवा.” संताप आणि दुःख या दोन्ही भावनांना आवरत मी म्हणाले, “ठीक आहे.” मुलाबरोबरच मुलीलाही शिवडीच्या दवाखान्यात आपल्यासोबत नेऊया. दुसर्‍या दिवशी आम्ही शिवडी क्षय रुग्णालयात गेलो. सहा वर्षांपूर्वीची ती हसरी खेळकर मुलगी. आज मलूल होऊन पडली होती. शिवडी क्षय रुग्णालयातले सेवाभावी डॉ. ललित आनंदे यांनी युद्ध पातळीवर दोन्ही मुलांची तपासणी केली. उपचार सुरू केले. पण, त्या रात्रीच क्षयरोगामुळे माझी ती चिमुकली मैत्रीण वारली. आजही हे सगळे आठवताना मला तिचे हसणे, ‘मै बडी बनके क्या बनू मांसी’ हे विचारणे आठवते. २०१६ साली एका मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय कुटुंबात एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू क्षयरोगाने आणि मुलगी आहे म्हणून उपचार करण्यात हलगर्जीपणा केला म्हणून झाला होता. त्यावेळी तिच्या आईला मी भयंकर शिव्याशाप दिल्या. ती अश्रू ढाळत मला इतकेच म्हणाली, ”मैं क्या करती? तिला ‘टीबी’ झाला हे माहिती पडले असते, तर आमच्या जातीत तिचे लग्न होणे मुश्किल होते. मी पण आई आहे. माझी मुलगी गेली,”असेच काहीसे २०१४ सालीही मी ऐकले होते.
 
 
 
‘वस्त्यांचे वास्तव’ सदर लिहिताना एका वस्तीमध्ये गेले होते. रस्ते बनवणार्‍या कंत्राटी कामगारांची वस्ती. सगळे कर्नाटकमध्ाून आलेले. गरिबीची छाया त्या वस्तीवर. पुरुष मंडळी विड्याकाड्या ओढत बसलेली. काही कुटुंबांना भेटले. त्या बहुसंख्य कुटुंबांमध्ये पुरुष ५०च्या पुढचे, तर त्यांच्या बायका २० ते २२ वयाच्या आणि त्यांची मुलं-मुली वयवर्षे ४ ते २५ वर्षांची. बहुतेक घरी हेच. असे कसे शक्य आहे? २० वर्षांच्या महिलेला २५ वर्षांची मुलं? खूप खोदून विचारल्यावर कळले होते की, या वस्तीतले पुरुष फिरते काम करतात. आज इथे, तर उद्या तिथे. त्यामुळे त्यांनी कुटुंब गावालाच ठेवलेली. अधूनमधून हे पुरुष देहविक्री होणार्‍या वस्तीत जायचे. तिथे त्यांना ‘एड्स’ झाला. पुढे सेवाशुश्रूषेसाठी त्यांनी आपल्या पत्नींना मुंबईत आणले. पण, काही वर्षांनी पत्नीलाही ‘एड्स’ने गाठले. मग दोघांचा उपचार करणे कठीणच जायचे. त्यामुळे उपचारासाठी घराबाहेर पडायचे ते पुरुषांनीच! तो वाचला, तर सगळे वाचेल. त्यामुळे घरच्या बाईने जगायचे की कर्त्या पुरुषाने, असा प्रश्न पडायच्या आधीच उत्तर तयार होते. आजारावरउपचार पुरुषांनीच घ्यायला हवेत. हेळसांड आणि दुर्लक्षामुळे पत्नीचे निधन झाले. तिच्या तेराव्यानंतर त्या पुरूषाला लगेचच गावाकडची १४-१५ वर्षांची पोर नवरी म्हणून मिळालीही. या वस्तीत अशी सात-आठ घरं होती. आजारी पडले, तर उपचार कुणावर करायचे? कुणी जगायचे? या प्रश्नाचे उत्तर आजही समाजात अत्यंत लिंगभेद दर्शवतो. पंतप्रधान मोदींनी महिलांच्या आरोग्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या. त्या योजनांचा उपयोग नक्कीच या महिलांसाठी उपयोगी ठरणार आहे, हेसुद्धा खरे आहे.
 
 
 
हे सगळे लिहिताना मला ‘ती’सुद्धा आठवते. अत्यंत सुंदर, पण आईबाबाविना पोरकी. मामासोबत राहणारी. १६ वर्षांची झाली तरी तिला मासिक पाळी आली नाही. त्यामुळे सगळेच हवालदिल झाले. पण, कालांतराने सगळे विसरून गेले. तिच्या सौंदर्यामुळे आणि अतिशय सालस मेहनती वृत्तीमुळे तिला लग्नासाठी स्थळं तर यायची, पण मुलीला मासिक पाळी येत नाही, समजल्यावर बोलणे पुढे सरकायचेच नाही. मुलीचे लग्न होणारच नाही, असे मामाला वाटायचे. अखेर २०१८ साली ती ३३ वर्षांची झाली. तिला एक स्थळ आले. ५६ वर्षांच्या विधुराचे. कसे का होईना लग्न होणार, यामुळे मामा आणि कुटुंबीयांच्या चेहर्‍यावर आनंद होता. सगळ्याच मुलींची लग्न होतात, आता आपलेही होणार, मामावर कायमचा भार राहणार नाही, म्हणून ‘ती’सुद्धा कधी नव्हे, ती खूप खूश होती. लग्न झाले आणि काही दिवसांत तिने फाशी लावून आत्महत्या केली. गोरीपान, नाजूक खळखळून हसणारी, आपल्याला पाळी येत नाही, त्यामुळे इतरांपेक्षा आपण वेगळ्या आहोत, या न्यूनगंडामुळे १५व्या वर्षानंतर घराच्या बाहेर पाऊलही न टाकलेली ती. या सगळ्या काळात मामाने या मुलीला अतिशय प्रेमाने वाढवलेले. वयाने वाढलेली, पण स्त्रीसुलभ लैंगिक भावनांचा परिचयच न झालेली ती. लग्नानंतर पाचव्या दिवशी ती माहेरी आली. त्यावेळी अभिनंदन केल्यावर आभाळभर हसली होती. मग तिने आत्महत्या का केली? काही दिवसांनी हळूहळू चर्चा होऊ लागली. नातेवाईक महिला आपसात कुजबूज करून चर्चा करू लागल्या. ”इतकी वयाने वाढली होती. पण, तिला नवरा-बायकोचे संबंध माहिती नव्हते. पळापळ, रडारड करायची. लाज वाटते म्हणून तिने गळफास घेतला. लग्न होणारच नव्हते तिचे, नवर्‍याने मोठ्या मनाने स्वीकारले, तर हिची अशी नाटकं. सगळ्याच मुलींना काय माहिती असतं का? लग्नानंतर कळतं सगळं. जरा सहन केले असते. हे सगळे नव्हते पाहिजे, तर लग्न का केले.” वगैरे वगैरे...
 
 
 
या आणि अशा कितीतरी जणी मला महिला, जागतिक महिना दिनाच्या अनुषंगाने आठवत असतात. कुणाचे प्रारब्ध किंवा जगणे बदलणे आपल्या हातात नाही. पण, या सगळ्या मुली-महिलांना कुणीतरी एकदा जरी समजून घेतले असते, तर स्त्री म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून तिला काय वाटते याचा विचार केला असता तर... मला अशाही कितीतरी महिला भेटतात की, ‘ज्यांना कशी आहेस? काय झालं?’ इतकी जरी विचारले, तरी त्यांना भरून येते. डोळ्यांतले अश्रू लपवत त्यांच्या ओठांवर छानसं हसू येतं. मला माहिती असते की, या हसण्यामागे आणि त्या लपवलेल्या अश्रूंमागे खूप काही असतं सांगण्यासारखं आणि न सांगण्यासारखंही... नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आशा व्यक्त करते की, जगभरातल्या सगळ्या महिलांकडे सांगण्यासारखं खूप काही आशादायक असावं आणि ते सांगण्याचे स्वातंत्र्य आणि भयमुक्त, निराशामुक्त संधी त्यांना मिळावी...
 
 
@@AUTHORINFO_V1@@