चीनचा मैत्री प्रस्ताव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2022   
Total Views |

Xi Jinpoin



 
 
काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, “भारत आणि चीनचे संबंध खूप कठीण परिस्थितीत आहेत.” त्यानंतर आता चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, “चीन आणि भारत एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही, तर एकमेकांचे सहभागी-सहयोगी असायला हवे. काही शक्ती चीन आणि भारतात विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात.”
 
 
आशिया खंडातच नव्हे, तर जगभरात आपणच शक्तीमान असल्याचा आव आणणार्‍या चीनने, भारताने सहयोगी असावे, प्रतिस्पर्धी बनू नये, हे म्हणणे म्हणजे ‘समझनेवालो को इशारा काफी हैं.’ चीन काय आहे, हे हाँगकाँग, तैवान, नेपाळ, श्रीलंका आणि गेला बाजार पाकिस्तानालाही चांगलेच माहिती आहे. आशिया सोडा, आफ्रिकन देशांमध्येही चीनने जुलमी विस्तारवादाचेटोकाचे पाऊल उचलले.
 
 
 
आधी मैत्री करार करायचा, नंतर त्या देशाला विकासाच्या नावाने आर्थिक मदत करायची. नंतर त्या देशाला असे कोंडीत पकडायचे की, तो देश चीनची आर्थिक मदतीची परतपेड कधीही करू शकत नाही. एकदा चीनला कळले की, एखादा देश पूर्णतः आपल्या कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे, तर मग त्या देशावर या ना त्या रूपाने कब्जा करायला चीन मागे-पुढे पाहत नाही. अर्थात, पूर्वी व्यापाराच्या नावाने इंग्रज इथे-तिथे जायचे आणि लबाडीने त्या त्या देशावर कब्जा करायचे. त्या स्वरुपाचा कब्जा चीन सरळ करत नाही, तर अंकित असलेल्या देशाचे आर्थिक संबंध, विदेशनीती, त्या देशाची विकासनीती यावर सरळ सरळ चीन हस्तक्षेप करतो.
 
 
 
याचाच अर्थ चीनने कर्ज देऊन गुलाम बनवलेल्या देशात तेच घडते जे चीनला अभिप्रेत असते. हे सगळे चीन आपले सत्तासाम्राज्य विस्तार वाढवण्यासाठी करतो, हे नक्कीच. आशिया खंडात चीनला सातत्याने भारताची भीती वाटत आली आहे. संस्कृती, इतिहास आणि लोकसंख्या या सगळ्यांमध्ये चीनला टक्कर देणारा देश म्हणजे भारत. जागतिक स्तरावर बलाढ्य देश म्हणून भारताची ओळख आहे.
 
 
 
तसेच, जागतिक स्तरावर चीनपेक्षा भारताची स्वीकार्हता जास्त आहे. त्यामुळे चीनला नेहमीच भारताबद्दल सुप्त असुया वाटत असते, तर चीनच्या आजवरच्या कारवायांमधून हे स्पष्ट झालेले आहे. नेहरू काळात चीनने ‘हिंदी चिनी, भाई भाई’ म्हणत कापलेला गळा भारतीय अजूनही विसरले नाहीत, तर कोरोनामुळे चीनला जगभरातून तिरस्कृत व्हावे लागले. वुहान येथील कोरोना हा चीनचे अपत्य आहे, असे आजही जगभरातील बहुसंख्य लोकांचे मत आहे.
 
 
थोडक्यात, जगभरात अतीपाताळयंत्री, विश्वासघातकी आणि स्वार्थी देश म्हणून चीनने आपली ओळख मिळवली आहे. त्यातच तैवान आणि हाँगकाँगमधील तणाव तर जगजाहीर. ‘भारत हा चीनचा प्रतिस्पर्धी नाही सहयोगी आहे,’ असे म्हणणार्‍या चीनने आणि त्यांच्या परदेशमंत्री वांग यी यांनी तर तैवान हा चीनचाच भाग आहे, असे विधानही नुकतेच केले. इतकेच नाही, तर तैवानला चीनकडे त्यांच्या मातृभूमीकडे परतावे लागेलच, असा इशाराही दिला. अशा या चीनने भारताला प्रतिस्पर्धी नाही, तर सहयोगी भूमिकेत या म्हणणे म्हणजे स्पष्ट आहे की, चीनने भारताचे सामर्थ्य ओळखले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात आपल्या भारताचेच नुकसान झाले.
 
 
 
पण, आज 50 वर्षांनंतर 2022 साली चीनला भारताच्या अरूणाचल येथील सीमेवर आपले सैन्य हटवावे लागले. तसेच, चीनच्या सैन्याचेही अपरिमित नुकसान झाले. कधी नव्हे ते चीनला जशास तसे नव्हे, तर सरस प्रतिकार भारताकडून केला गेला. त्यामुळे ईशान्य भारतात कुरापती काढणार्‍या चीनला, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या छोट्या, पण भारताचे शेजारी असलेल्या देशांना मदतीच्या नावाने चिथवणार्‍या चीनला भारताची ताकद कळली. दुसरीकडे जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून गणल्या गेलेल्या देशांमध्ये भारताची उंची वाढत होती.
 
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र संबंध वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परिणामकारक विदेशसंबंध रणनीतीचा वापर केला. त्यामुळेच धार्मिकतेच्या प्रमाणावर पारंपरिक शत्रुत्वाकडे झुकणारे काही अरब देशही भारताचे सखेसोबती झाले. साहजिकच जागतिक पटलावर शक्तीमान भारताचा उदय चीनला जाणवला. त्यामुळेच चीनला भारत आता प्रतिस्पर्धी नाही, तर सहयोगी म्हणून हवा आहे. अर्थातच, चीनची विश्वासघातकी इतिहास पाहता भारत चीनच्या या भूमिकेचाही सांगोपांग विचार करेल हे, नक्की!






@@AUTHORINFO_V1@@