‘ग्लोबल वॉर्मिंग’विरूद्ध ‘वन मॅन आर्मी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2022   
Total Views |

Limaye
 
 
‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमान वाढीची तीव्रता कमी करण्यासाठी जनजागृती करणारे ठाण्यातील ‘वन मॅन आर्मी’ प्रसाद विश्वनाथ लिमये यांच्याविषयी...
 
 
उच्चशिक्षणानंतर अनेकजण ‘मी भला अन् माझे करिअर भले’ असे सुखवस्तू जीवन जगतात. मात्र, संघ विचारांचा पगडा असलेले ठाण्यातील प्रसाद लिमये ही प्रभुती सामाजिक दायित्व ओळखून समाजसेवेसोबतच जागतिक तापमान वाढीच्या समस्येविरोधात अविरतपणे लढत आहे. दि. १८ एप्रिल, १९७१ रोजी पुणे येथे जन्मलेल्या प्रसाद यांचे बालपण रायगड जिल्ह्यातील खालापूर गावी गेले. त्यांच्या वडिलांची नोकरी जवळच खोपोली येथे होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी खालापूरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे पूर्ण केले. शालेय जीवनात इयत्ता दहावीपर्यंत प्रथम क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही, किंबहुना चौथी व सातवीच्या परिक्षेतील दोन्ही शिष्यवृत्तीही त्यांनी मिळवल्या. दहावीनंतर एस. पी. महाविद्यालय, पुणे येथून पदवी मिळवल्यांनतर त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’मध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यांना पॉवर/एनर्जी क्षेत्रामध्ये ३०पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि या क्षेत्रातील विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. ‘बीएसईएस लिमिटेड’, ‘रिलायन्स इन्फ्रा’, ‘वेस्टिंगहाऊस पॉवर’आणि ‘वॉटर सोल्युशन्स’ (इमर्सन पॉवर अ‍ॅण्ड वॉटर सोल्युशन्स), लॅन्को इन्फ्राटेक आणि पॉवर विभागासाठी हिंदुजा समूहासोबतही त्यांनी काम केले आहे.
 
 
 
देशात दहा हजार मेगावॅट ऊर्जानिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यातही त्यांचे योगदान असल्याचे प्रसाद आवर्जून सांगतात. १९९२ मध्ये डहाणू थर्मल पॉवर स्टेशनमधून (आताची अदानी इलेक्ट्रिसिटी) त्यांनी करिअरची सुरुवात केली आणि तेथे १४ वर्षे काम केले. साइटवर थेट सामील होण्यापूर्वी त्यांना एक वर्षाच्या कोर्ससाठी नागपूर येथे पाठवले होते. त्यानंतर डहाणू येथे सिव्हिल बांधकाम, उभारणी, कमिशनिंग आणि नंतर ‘ओ अ‍ॅण्ड एम’ अशा विविध क्षेत्रात काम केले. त्यानंतर २००६ मध्ये, ते वेस्टिंग हाऊस पॉवर अ‍ॅण्ड वॉटर सोल्युशन्स (इमर्सन पॉवर आणि वॉटर सोल्युशन्स) मध्ये सामील झाल्यानंतर तिथे अभियांत्रिकी, प्रस्ताव, व्यवसाय विकास, साइट एक्झिक्युशन इत्यादींसाठी उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया पॅसिफिक प्रकल्पांसाठी काम केले. सध्या ते ‘आयआयटी मुंबई’ येथे जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणार्‍या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ऑईल’, ‘गॅस आणि एनर्जी’येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. इथे ऊर्जा संक्रमण, प्रकल्प, कार्यशाळा, वेबिनार, कॉन्क्लेव्ह, उद्योगांसाठी प्रशिक्षण आणि औद्योगिक समस्या सोडवणे यांसारख्या विविध भूमिका बजावण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही मौलिक मार्गदर्शन करीत आहेत. याशिवाय जागतिक तापमान वाढीबाबत समाजात जनजागृती करण्याचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. याचाच परिपाक म्हणून दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर आणि विविध समाजमाध्यमांवर गेल्या दोन दशकांपासून त्यांचे जागतिक तापमान वाढीवरील व्याख्यान व चर्चासत्रांचे कार्यक्रम सुरूच आहेत.
 
 
 
२०१० सालापासून ठाण्यात वास्तव्यास आलेले प्रसाद हे समाजहितैषी आहेत. सामाजिक कार्यासोबतच त्यांना दैनंदिन घडामोडीवरील बातम्या, वर्तमानपत्रे वाचणे आणि गाण्यांचीही आवड आहे. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आजी जानकीबाई दातार यांच्याकडून मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. तसेच सिंधुताई सपकाळ ठाण्यात आल्या की त्यांच्याच घरी राहात असल्याचेही ते सांगतात. नि:स्पृह वृत्तीने दुसर्‍यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्यासाठी त्यांची नेहमीच तळमळ असते. याच तळमळीतून त्यांनी शिक्षण घेतलेल्या खालापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेच्या मदतीसाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन केले आणि या मोहिमेतून त्यांनी शाळेच्या पुर्ननिर्माणासाठी तब्बल २० लाखांचा निधी गोळा करून दिला. अर्थातच, त्यांच्या या कार्याची दखल विविध प्रसारमाध्यमांनीही घेतली होती. आपल्या कामाच्या व्यापातून सवड काढून त्यांना लेखनाचाही व्यासंग जडलेला आहे. या व्यासंगातून आजवर त्यांनी, ‘पथदर्शक’ (आजीच्या गोष्टी), ‘सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर’ तसेच, ‘जागतिक हवामान बदल समस्या आणि उपाययोजना’ ही तीन पुस्तकेही लिहिल्याचे ते सांगतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून नुकतेच त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या ’ठाणे गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भविष्यातील वाटचालीविषयी सांगताना प्रसाद यांनी, ‘एमबीए अप्लाइड फायनान्स, लीडरशिप आणि स्ट्रॅटेजी’चे शिक्षण सुरू असल्याचे सांगितले. जे पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. याशिवाय प्रदूषण रोखण्यासाठी घातक सवयी टाळणे गरजेचे असल्याचे ते सांगतात. युवा पिढीला संदेश देताना ते, वाचन, चिंतन, मनन व लेखनाची सवय अंगीकारून, सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्याचे आवाहन करतात. अशा या समाजसेवी ’वन मॅन आर्मी’ला भविष्यातील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@