
मुंबई : पालिकेच्या रुग्णालयात शिस्त पाळली जावी यासाठी सातत्याने प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही अनेकदा लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मंडळी रुग्णालयाच्या दैनंदिन कामांमध्ये हस्तक्षेप करत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे आता वैतागलेल्या डॉक्टरांनी आता लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती केली आहे.
केवळ मुंबईतच नव्हे तर संपुर्ण राजयभर अनेकदा लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारांना खुष करण्यासाठी त्यांच्या राजकीय बळाचा वापर करत वैद्यकीय प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचे काम केले जाते. अशा परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाची कोंडी झाल्याचे पहायला मिळते त्यामुळे आता प्रतिनिधींनी निदान रुग्णांना तरी मतदार म्हणून बघणं बंद करावे आणि रुग्णालय प्रशासनाला त्यांच काम मोकळेपणाने करू द्यावे अशी विनंती केली आहे.
दरम्यान, रुग्णालयाचे नियोजन, शिस्त, रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, रुग्णालय पुनर्विकासाचे प्रश्न, निवासी डॉक्टरांच्या अडचणी अशा अनेक प्रश्नांकडे रुग्णालय प्रशासनाला लढावे लागते. त्यामुळे छोट्या गोष्टींसाठी रुग्णालय प्रशासनाला कोंडीत पकडण्यापेक्षा रुग्णसेवेचा दर्जा उंचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी काम करावे असे आवाहन रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांनी केले आहे.