पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडांचा हैदोस!

    01-Mar-2022   
Total Views |

West Bengal
 
 
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे प्रकार होत आहेत, हे उघडच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका म्हणजे ‘लोकशाहीची थट्टा’ असल्याचे सांगून, या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या निषेधार्थ भाजपने १२ तासांच्या बंदची हाक दिली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसने भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
 
 
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांकडून विरोधकांवर हल्ले करण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर सुरू झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये काही खंड पडल्याचे दिसून येत नाही. पश्चिम बंगालमध्ये १०७ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या मतदानापूर्वीपासून तृणमूलच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत. पश्चिम बंगाल भाजपच्या माजी प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या कृष्णा भट्टाचार्य यांच्यावर तृणमूलच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. त्या स्वतः एका प्रभागामधून निवडणूक लढवीत आहेत. आपल्या स्कूटरवरून त्या घरी परतत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालची मुख्यमंत्री एक महिला असताना एका महिलेवर हल्ला झाल्याच्या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपचे अन्य एक उमेदवार शंतनू चौधरी यांना तृणमूलच्या गुंडांनी गेल्या शनिवारी जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहितीही मजुमदार यांनी दिली. त्यासंदर्भातील एक चित्रफितही मजुमदार यांनी प्रसृत केली.
 
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे प्रकार होत आहेत, हे उघडच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका म्हणजे ‘लोकशाहीची थट्टा’ असल्याचे सांगून, या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या निषेधार्थ भाजपने १२ तासांच्या बंदची हाक दिली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसने भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत ७६.५ टक्के मतदान झाले. १०८ पैकी १०७ नागरपालिकांसाठी मतदान झाले. एक नगरपालिका तृणमूल काँग्रेसने या आधीच बिनविरोध जिंकली आहे. राज्यातील निवडणूक हिंसाचार, मतदानाच्या वेळी घडलेले गैरप्रकार जाणून घेण्यासाठी राज्यपाल जगदीश धनखड यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांना पाचारण केले होते. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान राज्यात विविध ठिकाणी गैरप्रकार केल्याचे वृत्त आहे. या निवडणुकांचे निकाल काय लागतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
 
कुतुबमिनार परिसरातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी याचिका
 
राजधानी दिल्लीमध्ये असलेला कुतुबमिनारआणि त्याच्या परिसरामध्ये उभ्या असलेल्या इमारती या त्या भागात असलेली अनेक हिंदू आणि जैन मंदिरे पाडून आणि त्यांचे दगड वापरून उभारण्यात आल्याचे सर्वपरिचित आहे. तशा आशयाचे फलकही कुतुबमिनार परिसरात पाहावयास मिळतात. तेथील परिसराची पाहणी केली तरी त्यावरून मंदिरे उद्ध्वस्त करून तो परिसर उभारण्यात आल्याची कोणालाही कल्पना येते. ते सर्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी जी मंदिरे होती त्यांचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून,त्यावरील पुढील सुनावणी येत्या दि. ११ मे रोजी होणार आहे. या प्रकरणी संबंधित न्यायालयाने भारत सरकार, पुरातत्व खाते आणि अन्य संबंधितांना नोटिसा बजाविल्या आहेत.
 
आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने ११९८ मध्ये २७ हिंदू आणि जैन मंदिरांचा विध्वंस केला आणि त्यांचा वापर करून मशीद उभारली, असे संबंधित याचिकेत नमूद करण्यात आले आहे. भारताचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी आणि घटनेच्या ‘कलम २५’ आणि ‘२६’ ने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा जो हक्क दिला आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या मंदिरांची नासधूस करण्याबरोबरच त्या मंदिरातील मूर्तीची आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने विटंबना केली. ती २७ मंदिरे पुन्हा उभारण्यात यावीत आणि त्यामध्ये संबंधित देवतांची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
 
गेल्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भातील याचिका दिवाणी न्यायालयात करण्यात आली होती. पण, दिवाणी न्यायाधीश नेहा शर्मा यांनी ती फेटाळून लावली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पूजा तलवार यांच्या न्यायालयात याचिका करण्यात आली. ती दाखल करून घेण्यात आली. न्या. नेहा शर्मा यांनी याचिका फेटाळून लावताना, “भूतकाळात ज्या चुकीच्या घटना घडल्या त्या कोणी अमान्य करीत नाही. पण, भूतकाळातील त्या चुकीच्या घटना या वर्तमान आणि भविष्यकाळातील शांतता बिघडविण्यासाठी आधार ठरू शकत नाहीत,” असे नमूद केले होते. तसेच धार्मिक स्थळांसंदर्भात १९९१ साली करण्यात आलेल्या कायद्याचा आधार सदर याचिका फेटाळताना संबंधित न्यायालयाने घेतला. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतानाच्या काळात हा कायदा करण्यात आला होता. त्याद्वारे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी धार्मिक स्थळांची जी स्थिती होती ती ‘जैसे थे’ ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. ते सर्व लक्षात घेता, या याचिकेवर संबंधित न्यायालय काय निर्णय देते, त्याची प्रतीक्षा आहे.
 
आसाममध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या घटना
 
आसाममध्ये ख्रिस्ती मिशनरी सक्रिय असून, विविध आमिषे दाखवून गरीब, वनवासी जनतेचे धर्मांतर करण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. आसामची राजधानी दिसपूरपासून अवघ्या ३० किमी अंतरावरील वनवासी खेड्यांमध्ये अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे, उबदार कपडे यांचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत. त्या मिशनर्‍यांनी त्या भागातील तीन खेड्यांमधील १२८ वनवासी कुटुंबांचे अशी आमिषे दाखवून धर्मांतर केले. त्या तीन गावांमध्ये १३० कुटुंबे राहतात. त्यातील १२८ कुटुंबांना आमिषे दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले. ख्रिस्ती मिशनरी दुर्गम प्रदेशात राहणार्‍या या वनवासी बांधवांच्या संपर्कात कोरोना महामारीच्या काळात आले. त्यावेळी त्यांनी या वनवासींना काही मदतही देऊ केली. पण, त्यानंतर त्यांनी आपला नेहमीच धर्मांतराचा उद्योग सुरू केला. तीन खेड्यांमधील १३० पैकी १२८ कुटुंबे धर्मांतरित झाली. त्या गावात केवळ दोन हिंदू कुटुंबे राहिली होती. पण, नंतर त्यांनाही धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले. विविध प्रकारची प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार आसाममधील काही भागात सुरू असल्याकडे त्या राज्यातील हिंदू संघटनांनी लक्ष वेधले आहे. वैद्यकीय मदत, शिक्षणाची सुविधा आणि आर्थिक मदत अशी प्रलोभने दाखवून धर्मांतराच्या घटना घडत आहेत. वैष्णव समाजाचा प्रभाव असलेल्या माजुलीमध्ये आता चर्चची संख्या ६६ वर गेली आहे. ब्रिटिश गेले तरी ख्रिस्ती मिशनरी आसाम आणि भारताच्या विविध भागांमध्ये आपले हातपाय पसरत चालले आहेत हे अशा घटनांवरून दिसून येत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.