अमेया तू, अभेद्या तू...

    01-Mar-2022   
Total Views |

Ameya
 
 
प्रचंड आंतरिक सामर्थ्य असलेल्या अमेया जाधव यांना निहित संकल्पापेक्षा वेगळी वाट निवडावी लागली. तरीही जिथे असतील, त्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या अमेया यांच्या जीवनाचा मागोवा...
 
 
इयत्ता दुसरीला असताना खेळता खेळता अपघाताने अमेया यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. पुढे एक वर्ष तो हात गळ्यातच होता. मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. पण, लहानग्या अमेयाने हे सगळे सहज स्वीकारले. त्यावेळी तिचे आई-वडील प्रकाश आणि सुरेखा यांनी तिला सांगितले की, "छोट्या-मोठ्या दु:खांना, संकटांना तू अजिबात घाबरणारी नाहीस. तू सगळ्या संकटांशी मुकाबला करू शकतेस." त्यांचे हे उद्गार अमेया जाधव यांची प्रेरणा बनले. सध्या त्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इलेक्ट्रोनिक्स’ विभागात साहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच, गेली चार वर्षे मुंबई विद्यापीठात, संस्कृत विभागात डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अभ्यागत प्राध्यापिका म्हणूनही त्या कामही करतात. याबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा अनुभव दांडगाच. ‘जनसेवासमिती, विलेपार्ले’ या संस्थेत गेले २० वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच सात वर्षे त्यांनी पार्ल्याच्या ‘लोकमान्य सेवा संघा’ची युवा शाखा सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली. सध्या त्या ‘केशवसृष्टी’, भाईंदर कार्यकारिणी मंडळ सदस्या आणि ‘केशवसृष्टी सामाजिक युवा पुरस्कार’ निवड समिती सदस्य असून, ‘भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड’मध्ये त्या ‘इंडीपेडेंट डायरेक्टर’ म्हणूनही कार्यरत आहेत. ‘केशवसृष्टी’तर्फे ‘अक्षय सहयोग योजना’ राबवली जाते. या योजनेसाठीही अमेया यांनी पोटतिडकीने जबाबदारी सांभाळलेली.
 
 
त्यांच्या या समाजशील कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. २००० साली शाळेत असताना पार्ले टिळक विद्यालयाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार, अहिल्यादेवी महिला व्यासपीठातर्फे २०१५मध्ये ‘यशस्वी युवा महिला’ पुरस्काराने सन्मानित, गडकिल्ल्यांच्या छायाचित्रण प्रदर्शनात उत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार प्राप्त, तर २०१९ साली हिंदू अध्यात्मिक सेवातर्फे ‘विशेष महिला’ म्हणून सन्मानित करण्यात आले. दुर्गभ्रमंतीमध्ये विशेष रूची असलेल्या अमेया यांनी संपूर्ण भारतातील १९० किल्ल्यांना अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून भेटी दिल्या. तसेच, याविषयावर संशोधनात्मक लेखही लिहिले.
 
 
असो. अमेया यांच्यासंदर्भातले हे यश पाहिले की वाटते, नशिबाचा प्रचंड वरदहस्त अमेयावर असेल, त्यामुळेच तर शैक्षणिक, सामाजिक आणि इतरही स्तरावर त्या प्रगती करू शकल्या असतील. पण, सत्य वेगळे आहे. स्त्री म्हणून त्यांच्याही आयुष्यात ठरावीक चौकटी आहेतच, रूढी परंपरा आणि सामाजिक ठोकताळेही पाठीशी. पण, या साऱ्यां चा त्यांनी कधीही बाऊ केला नाही. ‘एक बाई म्हणून मला सोसावे लागले,’ असे रडगाणे त्या गात बसल्या नाहीत, तर खिलाडूपणे त्यांनी सर्वच स्तरावर स्वकष्टाने स्वत:चा ठसा उमटवला.
 
 
मुळच्या संगमेश्वरचे आणि त्यानंतर गिरगावात स्थायिक झालेले प्रकाश जाधव आणि सुरेखा जाधव हे दाम्पत्य. त्यांना दोन कन्यारत्न. त्यापैकी एक अमेया. उच्चशिक्षित मराठा कुटुंबात जे वातावरण असते, तेच अमेया यांच्या घरीही. गिरगावात प्रकाश इंजिनिअर तर सुरेखा बँकेत ‘सिनिअर फॉरेक्स मॅनेजर’ म्हणून काम करायच्या. मुलींनी ‘आत्मनिर्भर’ बनावे याकडे जाधव दाम्पत्यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळेच की काय, त्यांना क्रिकेटचीही आवड निर्माण झाली. पार्ल्याहून भल्या पहाटे त्या माटुंग्याला क्रिकेट प्रशिक्षण घ्यायला येत. क्रीडाक्षेत्रात लक्षणीय कामगिरी करायची. पण, शस्त्रक्रिया केलेला हात खेळताना दुखू लागला. डॉक्टरांनी सांगितले की, "क्रिकेट खेळताना, चेंडूफेक करताना हाताची प्रचंड वेगवान हालचाल होते, त्यामुळे हात दुखतो. क्रिकेट टाळायला हवे." प्रचंड आवडत असलेले क्रिक्रेटचे प्रशिक्षण अमेया यांना सोडावे लागले. काही क्षण निराशेत गेले. पण, काही क्षणच! कारण, त्या काळात त्या विरमाता अनुराधा गोरे यांच्या आधुनिक संस्कार शिबिराला जात असत. तिथे सशक्त मनाची घडण झाली होती. तसेच, शाळेत परांजपे मॅडम संस्कृत शिकवत असत. शिकवताना त्यांनी मनाच्या शक्तीची अमेया यांना जाणीव करून दिलेली. त्यामुळे हार न मानता अमेया यांनी आयुष्यात इतर स्तरावर प्रगती करायला सुरुवात केली. त्यांनी ‘आयनएस हमला’ येथे चार वर्ष ‘एससीसी सी कॅडेट कॉर्प’ प्रशिक्षण घेतले तसेच ‘एम ई-इलेक्ट्रोनिक्स’ आणि ‘टेलिकम्युनिकेशन’ शिक्षण पूर्ण केले.
 
 
एक वर्ष ‘आयआयटी बॉम्बे-वाय, एस-मीर’मध्ये रडार या विषयावर ‘एम टेक ट्रेनी’ म्हणून संशोधनाचे काम केले. मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा आणि ‘एम.ए’ संस्कृत पदवी प्राप्त केली. तसेच, मुंबई विद्यापीठातून हस्तलिखितशास्त्र डिप्लोमा केला. सध्या मुंबई विद्यापीठातून ‘संस्कृत साहित्यातील दुर्ग स्थापत्य’ या विषयावर त्यांचे ‘पीएच.डी’चे काम सुरू आहे. संस्कृतचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ‘प्राचीन भारताचे विमानशास्त्र’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. २०१५ साली ‘राष्ट्रीय विज्ञान परिषदे’वेळी कॅप्टन आनंद बोडस यांच्यासोबत अमेया यांना ‘प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या विषयाची चर्चा ‘नासा’पर्यंत गेली. या अशाच काळात अमेया यांना डॉ. अलका मांडके भेटल्या. ‘केशवसृष्टी’शी संपर्क आला. पुढे रा. स्व. संघाचे विमल केडीया यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. या सगळ्या काळात वैयक्तिक स्तरावर अनेक घटना घडत होत्या. पण, त्या सगळ्या घटनाक्रमांत अमेया यांनी समाजशील कर्तव्याला प्राधान्य दिले. यापुढेही अमेया यांना भारतीय पुरातन संस्कृती, विज्ञान, इतिहास यांच्या पार्श्वभूमीवर समाजात विविध सेवाभावी उपक्रम राबवायचे आहेत. देश आणि समाजाच्या उत्थानाचे चिंतन करताना बौद्धिक स्तरावर तसेच प्रत्यक्ष समाजसंपर्कातून कार्य करायचे आहे. अमेया म्हणजे असिम. सकारात्मक विचारांची असिम ऊर्जा असलेल्या अमेया जाधव त्यांच्या कार्यात नक्कीच यशस्वी होतील.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.