इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकेतील टेस्ला कंपनीला भारत सरकारने चांगलाच सुनावलं आहे. टेस्ला कंपनी जोपर्यंत भारतामधील उत्पादन कार्यात घेत नाही, तोपर्यंत या कंपनीला कोणत्याही सवलती दिल्या जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी दिली. टेस्ला कंपनीची बाजारपेठ ही भारत असून कंपनी रोजगार मात्र चीनमध्ये निर्माण करत आहे. आणि हे चालवून घेतले जाणार नाही असे म्हणत गुर्जर यांनी टेस्लाला खडे बोल सुनावले आहेत.
सरकारच्या धोरणानुसार असलेल्या योजनांसाठी कंपनीने अद्याप अर्ज केलेला नाही अशी माहिती अवजड उद्योग राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली. मागील वर्षी, टेस्ला या कंपनीकडून भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे आयात शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करावे असे अवजड उद्योग मंत्रालयाकडून कंपनीला सांगण्यात आले होते. तसेच भारतात ऑटोमोबाईल आणि ऑटो इंडस्ट्रीसाठी एक मोठी बाजारपेठ असून अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या बॅटरींच्या निर्मितीसाठीहि वाव आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या देखील यासंदर्भात स्वत:च्या योजना आहेत आणि या दोन्हींसाठी आवश्यक योजना भारतीय व परदेशी कंपन्यांसाठी खुल्या आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री गुर्जर यांच्याकडून देण्यात आले. तसेच मंत्री गुर्जर पुढे असेही म्हणाले कि,येणाऱ्या काळात टेस्लाला इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी भारतीय बाजारपेठ हवी असल्यास त्यांनी त्यांचे उत्पादन हे भारतात करावे. उत्पादनासाठी आवश्यक असणारे संसाधनेहि पुरवली जातील.
लोकसभेत काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांच्याकडून विचारण्यात आलेल्या सरकार टेस्लाकंपनीला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आमंत्रण देणार का? आणि देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत का? या प्रश्नांवर सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देत अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जरम्हणाले कि, "चीनमध्ये नोकऱ्या आणि बाजारपेठ भारत! हे मोदी सरकारच्या काळात शक्य होणार नाही. सरकारच्या धोरणांनुसार जर बाजार भारतात असेल, तर भारतातीय लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. पण टेस्ला कंपनीने भारत सरकारच्या धोरणांनुसार अर्ज केलेला नाही. या कंपनीसाठी भारताचे दरवाजे हे खुलेच आहेत. त्यामुळे हि कंपनी सरकारच्या धोरणांनुसार अर्ज करूच शकते आणि भारतात कंपनी स्थापन करू शकते. पण जर भारतातील बाजारपेठेचा वापर करायचा असेल, तर नोकरीच्या संधी आणि रोजगारनिर्मिती हि भारतीयांसाठीच व्हायला हवी."