समाज आणि साहित्य यांचे परस्पर नाते असते. साहित्य हे समाजमानसाचा आरसा असते. म्हणूनच साहित्यिकांनी समाजाची प्रकृती ठणठणीत राहण्यासाठी आपली लेखणी तळपत ठेवली पाहिजे. समाजातील दु:ख, उपेक्षा लेखणीतून मांडल्या पाहिजेत. सामाजिक व साहित्यिक बांधीलकी आणि समाज जागरणाचे काम सातत्याने केले पाहिजे. या एका सामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्ती करण्याचा प्रयत्न एक साहित्यिक संस्था गेली अनेक वर्षे करते आहे. ती संस्था आहे, चिंचवड, पुणे येथील ‘समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा.’
'सामाजिक समरसता मंचा’चे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली १९९८ साली झालेल्या ‘समरसता साहित्य मंचा’च्या जळगाव येथील साहित्य संमेलनात डॉ. यादव यांनी ‘समरसता’ हे सामाजिक मूल्य आहे, हा मुद्दा मांडला आणि ‘समरसता साहित्य परिषदे’ची स्थापना झाली. त्यानंतर २००६ साली ‘समरसता साहित्य परिषदे’चे आठवे साहित्य संमेलन चिंचवडमध्ये भरले होते. त्यावेळी संमेलन अध्यक्ष होते डॉ. भीमराव गस्ती. संमेलनाचे उद्घाटक होते नामदेव ढसाळ आणि निमंत्रक होत्या डॉ. संजीवनीताई तोफखाने. या ज्येष्ठ साहित्यिकांच्या प्रेरणेने २००६ साली समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेची स्थापना झाली. ‘सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक’ हे बोधवाक्य आजवर जपणारी अशी ‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखा!
समरसतेचा भाव जागविल्याशिवाय समाजात खरी ‘समता’ येऊ शकत नाही. ‘समता’युक्त समाजनिर्मितीसाठी ‘समरसता’ ही पूर्वअट आहे. अशा समतायुक्त समाजनिर्मितीत साहित्यिकांचे योगदान म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे ठरते. समाजाचे जीवंत, चैतन्ययुक्त, रसरशीत चित्रण साहित्यात येत असते. ही खरी साहित्यिक समरसता. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘ससाप’ पिंपरी-चिंचवडची आजवरची वाटचाल झाली आहे. शाखेचे पहिले अध्यक्ष ज्येष्ठ बालसाहित्यिक प्रा. डॉ. आनंद घटुगडे हे होते, तर कार्यवाह ज्येष्ठ कवयित्री डॉ. संजीवनी तोफखाने या होत्या. त्यानंतर रमेश वाकनीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवातीच्या काळात अनेक छोटी छोटी कविसंमेलने, परिसंवाद, व्याख्याने, शिक्षक मेळावा, तसेच विविध विषयांच्या कार्यशाळा भरवणार्या ‘समरसता साहित्य परिषदे’ने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, त्यांच्या साहित्यविषयक जाणिवांना हळुवार साद घातली. त्याला अनपेक्षित यश मिळाले.
अगदी थोड्याच कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि परिसर तसेच पुण्यातील अनेक नामांकित महाविद्यालयातून, सवित्रिबाई फुले ,पुणे विद्यापीठातून अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. २००९-२०१० साली ‘पहिले’ विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्यात आले. यासंमेलनाचे विशेष असे की, जर पुढे ही विद्यार्थी साहित्य संमेलन घेणार असाल तरच पहिले असा उल्लेख करण्याची स्वर्गीय विजयराव कापरे यांनी सूचना केली आणि एका परंपरेचा पाया रोवला गेला. आजतागायत ही विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याची परंपरा सुरू आहे. या साहित्य संमेलनांना आजवर ’भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डा’च्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले, ज्येष्ठ साहित्यिका प्र. डॉ. श्यामाताई घोणसे, डॉ. संजीवनीताई तोफखाने, ज्येष्ठ लेखिका विनीताताई ऐनापुरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोकिळ, मनोहर सोनावणे, रमेश पतंगे सर, ज्येष्ठ व्याख्याते नायडू सर, राजेंद्रजी घावटे, बाळकृष्ण कवठेकर असे दिग्गज अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर, म. रा. भटक्या विमुक्त समितीचे अध्यक्ष भिकुजी इदाते, प्रा. मधु जामकर, प्रिया जामकर, प्रा. रमेश पांडव तसेच ‘तरुण भारत’चे माजी संपादक अरुण करमरकर, संत साहित्यक रामचंद्र देखणे हे उद्घाटक म्हणून लाभले आहेत, ही विद्यार्थी साहित्य संमेलने केवळ संमेलने न राहता आता चळवळ म्हणून उभी राहिली आहेत. परिषदेने विद्यार्थ्यांना मांडव घालून दिला आहे. त्यावर आपल्या प्रतिभेचा वेल चढवण्याचे काम विद्यार्थीच करतात.
विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिल्यानंतर शहरातील आणि परिसरातील होतकरू, नवीन साहित्यिक कवींना पूर्वासुरींच्या कवींची माहिती व्हावी, त्यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास केला जावा, त्यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे याची कल्पना यावी व त्यांचे साहित्य लिखाण समृद्ध व्हावे म्हणून परिषदेने ‘कवितेकडून कवितेकडे’ हा यशस्वी उपक्रम सुरू केला. या उपक्रमासदेखील खूप मोठा प्रतिसाद आहे. ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी, अरुण म्हात्रे, प्रा. शामराव अत्रे, प्रा. अशोक बागवे, गिरीशजी प्रभुणे, प्रतिमाताई इंगोले, रवींद्र तांबोळी असे अनेक मान्यवर साहित्यिक ‘कवितेकडून कवितेकडे‘ या उपक्रमास लाभले. कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करणार्या प्रत्येक मांडवातल्या आणि मांडवाबाहेरच्या कवीने हा उपक्रम नावाजला आहे.
या सर्वात संस्थेच्या कार्याचा ‘युएसपी’ ठरली, ती स्वर्गीय विजयराव कापरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी घेतली जाणारी ‘काव्यमैफील करंडक स्पर्धा.’ अवघ्या महाराष्ट्रातील कवींना सुपरिचित असणार्या या स्पर्धेच्या माध्यमातून ‘ससाप’ पिंपरी-चिंचवड शाखेने समरसतेचे उद्दिष्ट तळागाळात पोहोचवण्याचे कार्य केले आहे. २०१४ साली पहिली ‘काव्यमैफील करंडक स्पर्धा’ आयोजित केली गेली. यंदाचे स्पर्धेचे सहावे वर्ष होते. महाराष्ट्रभरातून सहभागी होणार्या विविध कवींच्या समूहांमुळे दरवर्षी स्पर्धेचीरंगत टिकून आहे.
साहित्यिकांचे साहित्य सर्वदूर पसरावे, त्याला ओळख मिळावी, या प्रेरणेने सुरू केलेला ‘साहित्यसंवाद’ हा संस्थेचा आणखी एक दर्जेदार उपक्रम. जे जे म्हणून ‘साहित्य’ या सदराखाली येते त्या सर्व साहित्याचे सादरीकरण, अभिवाचन, भाष्य, मुलाखत या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. राजर्षी शाहू महाराज जयंती, महिला दिन, कोजागिरी उत्सव यांबरोबरच कवी कालिदास यांची महती सांगणारा ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा कवी कालिदास यांच्या जयंतीचा उत्सव कालिदासांच्या साहित्य कृतीवरील व्याख्यान व पावसाच्या कविता सादर करून केला जातो. इतकेच नाही, तर नव साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशनदेखील संस्थेच्यावतीने केले जाते. त्यालादेखील उत्तम प्रतिसाद आहे. सध्या संस्थेचे मार्गदर्शक पंजाबराव मोंढे, बाळासाहेब सुबंध व शोभाताई जोशी हे आहेत. शाखेचे अध्यक्ष कैलास भैरट, उपाध्यक्ष सुहास घुमरे व कार्यवाह मानसी चिटणीस आहेत. ‘सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक’ हे ध्येय उराशी बाळगून ‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखा यशस्वीपणे वाटचाल करत आहे. या वाटचालीत सोबत करण्यासाठी आपण रसिक वाचक ही सहभागी होऊ शकता.
- मानसी चिटणीस