मुंबई : अॅन्टिलिया या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे यास अटक करण्यात आली होती. निलंबित आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी उभारण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाकडे सचिन वाझेनी अनिल देशुमख यांना उलट तपासणीसाठी क्लीन चीट दिली होती. परंतु आपल्या जबाबात बदल करण्याचा अर्ज सचिन वाझेने केला होता. त्याचा हा अर्ज आयोगानं फेटाळून लावलाय.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे द्यावे लागले होते का? अनिल देशमुख यांच्या वैयक्तिक कर्मचार्यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीनं तुमच्याकडं कधीही पैशांची मागणी केली नाही, असे म्हणणे योग्य ठरेल का? असे प्रश्न आयोगाकडून विचारण्यात आले असता वाझेनी 'नाही' असं उत्तर दिलं होतं. मात्र, आता या जबाबात त्यास बदल करायचा असल्याची विनंती त्याने आयोगाकडे केली आहे. "अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक त्यांच्या वतीनं माझ्याकडे पैसे मागायचे. मला अनिल देशमुख आणि त्यांच्या लोकांकडून पैसे घेण्यास सांगितले गेले.", असे वाझेनी केलेल्या अर्जात नमूद केले आहे.
"यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी दबावाखाली दिली होती. अनिल देशमुख यांनी माझा मानसिक छळ केला होता. राजीनामा दिल्यानंतरही मला ते त्रास देत होते. यामुळे पोलीस कोठडीला कोणताही विरोध केला नाही. अनिल देशमुख यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता. ते नेहमी माझी काळजी घेतील आणि मला सुरक्षित ठेवतील असं मला वाटत होतं.", असे त्यात पुढे म्हटले आहे.