जलपर्णी काढतेवेळी पालिकेकडून पवई तलावातील मगरींना हुसकवण्याचा प्रयत्न

    08-Feb-2022
Total Views | 504
powai lake


मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने पवई तलावाच्या जैवविविधतेच्या देखरेखीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापली असतानाही, तलावातील जलचरांवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. यावेळी जलपर्णींवर आसरा घेतलेल्या मगरी आणि त्यांच्या पिल्लांचा विचार न करता हे काम रेटण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या कामावेळी पालिकेने नेमलेल्या तज्ज्ञ समितीमधील सदस्य उपस्थित नसण्याबाबत पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.



पवई तलावाभोवती बांधण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकबाबत यापूर्वीच उच्च न्यायालयाने पालिकेला धारेवर धरले आहे. पवई तलावाचे भौतिक आणि नैसर्गिक पुनरुज्जीवनाचे काम तज्ज्ञांच्या अंतर्गत होण्याबाबतचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. पालिकेने पुनरुज्जीवनाच्या पैलूंवर देखरेखीसाठी आणि तलावाच्या काठाची जैवविविधता वाढविण्यासाठी तज्ज्ञांची देखरेख समिती स्थापली आहे. त्यासाठी जीवशास्त्रज्ञ केदार भिडे यांना नियुक्त केली आहे. मात्र, या समितीच्या नाकाखाली पवई तलावातील जलचरांना बाधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी पालिकेने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. त्यासाठी मोठ्या मशीन आणून जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. मात्र, या कामावेळी जलपर्णींमध्ये अधिवास करणाऱ्या मगरी, त्यांची पिल्ले आणि इतर जलचरांचा विचार न केल्याची माहिती याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी दिली.




जलपर्णी काढताना जेसेबीसमोर मगरी आल्या होत्या. मात्र, जेसेबीच्या सहाय्याने त्यांना हुसकावण्यात आल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले. तलावातील जलचरांचा थेट संबंध या जलपर्णींशी येत असल्याने तिचे उच्छाटन सुरू असताना त्याठिकाणी पालिकेने नेमलेले जीवशास्त्रज्ञ उपस्थित असणे अपेक्षित होते. मात्र, हे जीवशास्त्रज्ञ त्याठिकाणी उपस्थित नसल्याने जलचरांचा विचार न करता अशास्त्रीय पद्धतीने जलपर्णीचे उच्छाटन केल्याचे, स्टॅलिन म्हणाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासनाकडून काम रेटण्याचा प्रकार सुरू असल्याचे यामाध्यमातून दिसते.


पवई तलावातील मगरींवर अभ्यास करण्यासाठी आम्हाला दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले आहे. मात्र, या अभ्यासाकरिता आवश्यक असणारा निधी न दिल्याने आम्ही कामाला सुरुवात केलेली नाही. दरम्यान जलपर्णी काढण्याच्या कामाची कल्पना आम्हाला पालिकेकडून देण्यात आलेली नव्हती. - केदार भिडे, पालिकेने नेमलेले जीवशास्त्रज्ञ
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121