ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे 'राज्याचे भावी मुख्यमंत्री' असे लिहिलेले बॅनर्स लावल्याचे पहायला मिळाले. ९ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या बॅनरबाजीमुळे राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्या बॅनर्सवर आता शिवसैनिकांना स्प्रे मारायची वेळ आली आहे.
या बॅनरबाजीत शिवसैनिकांनी 'एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होवोत हिच प्रार्थना', 'एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री' असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु ठाण्यातल्या या शिवसैनिकांवर आता स्प्रे मारून 'भावी मुख्यमंत्री' हा शब्द पुसण्याची वेळ आली आहे. यावरून शिवसैनिकांकडून स्प्रे मारून मनातल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला जातोय? की त्यांच्या या भावना दाबण्याचा कोणाकडून तरी प्रयत्न केला जातोय? असे प्रश्न निश्चितच उद्भवतात.