मुंबई - मादी हेगलिन गल पक्ष्याने श्रीलंकेपासून सायबेरियापर्यंत स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेतील शास्त्रज्ञांनी या पक्ष्याच्या स्थलांतराच्या पूर्ण चक्राचे म्हणजेच श्रीलंका ते सायबेरिया आणि पुन्हा सायबेरिया ते श्रीलंका, अशी नोंद केली आहे. स्थलांतराचे हे चक्र पूर्ण करण्यासाठी या मादी गल पक्ष्याने तब्बल १९ हजार ३६० किमीचे अंतर कापले आहे. या पक्ष्यावर लावलेल्या सॅटेलाईट ट्रान्समीटरमुळे ही माहिती समोर आली आहे.
हिवाळ्यामध्ये दक्षिण आशियात स्थलांतर केलेल्या पक्ष्यांमुळे पक्षी स्थलांतरामधील काही अचंबित करणारी माहिती समोर येत आहे. या स्थलांतरादरम्यान त्यांच्याकडून होणारा हजारो किलोमीटरचा प्रवास उलगडत आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी रिंगिग आणि सॅटेलाईट टॅगिंगसारखे उपक्रम राबवले जातात. यामध्ये पक्ष्यांच्या पायात लोखंडी गोलाकार रिंग किंवा रंगीत फ्लॅग लावले जातात, तर सॅटेलाईट लोकेशनच्या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाचे ठिकाणे सांगणारे ट्रान्समीटर त्याच्या शरीरावर बसविण्यात येते. अशाचप्रकारे ट्रान्समीटर लावलेले हेगलिन गल पक्ष्याचा हजारो किलोमीटरचा प्रवास समोर आला आहे. उत्तर रशियामध्ये हे पक्षी प्रजनन करुन हिवाळ्यामध्ये दक्षिण-पश्चिम आशिया, भारतीय उपखंड, पूर्व आशिया आणि पूर्व आफ्रिका येथे स्थलांतर करतात.
एप्रिल, २०२१ च्या सुरुवातीला, कोलंबो विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील श्रीलंकन संशोधकांच्या गटाने मन्नार येथे या हेगलिन पक्ष्याला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले. तिचे नाव 'मॅनिके', असे ठेवण्यात आले. हे दक्षिण आशियातील पहिल्या टॅग केलेल्या मोठ्या गल पक्ष्यापैकी एक आहे. टॅग झाल्यानंतर, तिने एप्रिलच्या महिन्याच्या अखेरीस उत्तर दिशेने आपला प्रवास सुरू केला. उरल पर्वत ओलांडल्यानंतर तिने युरोपियन रशियामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती सारबेरियातील यमल द्वीपकल्पातील तिच्या विणीच्या ठिकाणी पोहोचली. ऑगस्टच्या अखेरीपर्यंत तिने त्याठिकाणी वास्तव्य केले आणि त्या महिन्याच्या अखेरीस तिने पुन्हा आपल्या हिवाळी स्थलांतराला सुरुवात केली. ४ नोव्हेंबर, २०२१ मध्ये ती पुन्हा मन्नारमध्ये परतली. अशा प्रकारे संपूर्ण स्थलांतर चक्र पूर्ण करणारी ती श्रीलंकेत टॅग केलेली पहिली पक्षी ठरली.
'मॅनिके'ने सायबेरियाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी सुमारे पाच आठवड्यांचा वेळ घेतला. या दरम्यान तिने ७ हजार ८८० किमी अंतर कापले. तिचा पुन्हा श्रीलंकेतील परतीचा प्रवास मात्र संथ गतीने झाला. परतताना तिने १३ आठवड्यांचा कालावधी घेतला. त्या दरम्यान ११ हजार ४८० किमी अंतर कापले. या प्रवास चक्रात तिने १९ हजार ३६० किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला.