मुंबई : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत जैन समाजाविरुद्ध अशोभनीय वक्तव्य केले होते. यावरून देशभरात जैन समाज आक्रमक झाला असून आता महाराष्ट्रातदेखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निशेष करत भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपले निवेदन सादर केले.
तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान म्हंटले होते कि, तुम्हाला त्या भारताची भीती वाटते जिथे एक जैन मुलगा घरातून लपून अहमदाबादच्या रस्त्यावर मांसाहारी खातो. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातील जैन समाजाने विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय जैन अल्पसंख्याक संघटनेशी संबंधित अन्य जैन समाज संघटनांनी, 'समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून समाज हे खपवून घेणार नाही.' असे म्हणत नाराजी व्यक्त केली.
जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, "जैन समाज सुरुवातीपासूनच शाकाहारी पदार्थ खातो. जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने शांततेने जीवन जगणारा समाज आहे. जैन समाजातील व्यक्ती कधीच मांसाहारी असू शकत नाही. जैन समाज पहिल्यापासून जल, वनजमीन वाचवण्याच्या मोहिमेशी जोडलेला आहे. त्याचबरोबर अनेकांना जैन समाजाची बदनामी करायची आहे."