समाजशील धम्मसेवक : अर्जुन जाधव

    07-Feb-2022   
Total Views |

Arjun Jadhav1
 
 
वयाच्या ७१व्या वर्षीही शिक्षणाची आस असलेले आणि समाजात धम्माच्या माध्यमातून संस्कार रूजवणारे अर्जुन जाधव म्हणजेच ए. के. जाधव. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
माणसाच्या मनात जिद्द असेल, काही सकारात्मक ध्येय असेल, तर तो कधीच थकत नाही, कधीच थांबत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन केरू जाधव. ते सध्या भारतीय बौद्ध महासभेचे मुंबईतील टागोरनगर, विक्रोळीचे सरचिटणीस आहेत. २०१९ साली ते टागोरनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीचे अध्यक्षही होते. दिवसाचे १८-१८ तास धम्माचा प्रसार-प्रचार ते करतात. सध्या ते कलिना, सांताक्रुझ येथील गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. येत्या वर्षात ते ‘एलएलबी’साठी प्रवेश घेणार असून त्यांना वकील म्हणून जनसेवा करायची आहे. कारण, गोरगरिबांच्या वस्तीत आजही गरिबांची मुलं अजाणतेपणे गुन्हेगारीत गोवली जातात. त्यांना माणुसकीच्या नात्याने कायदेशीर सल्ला देणारे कुणीही हक्काचे असे नसते. वस्तीपातळीवरच्या आयाबाया दिवसरात्रराबतात. पण, त्यातल्या कित्येक जणींना घरगुती हिंसेचे बळी व्हावे लागते. या मायभगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हक्काचा वकील व्हावे, अशी इच्छा अर्जुन जाधव यांची आहे, तर असे हे वय वर्षे ७१ असलेले अक्षयऊर्जेने प्राप्त अर्जुन जाधव...
 
 
 
अर्जुन हे केवळ विक्रोळी परिसरातच नव्हे, तर मुंबईभर धम्माचा विचार घेऊन काम करत असतात. धम्मबांधवांच्या घरी अनेक धार्मिक कार्यक्रम असतात. त्यावेळी ते तिथे ‘त्रिशरण’, ‘पंचशील’ म्हणतातच. पण, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणासंदर्भातले, मानवी हक्कासंदर्भातले विचार ते जनमानसात रूजवत असतात. ‘शिका, स्वावलंबी व्हा, आपण सगळे भारतीय आहोत, बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे हक्क आणि अधिकार आपल्याला दिले आहेत, ते जाणून घ्याच. पण, आपल्यासाठी संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याबाबतही विचार करा,’ अशी मांडणी आपल्या वक्तव्यातून ते सातत्याने करत असतात. वस्तीतील गरजू मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, त्यांना काही अडीअडचण असेल, तर ती दूर करण्यासाठी अर्जुन सदैव तत्पर असतात. परिसरातील बुद्धविहारातील भंतेजींशी संपर्क साधून त्यांची सातत्याने सेवा करणे हे सुद्धा अर्जुन यांचे एक व्रत आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे धम्मपूजा-उपासना करताना धम्मबांधव त्यांना कधी धम्मदानही करतात. पण, हे दान स्वत:साठी ठेवायचे नाही, तर ते समाजातील गरजूंना द्यायचे, हासुद्धा अर्जुन यांचा नियम! अशा या समाजातील सर्वांना प्रेरणा देणार्‍या अर्जुन यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊया.
 
 
 
जाधव कुटुंब मुळचे चांदवड, नाशिकचे. पण, त्यांनी कामानिमित्त मुंबई गाठली. अर्जुन यांचे वडील केरू हे ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये कामाला तर आई पार्वती गृहिणी. उभयंताना आठ अपत्ये. त्यापैकी एक अर्जुन. त्यावेळी जाधव कुटुंब बीपीटी कॉलनी, वडाळा येथे वास्तव्यास होते. १९५६ साल होते. त्यावेळी अर्जुन पाच वर्षांचे होते. बाबासाहेब बुद्धवासी झाले आणि सगळा समाज शोकाकुल झाला. त्यावेळी केरू आणि पार्वतीबाई हमसून हमसून रडत होती. अर्जुन त्यांना विचारू लागले. “तुम्ही का रडता?” यावर केरू म्हणाले, “बाबांची मुलं औषधपाण्याविना मेली. बाबांना, रमाईंना कधी सुख मिळालं नाही. पण, ते आपल्या समाजाला सुख देऊन गेले म्हणून सगळे रडतात.”
 
 
 
बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलांनी शिकावे, असे केरू यांना वाटे. त्यातच अर्जुन शाळेत हुशार होते. घरची गरिबी, त्यात आई पार्वती क्षयरोगाने आजारी असायच्या. पण, या काळात आईचा उजवा हात बनून लहानगे अर्जुन कपडे धुणे, दळण दळणे, भांडी घासणे, घर आवरणे वगैरे काम करायचे. एकदा काय झाले, तर बहिणीने कपडे शिवता शिवता चुकून सुई कपड्यातच ठेवली. अर्जुन कपडे धुताना ही सुई अर्जुन यांच्या टाचेत गेली. सगळे कपडे धुतल्यानंतर अर्जुन यांनी पाहिले की, पाय सुजला आहे. वेदनेने ते अक्षरश: कळवळू लागले. पार्वतीबाई त्यावेळी आजारी होत्या. क्षयाने थकलेल्या होत्या. पण, १२ वर्षांच्या अर्जुन यांना पाठंगुळी घेऊन त्या वडाळा ते परळ चालत गेल्या. तिथे अर्जुन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. पायातून सुई काढण्यात आली. पार्वतीबाईंनी ती सुई आपल्या कमरेच्या बटव्यात ठेवली. त्या सगळ्यांना सांगत, “माझा अर्जुन खूप कष्ट करतो. तो बाबासाहेबांसारख शिकणार आणि मोठा होणार.” आईचे म्हणणे ऐकून अर्जुन यांनी ठरवले की, आपण खूप शिकायचे. त्यावेळी शाळेत राजाध्यक्ष नावाच्या शिक्षिका होत्या. त्यांनी अर्जुन यांच्या शिक्षणाकडे स्वत:च्या मुलासारखे लक्ष दिले.
 
 
 
असो. अर्जुन जुनी मॅट्रिक शिकले. त्यांना महानगरपालिकेच्या झाडू खात्यात नोकरी मिळाली. त्यांना नोकरी करायची नव्हती. पण, त्यांचे वडील म्हणाले, “आपली परिस्थिती नाही. नोकरी करुन शिक.” पण, झाडू खात्यात अर्जुन यांचे मन रमले नाही. ते काही दिवस कामावर गेलेच नाहीत आणि अचानक त्यांचे साहेब वसंत भोळे घरी आले. साहेब त्यातही ब्राह्मण साहेब घरी आले म्हणून अर्जुन यांना वाटले काय झाले असेल? तर भोळे म्हणाले, “का रे बाबा, कामाला का येत नाहीस?” अर्जुन यांनी सांगितले की, “मी मॅट्रिक झालो आहे. मला हे काम नाही करायचे.” भोळे म्हणाले, “ठीक आहे, तू झाडू मारु नकोस. कामगारांची हजेरी घ्यायचे काम कर.” पुढे लगेचच अर्जुन यांना शिक्षणामुळे बढती मिळाली. शेवटी ‘न्युसन्स इन्सपेक्टर’ या पदावरून ते निवृत्त झाले. या सगळ्या काळात अर्जुन यांनी शिक्षणासंदर्भात धम्मासंदर्भात समाजात जागृत केली. पुढे निवृत्तीनंतर मग त्यांनी भारतीय बौद्ध महासभेशी संपर्क केला. श्रामनेर, बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे ते सैनिक झाले. पुढच्या काळात त्यांना धम्माचा प्रसार-प्रचार त्यातून तथागतांचा दया, करुणा, शांतीचा संदेश समाजात पोहोचवण्याचे कार्य करायचे आहे. अर्जुन म्हणतात, “ ‘अत्त दीप भव’ असे तथागत सांगतात. हा संदेश समाजात रुजवण्यासाठी मी आयुष्यभर कार्यरत राहणारआहे.” अर्जुन यांच्या धम्मसेवेस वंदन.
 
 
९५९४९६९६३८
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.