मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्त दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचे स्मारक उभारावे यासंदर्भात भाजप आमदार राम कदमयांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्राकडे बोट दाखवत या विषयाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचं स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी केली होती. परंतु संजय राऊत यांनी लतादीदींच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारने विचार करावा असे म्हणत याचे राजकारण करण्यास सुरुवात केली. "लता दीदींनी आपल्या धरतीवर जन्म घेतला असून महाराष्ट्राशी त्यांचं विशेष नातं होतं. या देशात त्यांनी जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. त्या शरीराने गेल्या असल्या तरी त्या अमर आहेत. कायम अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. बोलू द्या. त्यांचं स्मारक बनवणं इतकं सोपं नाही. त्या काही राजकीय नेत्या नव्हत्या. त्या खूप मोठ्या होत्या. महान होत्या. त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल’, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राम कदम यांनीही राऊातांवर पलटवार केला आहे.
"भारतरत्न लतादीदींवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले, तिथे त्यांचं भव्य स्मारक उभं करावं अशी कोट्यावधी चाहत्यांची इच्छा आहे. राजकारण करु नका म्हणता आणि स्वत:च परत केंद्र सरकारकडे बोट दाखवता. सत्ता तुमची आहे. सरकारही तुमचं आहे. जिथे अंत्यसंस्कार झाले तिथेच त्यांचं स्मारक जाहीर करा. नाना पटोलेही म्हणत असतील तर मग तुम्हाला अडवलंय कुणी? सरकार कुणाचं आहे, तुमचंच ना. मग थेट निर्णय घ्या. विलंब करु नका, विलंब होत असेल तर मी शरद पवारांनाही पत्र लिहिन. हे स्मारक व्हावं ही लतादीदींच्या असंख्य चाहत्यांची इच्छा आहे,", असे आमदार राम कदम यावेळी म्हणाले.