‘इसिस’ म्होरक्याचा आत्मघात

    05-Feb-2022   
Total Views |

ISIS
 
 
दि. ४ फेब्रुवारी रोजी सीरियाच्या जवळ ‘इसिस’चा म्होरक्या अबू इब्राहिम अल हशमी अल कुरेशी याने स्वतःसह त्याच्या दोन पत्नी आणि चार मुलांना संपवले. एक बॉम्बस्फोट त्याने घडवून आणला आणि त्यात हे सगळे मेले. अबू इब्राहिमच्या मृत्यूने क्रूर आणि भ्याड दहशतवादाचा अंत झाला. भित्रे लोक जास्त क्रूर असतात. अबू इब्राहिमसुद्धा भित्राच! अमेरिकी सैन्याने हल्ला केला तेव्हा आपण पकडले जाऊ, या भीतीने त्याने आत्महत्याच केली. ‘इसिस’ची घाणेरडी आणि अत्यंत अमानवी क्रूर कृत्ये जगाला माहिती आहेत. केलेल्या परिणामांची भीती वाटून अबूने आत्मघातकी पावले उचलली. अबूच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या आणि त्याच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर पडले. ‘इसिस’वर कारवाई होणारच होती. कारण, काही दिवसांपूर्वी सीरियाच्या तुरूंगावर ‘इसिस’ने हल्ला केला. कारण, त्या तुरुंगात ‘इसिस’चे हजारो दहशतवादी बंद होते. ‘इसिस’च्या हल्ल्यानंतर त्या तुरुंगातून ४०० दहशतवादी पळून गेले, तर पोलिसी कारवाईत ३७४ दहशतवादी ठार झाले. या सगळ्यामागे अबू इब्राहिम होता. तुरुंगातून पळालेले ४०० दहशतवादी हे सीरिया आणि जगाच्या डोक्याला तापच होते.
 
‘इसिस’चा प्रमुख अबू बकर हा २०१९ रोजी अमेरिकी कारवायांत असाच मेला. त्यानंतर ‘इसिस’ संपली, असे काही लोकांना वाटले. मात्र, त्याच काळात अबू इब्राहिमने ‘इसिस’च्या दहशतवादी कारवाया सुरू केल्या. सीरियाच्या सीमेवर नागरिकांवर हल्ले करणे, इस्लामिक राज्य आणू, अशा वल्गना करणे सुरू केले आणि मग अबू इब्राहिम ‘इसिस’चा स्वयंघोषित म्होरक्या झाला. त्याच्या मृत्यूने दहशतवाद संपणार, असेही नाही. पण, एक अत्यंत पापी कारकिर्दीचा अंत झाला, हे मात्र नक्की! २०१४ साली सिंजर प्रांतात ‘इसिस’ने या याझिदी सूमहाचा नरसंहार केला. त्यावेळी भले अबू इब्राहिम हा ‘इसिस’चा प्रमुख नव्हता. पण, या याझिदींवरच्या हल्ल्यात आणि त्यानंतरच्या अत्यंत घृणास्पद कृत्यांमध्ये अबूने कमान सांभाळली होती. त्यावेळी ‘इसिस’चा म्होरक्या होता अबू बकर अल बगदादी. त्यावेळी अबू इब्राहिमने गलिच्छ क्रूरतेची भयाणता गाठली होती. अबू इब्राहिमने त्यावेळी याझिदी महिलांना अक्षरशः लैंगिक गुलाम बनवण्यासाठी छळछावणी आणि बाजार वसवला. हातातबाहुली असणाऱ्या निष्पाप याझिदी बालिकांचा लिलाव केला गेला. वयाच्या १२-१३व्या वर्षापर्यंत या बालिका सात ते आठ लोकांना विकल्या गेल्या. बालपणीचत्या दोन दोन मुलांच्या आया झाल्या. या सर्वांना ‘इसिस’ने नाव दिले ‘मॅरेज ब्युरो.’ ‘इसिस’च्या दहशवाद्यांना तसेच जगभरातील दहशतवाद्यांना वधू सुचवण्याचे काम म्हणे हे ‘ब्युरो’ करू लागले.यात बालिका, तरुणी आणि विधवा यांची वर्गवारी करण्यात आली. त्यांना गुराढोरांसारखे विकण्यात आले. यात मातांना विकताना अडचण होते म्हणून त्यांच्या चिमुकल्यांनाही मारण्यात आले. या सगळ्या पापात अबू इब्राहिम सामील होता. दहशतवादासोबतच, मानवी देहाची आणि मनाची विटंबना करणाऱ्या या देहव्यापारात गुंतलेल्या ‘इसिस’च्या म्होरक्याचा असा अंत होणे, ही जगासाठी चांगली बातमी आहे. मृत्यूची भीक मागणारे ते हजारो याझिदी, त्या छोट्या याझिदी बालिका, अबू आणि त्याच्या ‘इसिस’ने बरबाद केलेले त्यांचे आयुष्य, या साऱ्यांचा हिशोब अबूच्या शरीराच्या चिंधड्यांनी होऊच शकत नाही.
अबू इब्राहिम इतका क्रूर का वागला असेल? तर त्याला ‘इसिस’च्या दहशतवाद्यांना सतत दाखवणे गरजेचे होते की, तो कट्टर इस्लामचा समर्थक आहे. तो गैरमुस्लिमांचा कर्दनकाळ आहे. कारण, ‘इसिस’मध्ये अरब वंशाच्या व्यक्तीला नेतृत्व मिळत होते. अबू इब्राहिम हा अरबी वंशाचा नव्हता, तर तो तुर्की होता. त्याचे खरे नाव अमिर मोहम्मद सईद अब्दुल रहमान अल मावला. पण, ‘इसिस’मध्ये आल्यावर तिथे इतर दहशतवाद्यांनी त्याला स्वीकारावे यासाठी त्याने स्वतःचे नाव बदलले आणि तो झाला अबू इब्राहिम अल हशमी अल कुरेशी. ‘इसिस’च्या कारवायांसाठी त्याला दोन वर्षे तुरूंगवासही झाला. या दोन वर्षांत त्याचे जागतिक दहशतवाद्यांशी लागेबांधे आणखीन घट्ट झाले, हे विशेष. जगभरातल्या दहशतवादाचा मागोवा घेताना हे जाणवते की, दहशतवादाची फळं मृत्यूनंतर ७२ हूर मिळतात की नाही माहिती नाही. मात्र, या शरीराच्या असंख्य चिंधड्या होऊन भयग्रस्त मृत्यू मिळणे, हे नक्कीच!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.