चीनचे घाणेरडे राजकारण

    04-Feb-2022   
Total Views |

China
भारतविरोधाचा मुद्दा आला की, चीन आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही थराला जाण्याची चढाओढच सुरु होते. नुकताच हिवाळी ऑलिम्पिकच्या पूर्वसंध्येला चीनने भारताला भडकावण्यासाठी घाणेरडा प्रकार केला. शुक्रवार दि. ४ फेब्रुवारीपासून चीनच्या बीजींगमध्ये हिवाळी ऑलिम्पिकची सुरुवात होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटनावेळी ‘मशाल रॅली’चे आयोजन केले जाते, यंदाही तसे होत आहे. मात्र, चीनने ही मशाल सोपवली आहे ती २०२० सालच्या भारताबरोबरील गलवान संघर्षातील की, फबेओ या जखमी चिनी सैन्य अधिकाऱ्याकडे! चीनचा हा निर्णय भारतविरोधी दीर्घकालीन प्रपोगंडाचा भागच. मात्र, त्यासाठी त्याने हिवाळी ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेचा वापर केला, त्याचा विरोध केलाच पाहिजे. ऑलिम्पिक स्पर्धा चीनमधील देशांतर्गत प्रकार असला असता तर जनतेच्या मनात सैन्याबद्दल आदरभाव वाढीस लागण्यासाठी घेतलेला निर्णय म्हणून याकडे पाहाता आले असते. पण, ऑलिम्पिक स्पर्धा एकट्या चीनविषयीचा मुद्दा नाही, तर त्यात जगभरातील सर्वच देश सहभागी होत असतात. अशा स्पर्धेत गलवान संघर्षातील जखमी सैनिकाहाती मशाल देण्यातून चीनचे भारताला कमी लेखण्याचे दर्जाहीन आणि कुटील राजकारणच दिसून येते. म्हणूनच भारतानेही हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोपावर सांकेतिक बहिष्काराची घोषणा केली.
दरम्यान, कोणताही देश आपल्या देशातील सैनिकांना सन्मानित करु शकतोच. भारतानेही पाकिस्तानविरोधी युद्ध असो वा घुसखोरांविरोधातील कारवाया अथवा चीनविरोधातील युद्ध वा गलवानसारखा संघर्ष, त्यातील सहभागी सैनिकांच्या शौर्याचा आणि त्यागाचा नेहमीच गौरव केला. पण,त्यासाठी प्रपोगंडा फैलावत चीनला हीन ठरवण्यासाठी भारताने कधीही जागतिक क्रीडा स्पर्धांचा वा जागतिक मंचांचा वापर केला नाही. म्हणजेच, कोणत्या व्यासपीठावर कोणती कृती केली पाहिजे, याचे भान भारताने सदैव बाळगले. पण, चीनला ते भान राहिले नाही आणि त्याने तसे केले. कारण, चीन आधीपासूनच भारतविरोधाची भूमिका घेत आला. गलवान संघर्षापासून तर चीनने संधी मिळेल, त्यावेळी भारतीय सीमेतून अतिक्रमण करण्याचे, घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले. अर्थात, चीन त्यात कधीही यशस्वी झाला नाही. चीनच्या प्रत्येक कुरापतीला भारताने जशास तसे उत्तर दिले. गलवान संघर्षावेळीही भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करत त्यांना पळवून लावले, ठार मारले. सुरुवातीला चीनने आपल्या सैनिकांनी भारताकडून मार खाल्ल्याची कबुली दिली नाही, पण नंतर मात्र त्याने ते मान्य केले. त्याचेच दुःख अजूनही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मनात ठसठसत आहे. महासत्तेशी बरोबरी करणाऱ्या चीनला भारताने धडा शिकवल्याची वेदना त्यांच्या मनात आहे. गलवान संघर्षातील जखमी वा मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची नावे उघड न करणे असो वा यंदा नववर्षारंभी ध्वनिचित्रफित जारी करुन गलवान खोऱ्यावर ताबा मिळवल्याची अफवा पसरवणे असो, चीनने भारतावर दबाव आणण्याचे जमेल ते प्रयत्न केले. पण, भारतीय सैन्य आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दृढ इच्छाशक्तीपुढे चीनलाच गुडघे टेकावे लागले. त्यावर उत्तर म्हणून चीनने जखमी सैनिकाकडे ‘मशाल रॅली’चे नेतृत्व सोपवले आहे. यातून चीनचा भारतविरोधी प्रपोगंडा वाढवण्याचा कावाच दिसून येतो.
कारण, चीनमधील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवरअमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह कोसोवा या देशांनी उघूर मुस्लिमांवरील अत्याचार व चीनची माजी टेनिसपटू पेंग शुआईने एका चिनी अधिकाऱ्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बहिष्कार टाकलेला आहे, तर या स्पर्धेतभारताकडून एकच स्पर्धक सहभागी होत आहे. खरे म्हणजे, भारतही वरील मुद्द्यांवरुन चीनचा विरोध करत ऑलिम्पिक स्पर्धांपासून दूर राहू शकला असता. पण, भारताने अमेरिका व चीनमधील शीतयुद्धाकडे दुर्लक्ष केले आणि हिवाळी ऑलिम्पिमध्ये भाग घेण्याचे ठरवले. म्हणजेच, दोन्ही देशांतील सीमावाद, सीमासंघर्षाला भारताने क्रीडा मैदानात, क्रीडा स्पर्धेत आणले नाही. उलट ऑलिम्पिकच्या माध्यमातून तणाव निवळला तर ठीकच, असा विचार करत संबंध सुधारण्यासाठी कृती केली. पण, चीन आपल्या वर्चस्ववादी, इतरांची जमीन हडपण्याच्या धोरणातच इतका गुरफटलेला आहे की, त्याने ऑलिम्पिक स्पर्धांचा वापरही भारतावर मात करण्यासाठी केला. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण यातून चीनचीच असलियत जगासमोर येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.