मनसेची संभ्रमावस्था

    04-Feb-2022   
Total Views |

MNS
लोकसभा निवडणुका असो नाहीतर विधानसभेच्या निवडणुका असो, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेबद्दल चर्चा ही होतेच. मुंबई, नाशिक, ठाणे या प्रामुख्याने शहरी जिल्ह्यांपुरत्या मर्यादित असणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना भरभरुन प्रतिसाद मिळतो, पण त्याचे रुपांतर मतदानात मात्र होत नाही, हे विविध निवडणुकांमधून वारंवार सिद्ध झाले आहे. त्यातच मनसेने त्यांचा झेंडा बदलून हिंदुत्वाचा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावर घेतला. त्यानंतर मनसे आणि भाजपच्या युतीबाबतच्या चर्चांनाही उधाण आले. परंतु, नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्याने, येत्या काळात मनसे महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपला प्रभाव दाखवू शकेल का, ते मात्र पाहावे लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकांमध्ये मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु, सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याने सद्यस्थितीत मुंबईत मनसेचा केवळ एकच नगरसेवक आहे. इतर पालिका क्षेत्रांमध्येही मनसेला पक्षांतराचा असाच फटका बसला. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकांमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा तरी पक्षाला तारु शकेल का, हाच खरा प्रश्न! प्रादेशिक अस्मितेला कवटाळलेल्या मनसेने हिंदुत्वाची साद दिली खरी. पण, हिंदुत्वावादी म्हणून मनसेला जनता कितपत साथ देते, याबाबतही साशंकता आहेच. तसेच मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकताच स्पष्ट नकारही दिला. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपची ‘बी टीम’ म्हणून टीका होणाऱ्या मनसेवर आता पालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्याचबरोबर मनसेचा इतर राज्यातील कामगारांच्या विरोधाचा मुद्दा हा इतर राष्ट्रीय पक्षांना मनसेला पाठिंबा देताना अडचणीचाच ठरावा. त्यामुळे मनसे समोर पक्षबांधणी, कार्यकर्त्यांना पक्षाचा ठोस कार्यक्रम देण्याबरोबरच, मतदारांची मने वळविण्याचेही मोठे आव्हान दिसते. तेव्हा, आगामी काळात राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘नवनिर्माण’ घडविते की राजकीय बाणांनी घायाळ होते, ते येणारा काळच ठरवेल!
 

मनोरंजनाचा ओव्हर डोस...

 
तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांमुळे मनोरंजन क्षेत्राचे आयामही ३६० अंशाच्या कोनात बदलले. ‘टेलिव्हिजन’ मागे पडून आज सोशल मीडिया आणि ‘ओटीटी’चे युग अवतरले. त्यामुळे साहजिकच ज्याप्रमाणे आणि ज्या वेगाने आज माध्यमांचे स्वरुप बदलत आहे, त्याप्रमाणे नव्या पिढीचे विषय आणि मजकुराची पद्धतसुद्धा बदलताना दिसते. त्यामुळे ‘टेलिव्हिजन’आणि नवमाध्यमांतील आशयाची तुलना होणेसुद्धा तितकेच क्रमप्राप्त म्हणा. याच अनुषंगाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकतेच एका कार्यक्रमामध्ये बोलताना “भिकार मालिका बघणे सोडा,” असा प्रेक्षकांना सल्लावजा आवाहन केले आणि त्यांच्यावर टीकेची झोडही उठली. परंतु, गोखलेंच्या विधानाचा नेमका संदर्भ लक्षात घेऊन सध्याच्या ‘टेलिव्हिजन’ मालिकांच्या आशयाचे विश्लेषण केले, तर नव्वदीच्या दशकातीलच विषयांची अजूनही चलतीच असल्याचे दिसते. मालिकांची ‘टीआरपी संस्कृती’ बघता सध्या काही चांगल्या मालिकांना अल्प प्रतिसाद आणि विशिष्ट आशयघन नसलेल्या मालिकांची मात्र ‘टीआरपी’मुळे चलती, असे चित्र खेदाने पाहायला मिळते. त्यामुळेच गोखले यांच्या विधानाचा गांभीर्याने विचार करणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. परंतु, संपूर्ण मालिकाविश्वातील सरसकट आशयच दर्जाहीन आहे, हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. कारण, ‘टेलिव्हिजन’वरील काही आशयघन मालिका मागील काळामध्ये ‘टीआरपी’ नसल्याने बंद पडल्याची उदाहरणे ताजी आहेत. या क्षेत्रामधील मान्यवरांनी त्याबाबतही सध्या बोलणे गरजेचे आहे. कारण, मालिकांमधील एकूणच आशयाची मिमांसा करताना, त्यातील रटाळपणा, नाविन्याचा अभाव आणि तोच तोचपणा, वास्तवाला धरुन नसणारे कथानक या बाबी प्रामुख्याने अधोरेखित कराव्या लागतील. त्यामुळे अखेरीस टीव्हीचा रिमोर्ट प्रेक्षकांच्याच हाती असल्याने काय पाहायचे अन् काय नाही, हा निर्णयही म्हणा ज्याचा-त्याचा. पण, मालिकाविश्वातील निर्माते, अभिनेते, दिग्दर्शकांनाही चौकटीबाहेर जाऊन मालिकांच्या आशयाचा, कथानकाचा कसा विचार करता येईल, याबाबत आत्मपरीक्षण करण्याची आज तितकीच गरज आहे. आपण दिग्दर्शित केलेल्या, निर्मिती असलेल्या मालिका प्रेक्षक पाहतातच, असे प्रेक्षकांना, त्यांच्या आवडीनिवडीला गृहित धरणे जेव्हा मनोरंजन क्षेत्रात सर्वार्थाने थांबेल, तेव्हा आणि तेव्हाच मालिकाविश्वातील आशयाचा दर्जा वृद्धिंगत होईल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

स्वप्निल करळे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'मास मीडिया' आणि 'फोटोजर्नालिझम' पदविका. राज्यशास्त्र विषयामध्ये 'एम.ए.'. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत' वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. महाविद्यालयीन काळापासून विविध वर्तमानपत्रांमध्ये लेखन. मनोरंजन, चित्रपट कथा, पटकथा लेखन आणि शोधपत्रकारितामध्ये विशेष प्रावीण्य. मुखपृष्ठकथा, पुस्तक बांधणी, प्रकाशन क्षेत्रामधील अनुभव. 'माणसांच्या गर्दीत माजलेलं काहूर' कवितासंग्रह प्रकाशित.