मुंबई: पालिकेच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के, तर नदीकिनारी संरक्षक भिंतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच मिठी नदीवरील उर्वरित कामांसाठी ५६५.३६ कोटींची तरतूदही यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने केली. पण, मिठीचे खोलीकरण, रुंदीकरण ८०-९० टक्के पूर्ण झाले असेल तर दरवर्षी नदीला पूर येऊन मुंबईची 'तुंबई' का होते, हा प्रश्र्न अनुत्तरीतच राहतो!
दि. २६ जुलै २००५च्या महापुरानंतर मिठी नदी मुंबईकरांच्या मनात कायमच्या कटू आठवणी निर्माण करुन गेली. मिठीला 'थेम्स' नदीसारखे चकाचक बनविण्याची मुंबईकरांना स्वप्नं दाखवणाऱ्या पालिकेने आजवर दोन हजार कोटींहून अधिक पैसा मिठी नदीवर पाण्यासारखा खर्च केला. पण, मान्सूनमध्ये मुंबईतील परिस्थिती आजही 'जैसे थे'च आहे. केवळ पालिकाच नव्हे, तर एमएमआरडीएने देखील कोट्यवधी रुपये मिठी नदीच्या स्वच्छता, साैंदर्यीकरणावर खर्ची घातले. पण, दोन्ही सरकारी यंत्रणांना एकत्रितपणेही १७ वर्षांनंतरही मिठीचा चेहरामोहरा मात्र दुर्देवाने बदलता आलेला नाही.
आज जी गत मिठीची, तीच परिस्थिती इतर नाल्यांचे स्वरुप धारण केलेल्या मुंबईतील दहिसर, पोयसर, ओशिवरा, वालभट्ट या नद्यांची. या नद्यांच्या पुनरुज्जीवनाला स्थायी समितीची मंजुरी असली तरी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कार्यादेशाचा पत्ता नाही. पण, तरीही या नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे या नद्यांची कामेही आगामी मान्सूनपूर्वी पूर्ण होेतील, याची शक्यता शून्यच! म्हणूनच मलिष्का-महापाैरांच्या काव्यात्मक थाटातच म्हणावेसे वाटते की, मिठीचे पात्र खोल खोल, अन् पैशांचा सगळा छोल छोल!!!