
सहस्रशीर्षा पुरुष:
सहस्राक्ष: सहस्रपात्।
स भूमिं विश्वतो वृत्वा
अत्यतिष्ठद् दशाङ्गुलम्॥
(ऋग्वेद -१०.९०.१)
अन्वयार्थ
(पुरुष:) समग्र जगात व्यापलेला पुरुष परमेश्वर हा (सहस्र-शीर्षा:) हजारो मस्तके असलेला आहे. तसेच (सहस्र-अक्ष:) हजारो डोळे असलेला आणि (सहस्र-पात्) हजारो पाय असलेला आहे. (स:) तो (भूमिं) या भूमीला (विश्वत:) चहुबाजूंनी (वृत्वा) व्यापून स्थित आहे. तरीदेखील, असे असतानाही तो (दशाङ्गुलम्) दहा अंगुळांनी, दहा इंद्रियांनी (अति+अतिष्ठत्) अतिशय दूर थांबला आहे. म्हणजेच तो त्यांच्याकडून ग्रहण केला जाऊ शकत नाही.
विवेचन
वैदिक संहितांमध्ये पुरुषसूक्ताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही संहितांमध्ये थोड्या फार फरकाने या पुरुषाविषयीचे मंत्र आलेले आहेत. ऋग्वेदीय पुरुषसूक्तात १६ मंत्र आले आहेत. यजुर्वेदीय पुरुषसूक्तात २२ मंत्र आहेत. सामवेदात सात मंत्र, तर अथर्ववेदात १६ मंत्र! इतक्या मंत्रसंख्येने त्या त्या सूक्तात पुरुषाचे वर्णन आढळते.
‘पुरुष’ शब्दाचे अनेक अर्थ होतात. आम्हाला फक्त मानवी शरीर धारण करणारा पुरुषच माहीत आहे. पण, खर्या अर्थाने समग्र ब्रह्मांडाला निर्माण करणारा, संचालित करणारा व संहार करणारा तो परमपुरुष म्हणजेच ईश्वर होय. तोच समग्र सृष्टीसमूहाचे भरणपोषण व धारणदेखील करतो. म्हणून त्याला ‘महान पुरुष’ असेदेखील म्हणतात. ‘पुरुष’ शब्दाची व्याख्या करताना निरुक्तकार आचार्य यास्क म्हणतात-
पुरुषः पुरिषाद: पुरिशय: पूरयतेर्वा।
तेनेदं पूर्णत: पुरुषेण सर्वम्।(निरुक्त २.३)
म्हणजेच ज्याने आपल्या सत्तेने समग्र जगाला परिपूर्ण केले आहे, अथवा जो ब्रह्मांडरुपी किंवा शरीररुपी नगरीमध्ये शयन करतो, तो पुरुष होय.
सामान्यपणे पुरुषाला एक मस्तक, दोन डोळे, दोन हात, दोन पाय असतात. परंतु, इथे या पुरुषासाठी हजारो मस्तके वर्णिली आहेत. खरेतर डोळे, हात, पाय हे दोन-दोन असतात, म्हणून याप्रसंगी यांना द्विसहस्राक्ष:, द्विसहस्त्रबाहु:, द्विसहस्त्रपात् असे म्हणावयास हवे होते. पण, ही वेदांची भाषा आहे. इथे ’सहस्रशीर्षा’इत्यादी पदांमध्ये ‘सहस्र’ शब्द उपलक्ष होऊन अनंत, असंख्य असा अर्थ प्रकट होतो. त्यामुळे असा अर्थ निघतो की, त्या परम पुरुषास असंख्य मस्तके, असंख्य डोळे, असंख्य हात व असंख्य पाय आहेत. त्याचबरोबर त्याला इतर अवयवदेखील असंख्यच आहेत. इतके त्याचे व्यापक विराट स्वरूप आहे. यामुळेच तर तो या समग्र ब्रह्मांडातील विविध जड व चेतन तत्त्वांपर्यंत पोहोचतो. असंख्य मस्तके असल्यामुळे आपल्या ज्ञानशक्तीने तो सर्वांना जाणतो. कुठे काय चालले आहे, याची जाणीव त्याला ताबडतोब होते. त्याची मस्तकशक्ती इतकी सूक्ष्म व सर्वदूर आहे की, त्याच्यापासून कोणीही काहीही लपवून ठेवू शकत नाही. तसेच त्याचे नेत्रदेखील असंख्य आहेत. म्हणूनच तो सर्वद्रष्टा आहे. त्याच्या दिव्यदृष्टीपासून कुणालाही काही झाकता येत नाही. या अनंत विश्वात घडणार्या प्रत्येक घटनेवर त्याचे लक्ष आहे. तो सर्वांना पाहतोय. आम्ही सांप्रत विज्ञानयुगात अवैध धंदे किंवा चोरीच्या घटना पकडण्यासाठी ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावत आहोत. तरीही मोठ्या प्रमाणात नको त्या अनिष्ट घटना घडतातच, पण त्या विराटपुरुषाचे असंख्य नयनांतील दृक्शक्ती इतकी विलक्षण आहे, असे हजारो ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावा किंवा राखणदार ठेवा अथवा इतर पोलीस यंत्रणा वा संगणकीय तंत्रप्रणालीने कितीही अनर्थांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, शेवटी या घटना घडतातच. पण, तो परमपुरुष मात्र सर्वांना पाहणारच! यावरून हे लक्षात येते की, तो महानपुरुष आपल्या अनंत नेत्रज्योतींमुळे सर्वव्यापक ठरतो. या सर्व विश्वात त्याची सत्ता विद्यमान आहे. सर्वांवर तो नियंत्रण ठेवतो. त्याला असंख्य पाय आहेत. ब्रह्मांडातील सर्व मार्गावर हे अदृश्य पाय चालत असतात.
किती आश्चर्य पाहा! इतक्या इंद्रिय व अवयवांनी परिपूर्ण असलेला हा परमपुरुष इतर माणसे किंवा प्राण्यांद्वारे मात्र इंद्रियातीत आहे. मनुष्य आपल्या दहा इंद्रियांपैकी एकाही इंद्रियाद्वारे त्या परमपुरुषाला आपला विषय बनवू शकत नाही. माणसाचे डोळे त्याला पाहू शकत नाहीत. कानांनी त्याला ऐकू शकत नाही. जिभेने तो आस्वादला जाऊ होऊ शकत नाही. नासिकेद्वारे त्याला हुंगता घेता येत नाही. त्वचेने त्याला स्पर्श करता येत नाही. पायाने चालून त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच ऋषिजन म्हणतात-
‘न तत्र चक्षु: गच्छति
न वाग् गच्छति नो मन:।’
म्हणजेच तो ‘इंद्रियअगोचर’ आहे. इतका सूक्ष्मातिसूक्ष्म आहे की, सहजासहजी त्याला कोणीही प्राप्त करू शकत नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी योगसाधनेशिवाय दुसरा पर्याय व उपाय नाही. तो इतका विशाल आहे की, या समग्र भूमीला सर्व बाजूंनी व्यापून थांबला आहे. असे असले, तरी तो ‘दशांगुळे’ म्हणजेच पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये अशा दहा इंद्रियांपासून अतिशय दूर आहे. या इंद्रियांद्वारे तो प्राप्त होऊ शकत नाही. इतका तो निराकार, निरवयव व सर्वव्यापक आहे. त्याच्यापासून कोणीही काहीही लपवून ठेवू शकत नाही. वाईट कृत्ये करणार्या पापी लोकांनी कितीही मोठ्या प्रमाणात चोरी, लबाडी, भ्रष्टाचार, दुराचार इत्यादी अनिष्ट कामे करावीत, त्या परमपुरुषाची अचाट सामर्थ्यशाली बुद्धी हे सर्व काही जाणून घेणारच. कारण, त्याला असंख्य मस्तके आहेत. वाईटांच्या अनेक दुष्कर्मांना त्याचे असंख्य डोळे पाहतातच, तर त्याची असंख्य पाय हे तिथे येऊन त्याला दंड देणारच.
असा तो महान बलशाली परमेश्वर पुरुष सर्वत्र विद्यमान आहे. म्हणूनच ही सारी सृष्टी अगदी सुव्यवस्थितरित्या मार्गक्रमण करीत आहे. या सार्या ब्रह्मांडाला त्यांने व्यापून सोडले आहे. अशी कोणतीही जागा नाही की, जिथे हा पुरुष पोहोचत नाही. कारण, ‘ईशावास्यमिदं सर्वम्।’ या जगातील प्रत्येक वस्तू त्या महान परमेश्वराने व्याप्त आहे. म्हणूनच कोणीही कितीही प्रयत्न करोत, या ईश्वराच्या सत्य न्याय व्यवस्थेपासून कोणीही सुटू शकत नाही. असा हा भगवंताचा व्यापकभाव व त्याचे दिव्य-विराट स्वरूप जो आत्मसात करतो, तो निश्चितच नानाविध पापांपासून दूर राहतो आणि आपले जीवन सन्मार्गावर नेत यशस्वी ठरतो.
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८