साहेब आणि धुणीभांडी

    27-Feb-2022   
Total Views |

Uddhav Thackeray
 
 
 
भाजप पक्षाने केंद्रात सत्ता जिंकली, राज्यात जिंकली आणि महानगरपालिकेत पण जिंकायचे आहे का? तुम्हाला सगळेच पाहिजे. मग, आम्ही काय धुणीभांडी करायची का? असे पहिल्या पाचमध्ये ‘बेस्ट सीएम’ असलेल्या साहेबांनी विचारले आहे. साहेबांच्या विचारांना शतश: प्रणाम! साहेबांना वाटले की, भाजप केंद्रात आणि राज्यात जिंकले. म्हणजेच आता महानगरपालिकासुद्धा खेचून घेणार? खरे तर साहेबांना हे वाटूच शकते. कारण, त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी महाराष्ट्राने नाकारले असतानाही महाराष्ट्राच्या डोक्यावर सत्ताधारी म्हणून बसण्याचे पाप केले. आपण कशी महाराष्ट्रात सत्ता बळकावली तसे भाजपनेही केले तर? ही भीती साहेबांना वाटते. त्यामुळेच ते म्हणतात, तुम्हाला सगळेच पाहिजे. मग, आम्ही काय धुणीभांडी करायची का? साहेब चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मले. गरीब हतबल माणसाच्या आयाबायांच्या वेदना, दु:ख त्यांनी पाहिलेही नसेल, तर अनुभवणे दूरची गोष्ट. आजही महाराष्ट्रात चार घरची धुणीभांडी करून आपल्या मुलाबाळांचे आयुष्य घडवणार्‍या आयाबाया प्रत्येक वस्तीत आहेत. आधारकार्ड बनवण्यासाठी हाताच्या रेषांचे ठसे घेताना असेही लक्षात आलेले की, दिवसभर धुणीभांडी करून त्यांच्या हातावरच्या रेषा गायब झाल्या होत्या. प्रचंड तडजोड, हतबलतेतसुद्धा या धुणीभांडी करणार्‍या इज्जतदार आयाबायांनी ना नीतिमत्ता सोडली ना कुटुंबाशी, समाजाशी किंवा देशाशी गद्दारी केली. याच आयाबायांची, त्यांच्या घरच्यांची मते मागून गेले. ३० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांना, उद्धव ठाकरेंना धुणीभांडी म्हणजे ‘हीन’ काम वाटते. तुम्ही काय करता? हे विचारल्यावर एक धुणीभांडी करणारी गरीब महिला अभिमानाने सांगते की, मी चार घरची धुणीभांडी करते. साहेबांनी या महिलेइतकेच प्रामाणिकपणे एकदा सांगावे की, ते काय करतात? काय म्हणता? साहेबांनी पुर्ण कोरोना काळात ‘फेसबुक लाईव्ह’ केले आणि एक-दोनदा स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले आणि मुख्यमंत्रिपदाच्या पूर्ततेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गेले. वा... वा! साहेबांनी खरेच भव्यदिव्य जनकल्याणाचे आणि राष्ट्रनिर्माणाचे काम केले. त्यामुळे त्यांचा प्रश्न रास्त आहे की, त्यांनी काय फक्त धुणीभांडी करायची?
 
 
 
रोखूंगा नही साला...
 
ते भाजपचे रावसाहेब दानवे म्हणाले होतेच की, ‘झुकेगा नहीं, वाकेगा नहीं’ पण आता झोपायची वेळ आली. अगदी तसेच झाले. असा मी आव आणला होता. तोंडावर खोटं खोटं उसनं हसू आणले होते. जोरात ओरडून अगदी हात वर करून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘झुकेगा नहीं.’ पण आता पहिल्याच दिवशी बेडवर पडलो. काय म्हणता? असे मी कोणते महान कृत्य केले की मी झुकणार नाही? तर ‘नो कमेंट्स. प्लीज नो क्वेशन्स.’ बरं. वा... वा! माझ्या जत्रेत हरवलेल्या भावासारखा असलेल्या संजय भाऊंसारखे मीसुद्धा बोललो. बरे वाटते असे म्हटले की... कारण, काही उत्तर नसले की बोलणार काय? त्यापेक्षा ‘नो कंमेट्स. नो क्वेश्चन्स’ म्हटले की झाले. मला ते माझे सोन्यासारखे दिवस आठवतात. दररोज उठायचे. माईक हातात घ्यायचा. मनाला येईल ते बोलायचे. त्याची बातमी व्हायची. माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये गेले वर्षभर मला जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकी कधीच मिळाली नाही. माशाअल्ला! काय दिवस होते. काय म्हणता? गेल्या वर्षभरात आयुष्याला पुरतील इतक्या शिव्या मिळाल्या? इतकी निंदा झाली? असे कसे? असे कसे? शाहरूख खानच्या मुलाची आर्यन खानची केस आठवते ना? शाहरूख खान. गौरी भाभी आणि आर्यनचे वकील काय लढतील, असा मी लढलो. मग अल्पसंख्याक विभागाचा मंत्री होतो ना? काय म्हणता मग गरीब अल्पसंख्याक समाजासाठी का लढलो नाही? असे बोलून तुम्ही माझ्यासारख्या अल्पसंख्याक माणसाचा अपमान करत आहात. मी नवाब मलिक अल्पसंख्याक आहे, मी अल्पसंख्याक आहे, समजलं. लोक हो, बघा बघा किती असहिष्णुता. अन्याय आहे हा. काय झाले हवाला प्रकरण केले तर? मैं चाहे ए करू, मैं चाहे वो करू! पण आता कसले काय? ‘ईडी’ने पार आयुष्याला काडी लावली. साहेबांनी मंत्रिपद घालवले नाही अजून. साहेबांची कृपा. अल्ला खेर करे. आमच्या जमातचे लाड करणारे साहेबच. १९९३चा त्यांनी सांगितलेला तो तेरावा बॉम्बस्फोट आठवून आताही साहेबांना सलाम करावासा वाटतो. पवार! नाही... नाही. आपली ती ‘पॉवर’ दाखवा साहेब. मी तर फक्त ‘झुकूंगा नही’ म्हणालो, पण हे ‘ईडी’वाले ‘रूकूंगा नही’ म्हणत पाठीच पडलेत. अरे, हे काय ऐकू आले? ‘ईडी’को रोखूंगा नही साला! कोण ते मनातल्या मनात म्हणाले? साहेब...साहेब..
 
  
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.