पोर्तुगालच्या चर्चचे पाप

    26-Feb-2022   
Total Views |

church
 
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या बातम्यांनी प्रसारमाध्यम वेढली आहेत. पण, या युद्धाच्या बातम्यांमुळे इतर अनेक जागतिक घडामोडींकडे जागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातली एक महत्त्वाची घटना म्हणजे नुकतेच पोर्तुगीज कॅथोलिक चर्चचा अहवाल. बाललैंगिक शोषणाविरोधात चर्चने सहा जणांची समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात समितीकडे २०० जणांनी तक्रार केली की, पोर्तुगीज कॅथोलिक चर्चमध्ये चर्चच्या संबंधित धर्मव्यवस्थेतील व्यक्तींकडून त्यांचे बालपणी लैंगिक शोषण झाले होते. पण, भितीने, लाजेने त्यांनी ती गोष्ट कुठेही सांगितली नाही. यावर पोर्तुगालमध्ये वादळच उठले. कारण, या देशात ९५ टक्के लोक कॅथोलिक पंथाचे. असे जरी असले तरी या अहवालासंदर्भात कुठेही जास्त वाच्यता झाली नाही. कारण, त्याआधी फ्रान्समधील अशाच एका अहवालात चर्च व्यवस्थेतील व्यक्तींकडून लैंगिक शोषण झालेल्या हजारो पीडितांसंदर्भातला अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी कॅथोलिक चर्च आणि तिथल्या अनेक गोष्टींवर मग जगभरात चर्चा झाली होती. त्यामुळे कॅथोलिक चर्च व्यवस्थेला मोठ्या निंदेला सामोरे जावे लागले होते. फ्रान्सनंतर आता पोर्तुगालमध्ये कॅथोलिक चर्चबाबातची ही घटना.
 
१९३३ ते २००६ सालापर्यंत जन्मलेल्या २१४ लोकांनी एका महिन्यात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल माहिती दिली. ही माहिती ऑनलाईन नोंदवली आहे. माहिती म्हणण्यापेक्षा तक्रारच म्हणू शकतो. कारण, पोर्तुगीज कॅथोलिक चर्चने बालकांच्या लैंगिक शोषणाला आळा बसावा म्हणून स्थापन केलेल्या सहा जणांच्या समितीकडे ही तक्रार नोंदवली गेली आहे. या समितीमध्ये एक बालमानसोपचार तज्ज्ञ, एक सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश, एक सामाजिक कार्यकर्ता आणि तीन इतर सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींची नियुक्ती केलेली असते. या आधीही अशा तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. पण, दोन वर्षांत १२-१३ इतकीच त्यांची संख्या होती. २०२२च्या प्रारंभीच या २१४ जणांची तक्रार आली त्यामुळे पोर्तुगाल कॅथोलिक चर्चव्यवस्था चिंतेतआहे. मात्र, तरीही चर्च आणि समितीचे म्हणणे आहे की, या तक्रारी ऑनलाईन आहेत आणि त्यातले काही जण तर पोर्तुगालचे नागरिकत्व सोडून इतर देशांत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या तक्रारींची सत्यता कशी मानायची? तसेच काही कट्टर कॅथोलिक धर्मीयांनी असेही प्रश्न विचारलेकी, १९३३ साली जन्मलेल्या व्यक्तीनेही आता म्हणजे वयाच्या ९०व्या वर्षी तक्रार नोंदवली की, बालपणी त्याचे शोषण झाले होते. या व्यक्ती इतक्या वर्षांनंतर का व्यक्त होत आहेत? इतकी वर्षं त्या गप्प का होत्या? काहीही असो. पण, दयाळू येशूच्या कृपेची बरसात सगळ्या जगभर करू इच्छिणार्‍यांचीयामुळे अडचण झाली आहे. निष्पाप बालकांचे बालपण क्रूरतेने हिरावून घेणारे, बालकांवर अत्याचार करणार्‍या नराधमांचे पाप कोण शिरावर घेणार? येशू सगळ्यांची पापं आपल्या अंगावर घेतो वगैरे म्हणत धर्मांतराचा उच्छाद मांडणारे आता बालकांवर अत्याचार करणार्‍या पाप्यांची पापं कोण शिरावर घेईल हे सांगतील का? पोर्तुगाल देशात या अहवालाचे पुढे काय झाले? तर हेच झाले की, या तक्रारी नोंदवणारे खरे की खोटे, याची तपासणी सुरू आहे. तसेही पोर्तुगाल देशाचे कायदे जगावेगळेच आहेत म्हणा. जसे या देशात मादक पदार्थांचे (चरस, गांजा, हेरॉईन, कोकेन वगैरे)दहा डोस व्यक्ती स्वतःसोबत ठेवू शकतो. देशात देहविक्रीविरोधात ठोस कायदा नाही, तसा तो गुन्हाही नाही. देशात १८ वर्षांवरील व्यक्ती शस्त्र बाळगू शकतात, १४ वर्षांवरील व्यक्ती कायदेशीररित्या लैंगिक संबंध ठेवू शकते. हे आणि इतर अनेक असेच कायदे या देशात आहेत. या देशात बालकांवर असा अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. चर्चमध्ये नोंदवल्या गेलेल्या या गुन्ह्यांचे काय होणार हा मात्र प्रश्न आहे.
काही लोकांच्या मते, इतर युरोपियन देशांपेक्षा पोर्तुगाल हा कुटुंबव्यवस्था मानणारा आहे. पोर्तुगाल देशात धर्मासंदर्भातले कडक नियम आहेत. कॅथोलिक ख्रिस्ती धर्माच्या सर्व रूढी, प्रथा-परंपरा हा देश प्रामाणिकपणे जपतो. अर्थात पोर्तुगीजांच्या रूढी पंरपरा काय आहेत, याच्या खुणा भारतीयांनी गोव्यातील पोर्तुगीजांच्या क्रौर्यात अनुभवल्या आहेतच. आज त्याच पोर्तुगालमध्ये चर्चच्या व्यवस्थेचा हा दुसरा अतिशय संतापजनक आणि घाणेरडा चेहरा जगासमोर आला आहे. या अनुषंगाने भारत आणि आशियाई देशामध्ये कॅथोलिक चर्चचा अशा प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.