मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वारंवार लागणा-या आगीनंतर अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारत तपासणी प्रणाली विकसित केली जात असून लवकरच अग्निसुरक्षा बाबत एकत्रितरित्या सर्व माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कळवले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईत लागणा-या आगी व उपाययोजना बाबत तक्रार करत आरोप केला होते. अग्निसुरक्षा बाबत कोणत्याही प्रकाराची माहिती उपलब्ध केली जात नाही, असा त्यांचा प्रमुख आरोप होता. अनिल गलगली यांच्या तक्रारीची दखल मुंबई अग्निशमन दलाने गांभीर्याने घेतली आहे. भविष्यात मुंबई शहरातील सर्व इमारतीतील अग्निसुरक्षा संबंधीची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध होणाच्या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर माहिती एकत्रितरित्या उपलब्ध होणार आहे, असे अग्निशमन प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले आहे.
मुंबई अग्निशमन दलाकडे शहरातील वर्ष २००६ पूर्वी बांधलेल्या सर्व इमारतींची माहिती उपलब्ध नसून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मधील कलम ३(१) आणि ३(३) नुसार माहे जानेवारी २०२२ मध्ये प्राप्त झालेले २५५६ फार्म बी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. अग्निशमन दलातर्फे माहे जून २०२१ पर्यंत ६४२३ व्यक्तींना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर जून २०२१ पासून ८५० नागरिकांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. मॉक ड्रिल, एव्हँक्यूएशन ड्रिल, गृहिणीकरिता एलपीजी वायूची हाताळणीबाबत ९५ प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर मागील ५ वर्षात आगीच्या एकूण संख्येत घट झाली आहे. यात वर्ष २०१७ मध्ये ४४५४, वर्ष २०१८ मध्ये ४९५९, वर्ष २०१९ मध्ये ५३२४, वर्ष २०२० मध्ये ४५१२ आणि वर्ष २०२१ मध्ये ३५१५ अशी संख्या आहे.