निर्जीव भिंतींना जीवंत करणारा ‘समाधान’

    24-Feb-2022   
Total Views |

Samadhan Bhandari
 
 
बारावीत नापास होऊनही त्याने मागे न हटता नव्या वाटेने प्रवास करत स्वतःला सिद्ध केले. जाणून घेऊया अशा या निर्जीव भिंतींना जीवंत करणार्‍या समाधान भंडारी याच्या जीवनप्रवासाविषयी...
  
 
समाधान निवृत्ती भंडारी याचा जन्म नवी मुंबई येथील बेलापूरचा. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण ‘विद्या प्रसारक हायस्कूल’मध्ये झाले. बालपणी समाधान परिसरात ‘बॅन्जो’मध्ये ढोल-ताशाही वाजवत. दहावीपर्यंत समाधान शाळेतील विविध चित्रकला स्पर्धांमध्ये भागही घेत असे. टिव्हीवर ‘पोगो’ वाहिनीवर ‘मॅड’ प्रोग्राम लागल्यावर त्यातील बर्‍याच गोष्टी चितारण्याचा मोह समाधानला व्हायचा. त्यासाठी तो आपल्यापरिने प्रयत्नदेखील करायचा. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत झाल्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी भाषेत असल्याने समाधान बारावीत नापास झाला. त्यानंतर पुढे काय, असा मोठा प्रश्न त्याला पडला. एके दिवशी बेलापूरला फेरफटका मारताना समाधानला हर्षद मुंबईकर हा मित्र भेटला. हर्षदने त्याला घरी नेत चित्रकलेविषयी माहिती दिली. याआधी चित्रकलेतही ‘करिअर’ असते, याची समाधानला मुळी माहितीच नव्हती. मात्र, हर्षदच्या मार्गदर्शनानंतर समाधानला चित्रकला विश्वात प्रवेश करण्याची इच्छा निर्माण झाली. यासाठी त्याने आई-वडिलांनाही विचारलं. कुटुंबीयांचा होकार मिळाल्यानंतर तरलो-बुडलो तरी हरकत नाही, असा विचार करत समाधानने चित्रकलेचे शिक्षण घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रथम ‘एपीडी’पर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर ‘फाऊंडेशन कोर्स’ पूर्ण केला. शिक्षण घेत असताना चित्रकलेच्या शिक्षणातील आणखी बारकावे समाधानच्या लक्षात आले.
 
 
 
‘अप्लाईड आर्ट’मध्ये ते ‘इल्स्ट्रेशन’ हा विषय घेत २०१८ साली उत्तीर्ण झाले. वर्गात ‘पोर्टफोलिओ’मध्ये त्यांचा प्रथम क्रमांकही आला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सानपाडा येथील निशिकांत पलांडे यांच्या स्टुडिओमध्ये डिझायनर आणि ‘इल्स्ट्रेटर’ म्हणून त्याने काम करण्यास सुरुवात केली. एखादा प्रसंग कथन केल्यानंतर तो प्रसंग चित्रस्वरुपात रेखाटणे म्हणजे ‘इल्स्ट्रेशन.’ दरम्यान, ‘फाऊंडेशन’चे शिक्षण घेत असताना समाधानला एका ‘स्टार्टअप’च्या ठिकाणी भिंतींवर चित्र काढण्याचे काम मिळाले. या कामातून समाधानला पैसे मिळाल्यानंतर कुटुंबीयांना चित्रकलेतही करिअर करता येऊ शकते, याची खात्री पटली. त्यानंतर समाधानकडे कामांचा ओघ आणखी वाढला. बर्‍यापैकी पैसे मिळू लागल्याने स्वतःचा खर्च सुटू लागला. मात्र, त्यानंतर कोरोना काळ आला. काम नसल्याने अक्षरशः घरी बसण्याची वेळ आली. तो काळ अतिशय खडतर असल्याचे समाधान सांगतो. कोरोना काळात घरी असताना छोटीमोठी कामे केली. मात्र, घरी असल्याने पगार मिळाला नाही. घरच्यांनी कधी दबाव आणला नाही. मात्र, मनातून वाईट वाटत असल्याची खंत समाधानने बोलून दाखविली.
 
 
 
ठाणे जिल्ह्यातही बाळकूमजवळ भित्तीचित्रांची कामे समाधानने केली. यात हिमा दास, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांचाही समावेश होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्याअंतर्गत समाधान सध्या भित्तीचित्रे काढण्याचेही काम करतो. हे काम करत असताना अनेक नवनवीन अनुभव मिळत असल्याचे तो सांगतो. रस्त्याने ये-जा करणारी लोकं जवळ येऊन विचारपूस करतात. तसेच, फोन नंबरदेखील घेतात. परिणामी, जनसंपर्क वाढण्यासही मदत होते. चित्रकलेपेक्षा भितींवर चित्रे काढण्याचा हा प्रकार थोडा वेगळा आहे. या चित्रांद्वारे सामाजिक संदेश देण्याबरोबर जनजागृती करण्याचाही हेतू असतो. तसेच, ही चित्रे अनेकांवर परिणामकारक ठरत असतात आणि याला प्रेक्षकवर्गही अमाप असतो. कारण, ती सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला असलेल्या भिंतींवरच रेखाटली जातात. त्यामुळे कागदावरील चित्रांपेक्षा भित्तीचित्रे नेहमीच परिणामकारक ठरत असतात. सध्या समाधान भित्तीचित्रांमध्ये थ्रिडी पेंटिंग, ग्राफिक्स, रिअलस्टीक वर्क, असे अनेक प्रकारचे प्रयोग करतो. पोट्रेट, वॉटर कलर, लॅण्डस्केप, पेन्सिकल वर्क, ऑईल कलर, असे अनेक प्रकार समाधान हाताळतो. आई द्रौपदी, वडील निवृत्ती यांसह मित्र भावेश सोनार यांनीही या प्रवासात समाधानला यांना मोलाचे सहकार्य केले.
 
 
 
“चित्रकला असे क्षेत्र आहे, ज्यात तुम्ही अगदी शिकत असतानाच पैसे कमवू शकतात. शाळेत पालक आपल्या मुलाला चित्र काढता येत असेल, तर कौतुक करतात. पण, त्याच्याकडे करिअर म्हणून बघत नाहीत,” अशी खंतही समाधान व्यक्त करतो. पुढे तो म्हणतो की, “कोणत्याही गोष्टीकडे कलेच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. कोण काय करतो, असे विचारल्यावर मी भिंती रंगवतो असे सांगतो, तेव्हा अनेकजण आमच्या भिंती रंगवशील का, असा खोचक प्रश्न करतात. या क्षेत्रात का गेला, यातून काय मिळतं,अशा अनेक प्रश्नांची सवय झाली आहे. विशेष म्हणजे, असे प्रश्न करणारेच नंतर माझ्याकडे काम घेऊन येतात. बारावीत नापास झालो नसतो, तर आयुष्यात भिंती रंगवून कधीही लोकांना जागृत करता आले नसते.” त्यामुळे नापास झाल्यामुळेच आयुष्याला कलाटणी मिळाली आणि निर्जीव भिंतींना चित्रकलेच्या माध्यमातून जीवंत करण्याची संधी मिळाल्याचे समाधान यांचे म्हणणे आहे. भविष्यात स्वतःचा डिझाईन स्टुडिओ उभारण्याचे त्याचे स्वप्न आहे. नापास होऊनही नवी वाट चालण्याचा निर्णय घेऊन यशस्वी आगेकूच करणार्‍या समाधान भंडारीला आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.