उत्सव कलेचा, सन्मान गुणवंतांचा!

समुत्कर्ष वार्षिकोत्सव; सेवा सहयोग फाऊंडेशन

    23-Feb-2022   
Total Views |
 
 
seva
 
 
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सशक्त व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘समुत्कर्ष वार्षिकोत्सव’ २०२१ पासून सुरू झाला. यंदा दि. १३ फेब्रुवारी रोजी आंतर विभागीय स्तरावर कथाकथन, कविता वाचन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, प्रार्थना गायन, आर्ट क्राफ्ट स्पर्धांचे आयोजन केले गेले. यामध्ये ११ विभागांतील एकूण १९३ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २० फेब्रुवारी रोजी यशवंत भवन, लोअर परळ येथे होता. तळागाळातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांची आभाळभरारी हेच या कार्यक्रमाचे फलित म्हणावे लागेल. या कार्यक्रमाचा घेतलेला मागोवा...
 
 
'बी' मध्ये क्षमता असते. मातीला बाजूला सारून उत्तुंग वृक्ष होण्याची बीमध्ये क्षमता असते. पण, ते बी रूजायला तर हवे ना? हे रूजणे महत्त्वाचे. तेच काम ‘सेवा सहयोग समुत्कर्ष’ अभ्यासिका करत आहेत,” नाट्यकलाकार गौरी केंद्रे म्हणत होत्या. यशवंत भवन येथील समुत्कर्ष वार्षिकोत्सवाच्या त्या प्रमुख अतिथी होत्या. विविध कलागुण स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा सोहळा. यावेळी वर्षभर सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ग्रामीण ‘तारपा’ नृत्य, भरतनाट्यम, पोवाडा, स्वरचित कवितावाचन, कथाकथन तसेच अनुभवकथनही केले. उत्कृष्ट विभागांना फिरता चषक देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातले दुर्गम खेड्यातले आणि मुंबईतल्या झोपडपट्टी वस्तीभागातील अभ्यासिकेतील हे अतिशय गुणवान आणि प्रतिभासंपन्न विद्यार्थी. त्यांचे सादरीकरण पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले होते. या प्रेक्षकांमध्ये गौरी केंद्रेही होत्या. मुलांचा उत्साह आणि तोसुद्धा आत्मीय शिस्तीतला उत्साह पाहण्यासारखा होता. अर्थात, ‘सेवा सहयोग’च्या अभ्यासिकेतून मिळालेले हे संस्कार होते. २००९ पासून महाराष्ट्रातील विविध गरजू शाळांमध्ये शैक्षणिक आणि भौतिक स्वरूपातील मदत ‘सेवा सहयोग’ करत आहे. शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यावरण, ग्रामविकास, कौशल्य विकास, किशोरी विकास अशा विविध विषयांवर संस्थेतर्फे प्रकल्प राबवले जातात. २०१५ पासून ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या ‘समुत्कर्ष प्रकल्पा’अंतर्गत वस्त्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवल्या जातात.
 
 
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात १६० अभ्यासिका असून यात आठ हजार लाभार्थी विद्यार्थी आहेत. शहरी वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राहणार्‍या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी वर्षभरात स्वयंअध्यनासहित कला, क्रीडा, इतिहास, विज्ञान, गणित आणि इंग्रजी आदी विषयांवर अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. कार्यक्रमाला समाजात विविध क्षेत्रात कार्यरत आणि अग्रेसर असणारे मान्यवर उपस्थित होते. अभ्यासिकांचे शिक्षक, तसेच या अभ्यासिकांसोबत या ना त्या कारणाने जोडले गेलेले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येक विजेत्या स्पर्धकासच नव्हे, तर उपस्थित प्रत्येक विद्यार्थी गटांची किशोर मोघे आणि दीपाली मोघे यांना भेटण्यासाठी झुंबड उडाली. या विद्यार्थ्यांचे आणि या ‘सेवा सहयोग’च्या पदाधिकार्‍यांचे हे अतिशय हृदयस्थ नाते. इतकी आत्मियता आणि प्रेम! जे आजकाल दुर्लभ झाले आहे. अर्थात, ‘सेवा सहयोग’च्या या पदाधिकार्‍यांनी तशी नाती जपलीत म्हणूनच म्हणा. टाळी थोडी ना एका हाताने वाजते. असो, हॉलच्या बाहेर अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंची प्रर्दशिनी होती. तीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होती. हे सगळे पाहून मला ‘ते’ काही युवक आणि युवती आठवले, ज्यांना गाण्याची, वक्तृत्वाची आणि नेतृत्वाची आवड होती.
 
 
आपण गरीब आहोत किंवा तथाकथित मागास समाजातले आहोत, आपल्याला व्यासपीठ मिळणारच नाही, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी विद्रोहाच्या नावाने समाजविघातक चळवळींची साथ धरलेली. हातात डफली घेऊन समाजाच्या विरोधात गाणी गाण्यास सुरुवात केलेली. त्यांना कदाचित व्यासपीठ मिळाले नसेलही. त्यामुळे आज ‘सेवा सहयोग’च्या ‘समुत्कर्ष वार्षिकोत्सवा’मध्ये व्यासपीठावर गुणवान म्हणून सन्मानित होणार्‍या विद्यार्थ्यांना पाहून खूप बरे वाटले. कारण, ते नशीबवान होते. त्यांच्यातल्या कुणालाही अशी न्यूनगंडाची भावना निर्माण होणार नव्हती. ई-सेवा सहयोग’ने त्यांना ई-शैक्षणिक आणि उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम सहकार्य केलेच आहे, शिवाय त्यांच्या कलागुणांना मुक्तहस्ताचा वाव दिला आहे. माझ्यासाठी या वार्षिकोत्सवाचे हे महत्त्व खूप मोठे आहे. असो, ‘सेवा सहयोग’च्या अभ्यासिका केवळ अभ्यासापुरत्या सीमित न राहता, एक सशक्त पिढी घडविण्याचे सामर्थ्यशील व्यासपीठ आहे, असा विश्वास या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून येतो.
 
 

seva 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.