...अन्यथा सत्तेचा कडेलोट

    22-Feb-2022   
Total Views |
 
Shweta Mahale
 
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा सोहळा महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा झाला. शिवजन्मोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५०० लोकांना परवानगी देण्यात आली. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कारण काय, तर शिवजयंतीनिमित्त महाले यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहरातून महिलांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावर महाले यांनीही आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, “जिजाऊच्या लेकींनी शांततेच्या मार्गाने रॅली काढली होती. त्यामुळे आम्हाला जर गुन्हेगार ठरवले जात असेल, तर असे गुन्हे वारंवार करण्यासाठी आम्हीसुद्धा सज्ज आहोत.” दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात मोठ्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा १९ फेब्रुवारीला पार पडला. यावेळी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती. हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. म्हणजे सुपुत्राने हजारोंच्या गर्दीतही उद्घाटन सोहळ्यात मशाल पेटवायची आणि इकडे महिलांनी बाईक रॅली काढली, तर लगेेच नियमांचे उल्लंघन म्हणून गुन्हे दाखल करायचे. सर्वप्रथम मुख्यमंत्री महोदयांच्या सुपुत्रांनीच निर्बंधांना केराची टोपली दाखवली. दुसर्‍याला महाराष्ट्रद्रोही असे शिक्के लावायचे पण, प्रत्यक्षात स्वतःच महाराष्ट्रद्रोही कामे करुन उजळ माथ्याने फिरायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला तर अगदी नाशिकहून माणसं बोलावण्याची नामुष्की ओढावली. तेव्हा तर आपणच प्रतिपक्षप्रमुख असल्याची फेकमफाक करत राऊत घाम पुसत निघून गेले. मात्र, तेव्हा निर्बंध नसतात. सध्या ठाकरे सरकार मुलांना दररोज गृहपाठ द्यावा तसे गुन्हे दाखल करत आहे आणि तसंही मास्तर आपल्या मुलाच्या सर्व चुका पदरातच घेतो. महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि शिवजयंती साजरी केली म्हणून केवळ भाजपच्या आमदार आहेत म्हणून गुन्हे दाखल करायचे, असे दुटप्पी धोरण ठाकरे सरकार राबवत आहे. किमान समान कार्यक्रमाच्या नावाखाली सत्ता उपभोगत असताना कुठलाही भेद न करता समान न्यायाने काम करणेही गरजेचे असते. गुन्हे दाखल करायचेच असतील, तर आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा सत्तेचा कडेलोट व्हायला वेळ लागत नाही.
 
 
 
वंचित इच्छांना केराची टोपली?
 
लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. प्रत्येक पक्षाने आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. इकडे भाजप आणि शिवसेनेत राजकीय टोलेबाजी सुरू असताना तिकडे नागपूरात मात्र काहीतरी वेगळंच शिजतंय. तसा विषय काही फार जुना नाही मात्र, काँग्रेसने चक्क ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ म्हटल्याने या विषयाला पुन्हा एकदा तोंड फुटले. विषय असा आहे की, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत आगामी मनपा निवडणुकांसाठी आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा प्रस्तावदेखील त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला दिला होता. मात्र, एक महिना उलटूनही या प्रस्तावाला काँग्रेसने प्रतिसाद दिलेला नाही. विशेष म्हणजे, नागपूर काँग्रेसनेही मनपा निवडणुकीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन हायकमांडला अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वंचित आणि काँग्रेसचं सूत जुळणार का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कळस म्हणजे, काँग्रेस आपला हात द्यायला चाचपडत असताना वंचितचे प्रकाश आंबेडकर मात्र अजूनही प्रचंड आशावादी आहेत. अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही, त्यामुळे आमचा आघाडीचा प्रस्ताव कायम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याआधी ‘एमआयएम’च्या पतंगासोबत कपबशीने अगदी उत्तमरित्या संसार थाटला होता. एवढंच काय तर मोठमोठ्या वल्गना करून परिवर्तनाच्या गोष्टी केल्या होत्या. ‘जय भीम आणि जय मीम’चा नारा देण्यात आला होता. मात्र, पुढे औरंगाबादला ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील जिंकले आणि प्रकाश आंबेडकरांना मात्र, पतंग सोबत असूनही सोलापूरात पराभव पाहावा लागला. तसा पराभव त्यांच्यासाठी काही नवी गोष्ट नाही. पण, आता पुन्हा काँग्रेससोबत जाण्याच्या इच्छा व्यक्त करून ‘एमआयएम’सोबतच्या मैत्रीचं काय झालं, हे न शोधलेलं बरं... इकडे महाराष्ट्रात तळ्यात-मळ्यातचा खेळ सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशात प्रकाश आंबेडकरांनी लागलीच सपाला पाठिंबा जाहीर केला. हे म्हणजे नापास झालेल्या पोराने वर्गाबाहेर शिक्षा केलेल्या पोराला प्रोत्साहन दिल्यासारखंच. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेला लाखालाखांची मतं घेतली होती. नेत्यांची फळी, कार्यकर्त्यांची फौज, संघर्षाची तयारी आणि प्रकाश आंबेडकर हे वलयप्राप्त नाव... अनेक गोष्टी मर्यादीत स्वरुपात असल्या तरीही वंचितला जनाधार आहे. तो टिकवायचा असेल, तर वारंवार दुसर्‍याच्या सावलीचा आधार घेणं सोडून स्वतः आधारवड होण्यासाठी झगडावं. म्हणजे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चं दुःख पदरात पडत नाही.
 
 
७०५८५८९७६७
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.