‘हिजाब’ला विरोध; धर्मांधांकडून हिंसाचार, हिंदुत्त्ववाद्यांचा आरोप
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सुरू झालेला ‘हिजाब’वाद आता हिंसाचाराच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे.‘हिजाब’ला विरोध केल्याच्या रागातून एका २३ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी पहाटे कर्नाटकातील शिवमोग्गा येथे उघडकीस आला आहे. हर्ष असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. हर्ष याने समाजमाध्यमांवर ‘हिजाब’विरोधात लिखाण केल्यानेच काही धर्मांधांकडून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला. दरम्यान, या प्रकारानंतर घटनास्थळी ‘कलम १४४' लागू करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी हर्षने फेसबुकवर ‘हिजाब’विरोधात ‘पोस्ट’ लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने ‘हिजाब’ला विरोध करत ‘भगव्या’ वस्त्राचे समर्थन केले होते. याचाच राग मनात ठेवून रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री ४ ते ५ जणांनी या युवकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. हर्ष हा बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आरोपींविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कर्नाटकात काही विशिष्ट धर्मीय विद्यार्थीनींनी वर्गात ‘हिजाब’ घालून बसण्याचा अट्टाहास केला. या विद्यार्थिनींची मागणी शाळा, महाविद्यालय प्रशासनासह राज्य सरकारने अमान्य केल्यानंतर हा वाद न्यायालयीन दरबारी येऊन पोहोचला आहे. याप्रकरणी सध्या कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र, ‘हिजाब’वरून आता राज्यातील परिस्थिती चिघळत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
‘हिजाब’ आवश्यक धार्मिक परंपरा नाही; कर्नाटक सरकारचा न्यायालयात युक्तिवाद
‘हिजाब’ ही एक आवश्यक धार्मिक प्रथा नाही आणि ती शैक्षणिक संस्थांपासून दूर ठेवली पाहिजे, असा युक्तिवाद कर्नाटक सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान केला. ‘हिजाब’ ही आवश्यक धार्मिक प्रथा नाही. डॉ. भीमराव आंबेडकरांनीही संविधान सभेत सांगितले होते की, आपण आपल्या धार्मिक सूचना शैक्षणिक संस्थांच्या बाहेर ठेवल्या पाहिजेत, अस संदर्भ आठवण कर्नाटकचे महाधिवक्ता प्रभूलिंगा नवदगी यांनी न्यायालयात दिला. मंगळवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता पुन्हा याबाबत सुनावणी होणार आहे.
श्रद्धेची बाब शैक्षणिक संस्थांपासूनवेगळी ठेवली पाहिजे
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह ‘हिजाब’च्या मुद्द्यावर म्हणाले की, “सर्व धर्मांच्या नागरिकांनी शाळा, महाविद्यालयांच्या गणवेशाचे (ड्रेस कोड) पाळले पाहिजेत. श्रद्धेची बाब शैक्षणिक संस्थांपासून वेगळी ठेवली पाहिजे. हे प्रकरण अद्याप उच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी न्यायालयाचा जो निर्णय असेल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
‘हिजाब’च्या आडून विशिष्ट धर्मातील मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
कर्नाटकमध्ये ‘हिजाब’वाद हिंसाचाराच्या पथ्यावर पडत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धर्मांध आणि जिहाद्यांकडून आत्तापर्यंत अनेक युवकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. याविरोधात आता ठोस कारवाई होण्याची गरज आहे. काही विशिष्ट धर्मीयांसाठी कार्यरत असणार्या संघटना यासाठी जबाबदार आहेत. विशिष्ट धर्मातील मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न ‘हिजाब’च्या आडून होत आहे.
- विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद