‘महाराष्ट्र आणि तेलंगण भाऊ भाऊ’, अशी नवी घोषणाही आकाराला आणण्याचे काम जे करीत आहेत ते कालउत्तर भारतीय आणि परवा कन्नड लोकांच्या विरोधात होते. एका भेटीत किती विसंगती असाव्यात त्याचा हा नमुना आहे. भाऊ भाऊ असले, तर बजबजपुरीने राज्य चालविण्यात राव आणि ठाकरे भाऊ भाऊ असू शकतात.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यात महाराष्ट्रात भेट आणि खलबते झाली. शरद पवारांनी यावर बिघडलेल्या राजकीय स्थितीवर मार्ग काढण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले. आता कोणाचे काय बिघडलेले आहे आणि हे अर्धवट लोक ते कसे सुधारणार आहेत, हा मोठाच प्रश्न आहे. पण, राजकारण चालते ते सत्यापेक्षा समजांवर. किंबहुना इतक्या वर्षात हे असेच चालले होते. मोदींनी मात्र याला छेद दिला. जे सांगितले तेही केले आणि आणि जे सांगितले नाही तेही करून दाखविले. इंग्रजीत ज्याला ‘पर्सेप्शन’ म्हणतात, त्याच्या आधारावर राजकारण चालत असते. भाषिक अस्मिता, जातीय अस्मिता, प्रांतीय अस्मिता असे सगळे हे मुद्दे होते. हे मुद्दे नव्हते, असे नाही. बहुविधता हाच ज्या देशाचा स्थायीभाव आहे, त्या देशाला राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली एका कुटुंबाच्या दावणीला बांधण्याचे पाप काँग्रेसने केले. त्यातून या अस्मितांचे प्रश्न निर्माण झाले. यातील अनेक अस्मिता या रोजगारासारख्या मूलभूत बाबींशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे त्या त्या प्रांतात त्यांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला. मात्र, सर्वसमावेशकतेची निव्वळ पोपटपंची न करता तसे वागणारे नेतृत्व आले की, या अस्मिता सहजपणे विरून जातात.
अस्मितांचे राजकारण विरण्याचे अजून एक कारण म्हणजे अस्मितेच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व निर्माण करणार्यांनी नंतरच्या काळात उभी केलेली दुकानदारी. यातील सगळेच नंतरच्या काळात फसले आहेत. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी भांडणारी शिवसेना आज काही निवडक मराठी माणसांचेच हितसंबंध जपणारे दुकान झाली आहे. सर्वसामान्य मराठी माणसाशी, त्याच्या घरादाराशी, त्याच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांशी त्यांचे कोणतेही देणे-घेणे नाही. के. चंद्रशेखर राव यांचे यापेक्षा काही वेगळे नाही. तेलंगणाच्या अस्मितेच्या नावावर त्यांनी सत्ता आणि मजबूत संख्याबळ मिळविले खरे पण आता त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न उभे आहेत. तेलंगणामध्ये भाताचे क्षेत्र विस्तारत आहे. पाऊस जास्त होत आहे, त्यामुुळे बहुसंख्य शेतकरी तांदळाकडे वळले आहेत. राज्यशासनाने हमी देऊनही हा भात खरेदी करण्याचे टाळले आहे. तांदळाचे उत्पादन अजून वाढेल या भितीने तिथे चांगल्या प्रकारचे बियाणे शेतकर्यांना मिळणार नाही, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. दलितांना तीन एकर जागा देण्याचा चंद्रशेखर राव यांचा वायदा निवडणुकीनंतर हवेत विरून गेला आहे. गरिबांसाठी दोन खोल्यांची अडीच लाख घरे बांधण्याची योजनाही अशीच बासनात गेली आहे. राजकीय साठमारीमुळे मोठ्या उद्योगांना तेलंगणात जाण्यात रस नाही. याचाच परिणाम म्हणून बेरोजगारीची समस्याही आहे. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करणार्या ४० पत्रकार आणि सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकरीता सरकारकडे पैसे नाहीत.
राज्यात सात हजार शिक्षकांची पदे निधी व निधीच्या नियोजनाअभावी रिक्त आहेत. मात्र, वर उल्लेखलेल्यांवर खटले चालविण्यासाठी ६० कोटींच्या निधीची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. विद्यमान शिक्षकांना पगार नाही म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत. सरकार चालविताना जी बजबजपुरी तिथे निर्माण झाली आहे, तिची तुलना केवळ महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीशीच होऊ शकते. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे चंद्रशेखर यांना या देशाची घटनाच बदलायची आहे. त्यांच्या लेखी राज्यांना अधिक अधिकार असणारी घटना हवी आहे. मुळात घटनेपेक्षा कर रुपाने केंद्रात जाणार्या पैशावर त्यांचा डोळा आहे. शरद पवारांसारख्या जुन्या नेत्याकडून जे सतत फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत असतात, त्यांनी राज्यघटनेबाबतच्या चंद्रशेखर राव यांच्या भूमिकेवर त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या सगळ्याच मंडळींचे खायचे दात निराळे आहेत आणि दाखवायचे निराळे. मतदार आणि त्यांना गृहित धरण्याचे उद्योग ही मंडळी सातत्याने करीत असतात मग त्यातून जे राजकीय अपयश येते त्यासाठी मोदी आणि भाजपला जबाबदार धरायची यांना सवय असते. शिवसेनेचे आमदार कमी झाले, तर ते मोदींमुळेच असा हा तर्क आहे. मूळ मुद्दा आपापली दुकाने चालविण्याचाच आहे. ममता असो, केसीआर असो किंवा उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कोणाशीही देणे-घेणे नाही. या सगळ्यांना स्वत:ची दुकाने चालवायची आहेत. मोदी आणि भाजपचा विस्तार हीच या सगळ्या मंडळींची खरी पोटदुखी आहे.
आपण आज संदर्भहीन होऊ ही यांची भिती आहेच. पण, त्यापेक्षाही आपल्याच कार्यकर्त्यांना फाट्यावर मारून जी आपली पोरेबाळे राजकीय गाद्यांवर बसविली आहेत ती देखील अस्तित्वहीन होतील ही भिती आहे. या सगळ्यातला एक रंजक भाग म्हणजे ज्याप्रकारे ही मंडळी एकमेकांना गंडवित आहेत. तिसरी आघाडी तर त्याची कल्पना करणार्या प्रत्येकाला हवी आहे. त्या अप्सरेची लालसा तर प्रत्येकाला आहे. पण, त्यासाठी स्वत: मरून स्वर्गात जायला कोणीही तयार नाही. अस्तित्वाच्या भयगंडाने पछाडलेले हे लोक आजही तिसर्या, चौथ्या आघाडीच्या पालखीचे भोई होऊ इच्छितात. पुन्हा भीती ही आहे की, त्या पालखीचे भोई हे असले तरी त्यात बसण्याचा मान काँग्रेसला किंवा राहुल गांधींनाच मिळणार. पवार यातले वास्तव जाणतात आणि ते सांगूनही जातात. सत्ता आणि सत्तेच्या मार्गाने मिळालेला पैसा हातात असला की, जनहीताची कामे सोडून असल्या उचापती करायला वेळही असतो. ‘महाराष्ट्र आणि तेलंगण भाऊ भाऊ’, अशी नवी घोषणाही आकाराला आणण्याचे काम जे करीत आहेत ते काल उत्तर भारतीय आणि परवा कन्नड लोकांच्या विरोधात होते. एका भेटीत किती विसंगती असाव्यात त्याचा हा नमुना आहे. भाऊ भाऊ असले, तर बजबजपुरीने राज्य चालविण्यात राव आणि ठाकरे भाऊ भाऊ असू शकतात.