"केसीआर-ठाकरे भाऊ भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ" : राणेंचा टोला

    21-Feb-2022
Total Views |

Narayan-Rane
 
 
 
मुंबई : रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तब्बल साडेचार तासांची चर्चा झाली. केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारविरोधात आघाडी तयार करण्यासाठी ही बैठक नेमण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, "तेलंगणा आणि शिवसेना भाऊ भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ", असं म्हणत शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवर  हल्लाबोल केला आहे.
 
 
 
"सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात यापूर्वी शिवसेना ''हटाव लुंगी-बजाव पुंगी'' अशी घोषणा देत होती. आता शिवसेना आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत, असं दाखवतात. हे अजब परिवर्तन आहे.", अशी टीका नारायण राणेंनी केली. "तेलंगणा आणि शिवसेना भाऊ-भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ, अशी सध्या शिवसेनेची भूमिका आहे. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही आणि तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत.", असेही ते पुढे म्हणाले.