‘चिता कॅम्प’मधील नागरिकांवर आरोग्य समस्यांचे सावट

प्रभागातील एकमेव प्रसूतिगृहात अपुरी आरोग्य व्यवस्था; स्थानिकांचा महापालिकेवर आरोप

    21-Feb-2022
Total Views | 95

Chita Camp
 (प्रातिनिधिक)
 
 
मुंबई (ओंकार देशमुख) : मुंबईच्या ‘चिता कॅम्प’ परिसरातील नागरिकांना मागील २० ते २५ वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील अस्वच्छतेसोबतच इतर मुद्द्यांमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मात्र, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ‘चिता कॅम्प’ परिसरातील एकमेव अशा शहाजी नगर प्रसूतिगृहाची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. ‘चिता कॅम्प’ भागातील नागरिकांनी आणि महिलांनी प्रभागातील प्रसूतिगृहाच्या समस्येवर नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.
 
 
 
प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन उभारणार
प्रभागातील शहाजी नगर प्रसूतिगृहामध्ये विविध सुविधांची वानवा आहे. महिलांना मोठ्या असुविधेचा सामना या अव्यवस्थेमुळे करावा लागत आहे. प्रसूतीसाठी दाखल केलेल्या अनेक महिला या ठिकाणी उपचार न मिळाल्याने इतर रुग्णालयांमध्ये भरती होतात. डॉक्टर, नर्ससह साधनसामुग्रीचा मोठा तुटवडा या ठिकाणी आहे. स्थानिक प्रशासन आणि महापालिका कमकुवत आहे. याबाबत आम्ही पाठपुरावा करूनही प्रशासनाचे काही उत्तर नाही. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास भाजप या विरोधात तीव्र आंदोलन करेल.
- दिनेश पांचाळ, भाजप मंडळ अध्यक्ष, चिता कॅम्प
 
 
 
रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी, हीच मागणी
प्रसूतीकाळात या रुग्णालयात उपचार घेणार्‍या महिलांना प्रसूतीच्या वेळी अपुर्‍या सुविधांमुळे उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये जावे लागते. गरोदर महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकारदेखील या ठिकाणी झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेला उपचार देण्यास रुग्णालय असमर्थ ठरल्याने तिला इतर ठिकाणी हलवताना तिचा दुदैवी अंत झाला होता. त्यामुळे आमची प्रशासनाकडे केवळ ही मागणी आहे की, त्यांनी या प्रसूतिगृहाची दुरुस्ती करून स्त्रियांना होणार्‍या त्रासापासून वाचवावे.
- ज्योती नायडू, स्थानिक रहिवासी
 
 
 
पुढारी मोठे झाले, मात्र प्रश्न ‘जैसे थे’
या भागातील दोन्ही प्रभागाची नोंदणीकृत संख्या अंदाजे दीड लाख आणि अनोंदणीकृत संख्या मिसळल्यास एकूण लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे. मात्र, लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ एका प्रसूतिगृहाची उपलब्धता या ठिकाणी आहे. तिथेही डॉक्टर आणि आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध नाहीत. या रुग्णालयाकडे कुणाचेही लक्ष नाही. या भागातील अनेक स्थानिक पुढारी पदाने मोठे झाले. मात्र, या प्रकरणाकडे लक्ष देण्याची कुणालाही गरज वाटली, ही खरी शोकांतिका आहे.
- विजय कौंडर, स्थानिक, भाजप पदाधिकारी
 
 
 
सुविधा नाही; मग उपचाराला का यावे?
माझ्या कुटुंबातील एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर ऐनवेळी शीव रुग्णालयात भरती होण्यास सांगितले गेले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाला मोठी इजा झाली आणि त्याच्या आईला आपले प्राण गमवावे लागले ही सत्यघटना आहे. जर या प्रसूतिगृहात कुठल्याही सुविधा आणि मनुष्यबळ नसेल,तर आम्ही या ठिकाणी उपचारासाठी यावे का? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.
- शाहीन हुसेन, स्थानिक महिला रहिवासी
 
 
 
स्थानिक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
‘चिता कॅम्प’ परिसरातील नागरिकांच्या आरोपांवर स्थानिक नगरसेवक शाहनवाझ शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची याबाबतची बाजू समजू शकलेली नाही.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121