तिसरी आघाडी : लाटावर लाटा

    20-Feb-2022   
Total Views |

Chandrashekhar Rao
 
 
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही लोकांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी म्हणे दोन सव्वादोन तास खलबतं केली. अर्थात खलबतं कशाबद्दल असतील? तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात पुन्हा डोके वर काढत असलेल्या नक्षलवादाशी लढण्यासंदर्भात असेल का? कोरोनानंतर देशात आणि या दोन्ही राज्यात लोकजीवन विस्कळीत झाले. त्या लोकजीवनाची घडी पुन्हा बसवण्यासाठी संयुक्त उपक्रम करण्यासाठी या दोघांनी खलबतं केली का? किमानपक्षी दोन्ही राज्य एकत्रित येऊन आपल्या राज्यात काही विकासात्मक काम करतील यासाठी दोघे मुख्यमंत्री एकत्रित आले का? छे छे ही असली लोकांच्या आणि राज्याच्या हिताची कामं करायला का मुख्यमंत्री असतात? उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव एकमेकांना भेटले ते केवळ देशात मोदींना पर्यायी नेतृत्व उभे कसे करता येईल? भाजप पक्षाला बहुमतापासून कसे रोखता येईल? या चर्चेसाठी. केवळ चर्चा. या दोन्ही मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की, लोकांची प्रथम पसंती नरेंद्र मोदी यांना आहे. २०२४ सालीही सत्तेत मोदी आणि भाजपच आहे. करण्यासारखे काही नाही. पण चर्चा करायला कुणाचे काय जाते? त्यामुळेच प. बंगालच्या ममतापासून उत्तर प्रदेशच्या मायावती, अखिलेश ते अगदी तेलंगणाचे चंद्रशेखर राव सगळे एकत्र येऊन नवी राजकीय आघाडी निर्माण करण्याचे मनसुबे रचतात. पण, ‘शहर बसा नही की, लुटेरे आये’ तसे आघाडी झाली नाही की, ‘कौन बनेगा पंतप्रधान’ म्हणत आघाडी तुटते. आताही चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आले, उद्धव ठाकरेंना आणि पुढे शरद पवारांना भेटले. चंद्रशेखर म्हणाले की, “तिसरी आघाडी निर्माण करण्याची गरज आहे. देशात परिवर्तन आणण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा.” आता यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, परिवर्तन पवारसाहेब करणार म्हणजे प्रश्नच मिटला. आघाडीचे उज्ज्वल भविष्य ठरलेले आहे. आता तिसरी आघाडी होणार की, कोरोनाच्या लाटांवर लाटांसारखी फक्त तिसर्‍या आघाडीच्या चर्चेवर चर्चा होणार? की झाल्या झाल्या आघाडीची शकले होणार? हेच पाहणे आपल्या हातात आहे.
 
 
 
शिवीसम्राट
 
काय म्हणता ते दानवे म्हणाले की, झुकले बी वाकले बी आन आता पार झोपायची वेळ आली असू द्या. काय म्हणता पडळकर म्हणाले की, भुंकतोय जोमानं आन भिजलाय घामानं. बरं बरं नो क्वेश्चन समजलं का? मी अन्सर देणार नाही. तुमच्या अजेंड्यावर मी का बोलू? मी मी आहे समजलं? गप बसा. अजिबात चुप. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मीच बोलनणार समजलं. काय म्हणता पत्रकार परिषद घेण्यापेक्षा साहेबांसारखं फेसबुक लाईव्ह करायचे होते? छे छे साहेबांसारखे मी कसे करू? त्याचे काय आहे, मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ करतात तसेच आमच्या साहेबांनी ‘कोरोना की बात’ सुरू केली होती. आता या दोघानंतर सुपरडुपर उरले कोण? मीच ना? कसे म्हणजे? बघा ना आमचे साहेब राष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या तयारीत आहेत. साहेब पंतप्रधान झाले की, मग महाराष्ट्राच्या खुर्चीवर कोण बसणार? काय म्हणता छोटे साहेब? काय म्हणता बारामतीचे काका? काय म्हणता बारामतीचे पुतण्या? नाही नाही अजून आठवा. अरे तुम्हाला मी आठवत नाही का? कसे म्हणजे साहेबच म्हणाले की, सैनिकाला मुख्यमंत्री बनवणार म्हणून. अरे महाविकास आघाडीचा शिल्पकार मी. पण मला काडीचेही श्रेय मिळाले नाही. ना लोकांनी, ना आमच्या मंत्र्यांनी लक्षात ठेवले. सगळे जण सगळे विसरले. उलट लोक वेगळेच आठवत राहतात. कधी महाविकास आघाडीची सेना विकास कामांना स्थगिती, तर कधी सुशांत सिंग, कधी दिशा कधी, पूजा कधी, पालघरचे ते दोन साधू तर कधी कोरोना सेंटरमधला भ्रष्टाचार. आमच्या मंत्र्यांचे घोटाळे. अरे या काय आठवण्याच्या गोष्टी आहेत? लोकांनी सगळे विसरावे, म्हणून चांगला ‘वाईन’चा विषय आणला. तर त्यातही आमची भागिदारी बिगिदारी काढली. आता करावे तरी काय? काय म्हणता लोकांना आता फक्त १९ बंगले आठवतात आणि आमची शिवीगाळी दिसते. मग मी काय करू म्हणता. तुम्ही सगळे चु ** तुम्ही सगळे भ** आहात. काय म्हणता मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, शिवीसम्राट नक्कीच झालो. वा वा कुठचा का होईना सम्राट आहे ना बस!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.