मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठणाच्या ठरावाची सुचना महापौरांना भाजपच्या योगिता ताई कोळी यांनी केली. परंतू त्यावर लगेच समाजवादी पार्टी कडुन आक्षेप व विरोध घेतला जातोय खरंतर हे दुर्दैवी व दुख:द आहे, अशी खंत भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे.
राणे म्हणाले, "ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्ववेत्ते आणि विचारवंत तत्वज्ञानाच्या अभ्यासात भगवद् गीता या ग्रंथाला अन्यन साधारण महत्व देतात. अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवद् गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेसही शिकवले जात आहेत. संपूर्ण जग तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवद् गीतेच महत्व मान्य करत आहे. कारण हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो."
"भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे 'फ़तवा-ए-आलमगीरी' चे पठण करायला लावायचे का? जेणेकरून मुख्तार अन्सारी सारखे माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील?", अशी टीकाही त्यांनी भगवद्गीता पठणाला विरोध करणाऱ्यांवर केली.
"मला खात्री आहे की दिवंगत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून अशा भगवद् गीता पठणाला होणाऱ्या विरोधाच्या दबावापुढे आपण झुकणार नाहीत आणि योगिताताई कोळींची सुचना मान्य करण्यास आपण पक्षप्रमुख म्हणून लगेचच निर्देशीत कराल ही आशा बाळगतो.", असेही ते म्हणाले.