येशूच्या नावाने...

    19-Feb-2022   
Total Views |

Conversion
 
 
 
तामिळनाडूतील १७ वर्षीय लावण्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. धर्मांतर केले नाही म्हणून तिला विविध मार्गांनी छळले. या सगळ्या त्रासाला ती कंटाळली आणि तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापेक्षा मरण पत्करले. लावण्याच्या मृत्यूतून हिंदू-मुस्लीम किंवा मागासवर्गीय-सवर्ण अशी फूट पाडण्याची संधी तथाकथित पुरोगाम्यांना आणि ढोंगी मानवतावाद्यांना मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी लावण्याच्या मृत्यूबाबत ‘ब्र’ही उच्चारला नाही. तसेच आरोप थेट ख्रिस्ती धर्मांतराच्या सक्तीवर असल्याने हाथरस किंवा रोहित वेमुलाच्या दुःखद घटनेनंतर त्वेषाने घटनास्थळी जाणारे राहुल-प्रियांका हे भाऊ-बहीण आणि त्यांचे समर्थकही गप्प आहेत. लावण्याची आत्महत्या केवळ हिमनगाचे टोक आहे. मुंबईमध्येही असे घडत असतेच. अशा काही घटना शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
“माझा नवरा दुसर्‍या बाईच्या प्रेमात वेडा आहे. तो माझ्याकडे परत येणारच,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी चर्चमध्ये जायचे,” ती महिला सांगत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पुढे ती म्हणाली “दीदी, खरं सांगू का मला सत्य कळलं आहे? इतके वर्षे चर्चमध्ये जाऊन काहीच झाले नाही.” दुसरी म्हणाली, ”आम्ही ओडिशामधून इथे कामाला आलो. खाडीच्या बाजूला स्वस्तात घर मिळाले. या घरात आल्यापासून आम्ही सगळे आजारी पडू लागलो. नंतर कळलं की, त्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मग एक फादर घरी आले.” ते म्हणाले, “मला माहिती आहे, तुझ्या घरात काय झाले आहे ते. घाबरू नकोस. तू आता आमच्या छायेत आहेस. प्रार्थना कर. गळ्यात क्रूस घाल.” त्यानंतर दुर्गापूजा आली. आम्ही देवीपूजन, कन्यापूजन करायचे ठरवले. नेमके त्याचवेळी फादर आले आणि म्हणाले, “हे काय करतेस? हे राक्षस आहे.” पण, खापर पणजोबांपासून घरात नवरात्रीला देवीपूजन आणि कन्यापूजन करत होतो. आम्ही देवीपूजन, कन्यापूजन केले. उत्सव म्हणून आजूबाजूचा परिसर, घरातला कानाकोपरा स्वच्छ केला. त्यानंतर आम्ही आजारी पडलो नाही. देवीची कृपा होतीच तसेच स्वच्छता केली म्हणून आजार बंद झाले. मग मी गळ्यातले क्रॉसही उतरवले.”
  
 
 
एक महिला तिला तीन मुली. तिला या फादरने ग्वाही दिलेली की, “येशूची पूजा कर. तुला मुलगाच होईल.” पण, बरीच वर्षे झाली, तरी तसे काहीच घडले नाही. या तिन्ही घटना सत्य असून त्या आहेत मुंबईच्या माता रमाबाई नगरातल्या. माता रमाबाई नगर म्हणजे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सक्रिय बालेकिल्ला. पण, या बालेकिल्ल्यात बाबासाहेबांच्या विचारांना सुरूंग लावणारीही धर्मांध धर्मांतराची कीड! ही कीड मुंबईच्या गरीब गांजलेल्या वस्त्या वस्त्यांमध्ये सुखैनव फोफावत आहे. “तुम्ही आजपर्यंत तुमच्या धर्माचं, तुमच्या देवाचं केलं ना, आता एकवेळ आमच्या चर्चमध्ये या, येशू तुमचं नशीब पालटेल,” असे ‘डायलॉग’ मुंबईतल्या कचरा वेचणार्‍या गरिबांच्या वस्तीत हमखास ऐकू येतात.
 
 
 
असेच एक सत्य देहविक्रेय करणार्‍या महिलांच्या वस्तीतले. भारतातल्या कानाकोपर्‍यातून फसवून, लुबाडून आणलेल्या दुर्दैवी महिला. यातल्या बहुसंख्य हिंदू आणि मुस्लीम महिलाही चर्चमध्ये जाऊ लागलेल्या. त्यातल्या एकीचे उत्तर- “आम्ही पाप करतो. या पापामुळे मेल्यानंतर अल्ला आम्हाला नरक फर्मावेल. हा ना! इथं बी नरक आणि मेल्यानंतर बी नरक नकोय.” तिला दुजोरा देत भांगभर सिंदूर भरलेली,एक बंगाली हिंदू महिला म्हणाली की, ”फादरने सांगितले आहे, चर्चमध्ये येऊन ‘कन्फेशन’ केले की, पाप येशू घेतो. आमची पापांपासून मुक्तता होते. म्हणून आम्ही चर्चला जातो,” एक महिला मूळची प. बंगालची. तिला ‘एड्स’ झालेला. ती म्हणाली, ”मी केवळ रात्रीच बाहेर पडते. कारण, दिवसा मला बघून कळते की, मी आजारीआहे. मी कुठचा घरून ‘एड्स’ घेऊन आले होते. मला पण कुणी तरी दिला ना आणि हे पाप असेल,तर मी चर्चमध्ये जाऊन ‘कन्फेशन’ करते. मी क्रूसपण घातला हे पाहा.” या सगळ्या शोषित-पीडित स्त्रिया. या सगळ्या जणी पाप करत होत्या का? छे! त्यांचे जगणे म्हणजे जावे त्यांच्या वंशा. यांच्या असाहाय्यतेचा, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांचे धर्मांतर करणार्‍यांना काय मिळते? तर या महिलांची मुले. आईने धर्म स्वीकारल्यावर मुलांचाही धर्म बदलतो. या मुलांच्या जगण्याबद्दल किंवा धर्माबद्दल आवाज उठवणारे कोणी नाही. कशी का होईना? धर्मलोकसंख्या वाढते. दुसरे असे की, भारतातील शोषित, पीडित महिलांसाठी आम्ही काम करतो, असा फोटोसकट अहवालछापून यांना ‘डोनेशन’ मिळवता येते. हे खरे तुरूंगही यातून सुटलेले नाहीत.
 
 
 
काही वर्षांपूर्वीची एक सत्य घटना. मुंबईजवळच्या एका मोठ्या तुरुंगामध्ये एक तरुण कैद होता. गावातल्या कौटुंबिक जमीनवादातून त्याची आणि शेजारच्यांची मारामारी झाली. त्या शेजार्‍याचा मृत्यू झाला. कालांतराने तरुणाची सुटका झाली. त्यावेळी तुरुंगात फळ-मिठाई घेऊन वाटणारे मिशनरी त्याच्या स्वागताला हजर. म्हणाले, ”आम्ही फळ-मिठाई वाटायचो. तुझ्यासाठी प्रार्थना, पण करायचो. म्हणूनच तू सुटलास. येशूचा तसा आशीर्वाद आणि आदेशचहोता.” त्यांचे बोलणे ऐकून अल्पशिक्षित ग्रामीण भागातल्या त्या तरुणाने आणि त्यांच्या कुटुंबाने पुढचे आयुष्य येशूच्या भजनासाठी आणि त्या धर्माच्या विकासासाठी खर्ची घालण्याचे ठरवले. या घटनेचा मागोवा घेतल्यानंतर काय आढळले? तर या खटल्याबाबत न्यायालयात तारीखवर तारीख पडत होती. या तरुणाविरोधात मृत शेजार्‍यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती. पण, काही वर्षांत या-ना-त्या कारणाने त्यातले काही नातेवाईक बाहेरगावी गेले. एक-दोेघे वार्धक्याने वारले. न्यायालयात खटल्यासाठी उभे राहण्यास कुणीच उपस्थित राहत नसे. साक्षीपुराव्यांअभावी त्या तरुणाचीसुटका झाली. मात्र, या सगळ्या घटनाक्रमाला पद्धतशीरपणे वळण लावून त्या तरुणाचे धर्मांतर करण्यास ती विशिष्ट धर्मांतर व्यवस्था यशस्वी झाली.
 
 
 
असेच एक उदाहरण. २००५ पूर्वी मुंबईच्या मिठी नदी, पोयसर नदीनाल्याच्या बाजूच्या वस्त्यांमध्ये सांगितले जाऊ लागले की, ”तुमच्या घरात पाणी शिरणार आहे. येशूच्या कृपाछायेत या. तुम्ही बुडणार नाही.” हे सांगताना ते नोवा आणि त्याच्या बोटीच्या गोष्टीही सांगायचे. त्यानंतर २००५ साली मुंबई पाण्याखाली गेली. गरीब समाजबांधवांना वाटले, आमची घरे बुडाली. येशूच्या छायेत गेलेले बरे. पण, तुंबलेल्या नद्या, कचर्‍याने भरलेले नाले. यामुळे स्पष्टच होते की, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आणि भरतीची वेळ असेल, तर कधी ना कधी मुंबईत खूप पाणी भरणारच! या वस्त्यांमध्ये केवळ हाच अंदाज बांधून लोकांना येशूकडे वळवण्यात ते यशस्वी झाले. मुंबईतील एका भटके-विमुक्त समाजाची वस्ती. हिंदू धर्माबद्दल या वस्तीत प्रचंड निष्ठा. या वस्तीमध्ये एक महिला एक वर्षापासून या-ना-त्या कारणाने दाखल व्हायची. नाताळपूर्वी काही दिवस तिने या वस्तीत सांगितले की, ”तिने चर्चमध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यामुळे तिच्या भावाला प्रसिद्ध ‘टीव्ही सीरियल’मध्ये अभिनेता म्हणून संधी मिळाली. त्यामुळे या वस्तीत खाऊवाटप आणि येशूची प्रार्थना वगैरे करून ती आनंद साजरा करणार.” मात्र, कुणाकडून तरी कळले की, ती कोणत्याही अभिनेत्याची बहीण नव्हतीच. या सगळ्या घटनेचा अर्थ काय? सुज्ञास सांगायलाच पाहिजे का? मुंबईतला डम्पिंगचा पट्टा, गोरगरीब मागास समाजाच्या वस्त्या, मोठ्या नाल्यालगतच्या वस्त्या यामध्येच येशूची कृपा वाटत फिरणारे हे कोण लोक आहेत?
 
 
 
या सगळ्या परिप्रेक्षात छत्तीसगढच्या सुकमा परिसरातील घटना आठवते. तेथील दुर्गम जंगल परिसरातील खेडेगाव. या दुर्गम नक्षलग्रस्त गावातपहिल्यांदा आरोग्य तपासणीकरणारी ‘व्हॅन’ आली. गावातल्या सगळ्यांचे त्यांनी ‘एक्सरे’ काढले. काही लोकांचे हृदय फाटलेले, काही लोकांच्या किडन्या, तर काही लोकांची आतडे तुटलेले. तसे ‘एक्स रे’ फोटो त्यांनी या गाववाल्यांना दाखवले म्हणे. या व्हॅनसोबत येशूची करूणा भाकणारेही आलेले ते.हृदय, आतडे, किडनी वगैरे तुटलेल्या लोकांना बरे करण्यासाठी मिशनरींनी येशूची करुणा भाकली. गाववाल्यांना गळ्यात ‘क्रॉस’ घालण्यास दिला. त्यांच्या सेवेसाठी हे ‘येशूचे दूत’ त्या गावातच थांबले. महिन्यानंतर पुन्हा ही ‘व्हॅन’ गावात आली. त्यांनी पुन्हा गाववाल्यांचे ‘एक्स रे’ काढले. काय आश्चर्य, या सगळ्या गाववाल्यांच्या किडन्या, हृदय, आतडे पुन्हा चांगले झालेले. आपण बरे झालो, या आनंदात त्यानंतर गावाने सामूहिकरित्या ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ही कथोकल्पित घटना नाही, तर सत्य घटना आहे. इतका भाबडेपणा? हो, इतका भाबडेपणा आहे. कारण, या गावात मूलभूत सुविधा नाहीत. सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि गावावरही नक्षली हल्ला करतात. त्यामुळे या आणि अशा असंख्य दुर्गम गावात ना शाळा, ना रुग्णालय. बाहेरच्या जगात काय चालले, याचा मागमूस नाही. इथे कुणीही साधा माणूस जाऊ शकत नाही. मात्र, मिशनरींचा वावर अगदी सहज. “ये रिश्ता क्या केहलाता हैं?” तर असेही धर्मांतर होत आहे. छत्तीसगढच्या धर्मांतरण आणि मतांतरावर तर एक प्रबंधच होईल.
 
 
 
हे सगळे लिहिताना माझ्या आजीने सांगितलेली एक घटना आठवते. ती सांगायची, अहमदनगरला आपले नातेवाईक राहतात. पण, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते ख्रिस्ती झाले. येथील समाजबांधवांची पाणी भरण्याची एक सामुदायिक विहीर होती. भल्यापहाटे आयाबायांनी या विहिरीतले पाणी भरले. पण, कुणीतरी विहिरीत तरंगणारा पाव पाहिला. (त्याकाळी पाव केवळ ख्रिस्ती लोक खायचे.) ख्रिस्ती समाज खात असलेला पाव त्या विहिरीत तरंगत होता. त्याच विहिरीतले पाणी त्या कुटुंबीयांनी प्यायले. त्यावेळी समाजाच्या हिशोबाने ही सगळी कुटुंबे बाटली. त्यानंतर काही वेळातच तिथे फादर आला आणि त्याने जाहीर केले की, ”पाव तरंगत असलेल्या विहिरीचे पाणी प्यायलेले लोक सगळे ख्रिस्ती झाले.” त्यानंतर ही सगळी कुटुंबे रडत, नशिबाला दोष देत ख्रिश्चन झाली. मी आजीला विचारले होते, ”आपले कुणीच जर पाव खात नव्हते, तर विहिरीत पाव आला कुठून?” तर हे सगळे वाचून, अनुभवून तामिळनाडूच्या लावण्यावर धर्मांतर लादण्यासाठी कशा कशाप्रकारे प्रयत्न केले गेले असतील, याची कल्पना करू शकतो. लावण्याला न्याय मिळायलाच हवा...
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.