संस्कारातही भिकारी पाकिस्तान!

    19-Feb-2022   
Total Views |

pakistan
पाकिस्तानची सोशल मीडिया मॉडेल कंदिल बलोचची हत्या दि. १४ जुलै, २०१६ साली तिच्याच भावाने वसीम अजीमने केली होती. तिच्यामुळे घराण्याची इज्जत गेली, लोकं नावं ठेवतात, म्हणून तिचा गळा दाबून तिला ठार मारले, असे वसीमने पोलिसांना गुन्हा कबुल करताना सांगितले. नुकतेच पाकिस्तानमधील लाहोरच्या वरिष्ठ न्यायालयाने त्याची शिक्षा माफ केली. कारण, कंदिल बलोचच्या मातापित्यांनी वसीम अजीमला माफ केले. पाकिस्तानमध्ये कायदा आहे की, मृताच्या खुन्याला मृतकाजवळच्या नातेवाईकांनी क्षमा केली किंवा त्याची शिक्षा माफ करा, असे सांगितले, तर गुन्हेगाराची शिक्षा माफ होते. पाकिस्तानमध्ये हा असा कायदा का असावा? तर पाकिस्तानची एकंदरच सामाजिक समज पाहिली, तर या कायद्याचा उपयोग होतो तो केवळ ‘ऑनर किलिंग’च्या गुन्ह्यांसाठी!
 
घरातल्या महिला-मुलींवर जरादेखील संशय आला, तर तिला इज्ज्तीच्या नावाने मारुन टाकायचे. मग गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली की, मृत मुली महिलेचे आई-वडील किंवा भाऊ-बहीण सामाजिक दबाव आणि त्यांच्या मानसिकतेनुसार खुन्याला क्षमा करतात. खुनी त्याला होणार्‍या शिक्षेतून सहीसलामत सुटतो.
पाकिस्तानमध्ये दरवर्षी हजारो महिलांचा असाच खून होतो. ‘ऑनर किलिंग’ झाले की, त्या गुन्ह्याबाबत पाकिस्तानमध्ये जास्त गंभीरपणे कारवाई केली जात नाही. ‘इज्जतीसाठी मारलं!’ असे अभिमानाने सांगतात. बहुसंख्य पाकिस्तानी त्या खुन्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. त्यामुळेच ज्यावेळी कंदिल बलोचच्या खुनानंतर तिच्या खुनी भावाला पकडले गेले, तेव्हा न्यायालयात त्या संदर्भातली केस उभी राहायलाही अडचण आली. तिचा खुनाचा खटला चालवणार्‍या वकिलालाही केस अर्धवट सोडून द्यावी लागली. तसेचपाकिस्तानी कायद्यातही अनेक खाचाखोचा आहेतच, ज्यामुळे ‘ऑनर किलिंग’च्या गुन्ह्यातून एखादा गुन्हेगार सुटून जातो.
 
 
पाकिस्तानमध्ये दरवर्षी हजारो मुलींवर बलात्कार होतात. त्यातही या बलात्कारांचे सुद्धा वर्गीकरण. तिथे दरवर्षी ६०० ते ७०० बलात्कार इज्जतीसाठी,‘बदला घेतला’ म्हणत केले जातात. एखाद्या पुरूषाने एखाद्या महिलेला छेडले किंवा तिच्यावर बलात्कार केला, तर त्या पीडितेच्या घरातले पुरूष त्या गुन्हेगार पुरूषाच्या घरातील स्त्रियांवर उलट बलात्कार करतात. त्यात मग वयोवृद्ध असोत की, बालिका. म्हणूनच पाकिस्तानी लोक या अशा घटनांमधील बलात्कार्‍यांच्या पाठीशी उभे राहातात.
 
पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मुख्तार माई हिच्यासंदर्भातली घटना म्हणजे पाकिस्तानी समाजातील अमानुषता आणि रानटीपणा सिद्ध करण्याचा एक मैलाचा दगडच म्हणता येईल. २००२ सालची गोष्ट. अब्दुल शकुर या १२ वर्षांच्या मुलावर मस्तोई कबिल्यातील तीन पुरूषांनी सामूहिक बलात्कार केला. नंतर सातत्याने ते या मुलावर अत्याचार करत राहिले. मुलाने याविरोधात आवाज उठवला. तीन गुन्हेगारांनी पंचाकडे तक्रार केली की, त्यांच्या २२ वर्षांच्या बहिणीसोबत १२ वर्षांच्या मुलाने म्हणे जबरदस्ती केली. कारण, मस्तोई हा तिथला उच्चभू्र समाजगट होता. तर तो १२ वर्षांचा मुलगा खालच्या समाज कबिल्यातला. खालच्या कबिल्यातल्या अब्दुलने वरच्या कबिल्यातल्या मुलीशी तथाकथित लैंगिक संबंध ठेवले म्हणून मग निर्णय झाला. त्यानुसार या १२ वर्षांच्या मुलाच्या बहिणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर नग्न करून तिची धिंडही काढली. पाकिस्तानमध्ये हे नवीन नव्हतेच. पण, मुख्तार या विरोधात न्यायालयात गेली. पहिल्यांदा सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, वर्षे लोटली. २०११ साली या सहा गुन्हेगारांपैकी पाच जण सुटले आणि एकाला फाशीवरून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
 
या सगळ्या घटनाक्रमात त्या १२ वर्षांच्या मुलावर, तर अत्याचार झालाच. पण, त्याची बहीण म्हणून मुख्तारवर पण अनन्वित अत्याचार झाला. तिचा काय दोष होता? तसेच स्वत:चा गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगारांनी स्वत:च्या २२ वर्षांच्या बहिणीलासुद्धाया सगळ्या घाणेरड्या प्रकरणात गोवले. तिची काय चूक होती? पण, खालच्या कबिल्याचा म्हणून त्या १२ वर्षांच्या मुलावर आणि स्त्री म्हणून मुख्तारवर व त्या २२ वर्षांच्या मुलीवर सगळे अत्याचार झाले. तर असा हा पाकिस्तान! पैशासोबतच संस्कृती आणि संस्कारांबाबतही भिकारी!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.