अपयशाला मात देणारा प्रदीप

    18-Feb-2022   
Total Views |
 
Manas
 
 
 
लोकांना ‘रिकामा टाईमपास’ वाटणारी आवड आता त्यांची आणि कुटुंबाची ओळख बनली आहे. सतत अपयश, धरसोड सहन करूनही चित्रकला जगणार्‍या सुरक्षारक्षक प्रदीप शिंदे यांच्याविषयी...
 
शिकरोड जवळील वडगाव पिंगळा येथील प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांचा जन्म. दहावीनंतर सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी दररोज मैदानी सराव सुरू केला. वडिलांच्या हॉटेलमध्येही ते मदत करत. प्रदीप दररोज वडिलांकडून दहा रुपये घेऊन ते जपून ठेवत. अशाप्रकारे दहावीची २४० रूपये फी त्यांनी स्वतः भरली. बारावीपर्यंतचे शिक्षण के.जे.मेहता हायस्कूलमध्ये पूर्ण केले. यादरम्यान काही काळ प्रदीप यांनी साखर कारखान्यात वडिलांप्रमाणेच नोकरी केली. मात्र, अकरावीला असताना साखर कारखाना बंद पडल्याने दोघांचीही नोकरी गेली. छोटसं हॉटेल आणि आईचं शिवणकाम यावर कसेबसे घर सुरू होते. त्यातच महाराष्ट्र शासन सुरक्षारक्षक या निमशासकीय पदासाठी प्रदीपची निवड झाली. मात्र, नियुक्ती प्रलंबित राहिली. यादरम्यान सैन्यात भरती होण्यासाठी तब्बल सात-आठ वेळा प्रयत्न केला. परंतु, यातही अपयश हाती लागले. नंतर प्रदीप यांनी दोन वर्षे ‘आयटीआय’मध्ये कारपेंटरचे शिक्षण प्रथम क्रमांक मिळवत पूर्ण केले.
 
अखेर २०१३ साली माळेगाव ‘एमआयडीसी’मध्ये त्यांना चार वर्षे प्रलंबित असलेली सुरक्षारक्षकाची नियुक्ती मिळाली. यादरम्यान प्रदीप यांना छायाचित्रणाची आवड निर्माण झाली. त्यावेळी प्रदीप मोबाईलमध्ये फोटो एडिटिंगही करत. मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी कॅमेरा घेण्याचे ठरवले. दिवाळीच्या आठ हजारांच्या बोनसमध्ये त्यांनी सेकंड हॅन्ड कॅमेरा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘युट्यूब’वरून पासपोर्ट फोटो कसे बनवायचे, याविषयीचे व्हिडिओ पाहून फोटोग्राफीची कामे घेण्यास सुरुवात केली. त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी एक संगणक खरेदी केले. दरम्यान, २०१८ साली लग्न झालं आणि त्याच महिन्यात कंपनी बंद पडली अन् प्रदीप यांनी पुन्हा हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
 
 
पाच-सहा महिन्यांनी प्रदीप दहावी-बारावी शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांची आडगाव येथील कार्यालयात बदली झाली. दि. १३ एप्रिल, २०२० रोजी सहज दुपारच्या सुमारास प्रदीप आपले सुरक्षारक्षकाचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी समोरील पत्र्यावर प्रदीप यांनी तारेने शिवरायांची प्रतिकृती रेखाटली. मोबाईलमध्ये पाहून तारेने पत्र्यावर कोरलेली प्रतिकृती सर्वांनाच आवडली. यानंतरच सुरू झाला प्रदीप यांचा एक नवा अध्याय. दुसर्‍याच दिवशी दिनदर्शिकेवरील स्वामी समर्थांचेही छायाचित्र रेखाटले. त्यानंतर त्यांनी दररोज एक चित्र काढायला सुरुवात केली. सुरक्षारक्षक असल्याने दिवसभर बराच वेळ मिळत होता. त्यामुळे ड्युटीवर असतानाही ते चित्र रेखाटत. चित्रकलेची आवड निर्माण झाल्याने त्यांनी ‘युट्यूब’च्या आधारे चित्रकलेतील बारकावे शिकण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरील उत्तम प्रतिसाद पाहून शाळेतील शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी चित्रकार राहुल पगारे यांच्याशी प्रदीप यांची ओळख करून दिली. राहुल पगारे यांनीही प्रदीप यांना काही नवीन गोष्टी सांगितल्या. त्यानंतर पगारे यांच्या सांगण्यानुसार नांदूर शिंगोटे येथील ललित कला चित्रकला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पहिल्याच वर्षी प्रदीप यांनी पहिला क्रमांक पटकावला. पळसे गावातील दीपक क्षीरसागर यानेही प्रदीप यांना मार्गदर्शन केले.
 
आतापर्यंत त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भगवान कृष्ण, नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे अशी जवळपास अडीचशेहून अधिक चित्रे रेखाटली आहेत. ‘वेड्यावाकड्यांची चित्रे का काढतो, चित्र तुला काय देणार आहे,’ असे प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. राजकीय नेत्यांच्या चित्रानुसार अनेक गैरसमज निर्माण केले गेले. चित्र काढताना भेदभावाचे आरोपही त्यांना सहन करावे लागले. पण, प्रदीप डगमगले नाही. यादरम्यान, २०२१ साली दिंडोरी येथे बदली झाल्यानंतर, प्रदीप यांनी अवघा साडेबारा हजार पगार आणि दिंडोरी दूर असल्याकारणाने नोकरीला नकार दिल्याने पुन्हा त्यांना घरी राहावे लागले.
 
“चित्रकलेचे शिक्षण घेऊन चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी करण्याचे ध्येय आहे. लोकांना रिकामा टाईमपास वाटणारी माझी आवड आता माझी आणि कुटुंबाची ओळख बनली आहे. लोकांना हसू पाहिजे असते. कुणाला बोलून दाखवायचे नाही, आता करून दाखवायचे,” असे प्रदीप सांगतात.
 
 
त्यांना आई सुमन, वडील भाऊसाहेब व पत्नी पूजा यांनीही प्रचंड सहकार्य केले. प्रदीप हे शिवरायांची वेशभूषा करत अनेक कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात. सध्या हॉटेल, शिक्षण, फोटोग्राफी व चित्रकला या गोष्टी प्रदीप सांभाळत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाग्रस्त आईच्या उपचारार्थ तीन लाखांसाठी आईचे तीन तोळे दागिने विकावे लागले, हा प्रसंग आयुष्यातील कटू प्रसंग असल्याचे प्रदीप सांगतात. मात्र, प्रत्येक ठिकाणी अपयश आणि धरसोड होऊनही सध्या प्रदीप यांचा संघर्ष सुरू आहे. एखादी आवड जीवनाला कलाटणी देते, याचा प्रत्यय प्रदीप यांच्या जीवनसंघर्षाकडे पाहून येतो. सुरक्षारक्षक प्रदीप शिंदे यांनी कुठलेही प्रशिक्षण न घेता चित्रकला जोपासली, अशा या संघर्षमयी कलाकाराला पुढील प्रवासासाठी दै.‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.