मुंबईत २१व्या शतकातील पायाभूत सुविधांचा विकास करणार : मोदी

ठाणे – दिवा नव्या रेल्वेमार्गासह दोन उपनगरी गाड्यांचे उद्घाटन

    18-Feb-2022
Total Views |
modi

अहमदाबाद – मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जाणार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : स्वतंत्र भारताच्या विकासामध्ये मुंबई महानगराचे योगदान अनन्यसाधारण आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबई शहरामध्ये एकविसाव्या शतकातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर केंद्र सरकारच भर असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केले. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित होते.
 
 
 
 
स्वतंत्र भारताच्या प्रगतीमध्ये मुंबई महानगराचे योगदान फार मोठे आहे. आत्मनिर्भर भारतासाठीही मुंबईचे योगदान महत्वाचे ठरणार असून त्यासाठी मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकार मुंबईसाठी एकविसाव्या शतकातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत असल्याने मुंबईतील रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. मुंबई उपनगरात अतिरिक्त ४०० किमी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, १९ स्थानके आधुनिक सीबीटीसी सिग्नल सिस्टीमसारख्या सुविधांसह आधुनिक करण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
 
अहमदाबाद – मुंबई हायस्पीड रेल्वे देशाची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या हायस्पीड रेल्वेमुळे मुंबईचा आणखी वेगाने विकास साध्य होईल. त्याचप्रमाणे मुंबईची ओळखही अधिक मजबूत होईल, त्यामुळे या प्रकल्पास वेगाने पूर्ण करण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. करोना संकटातही भारतीय रेल्वे गतीमानतेने कार्य करीत होती. गेल्या दोन वर्षांत रेल्वेने मालवाहतुकीत नवे विक्रम केले, याच कालावधीत आठ हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आणि साडेचार हजार किमी मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले. शेतकरी किसान रेलच्या माध्यमातून देशभरातील बाजारपेठांशी जोडले गेले आहेत. नवभारताच्या विकासामध्ये भारतीय रेल्वेदेखील महत्वाचे योगदान देत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.