गेल्या वर्षी अध्यक्ष जो बायडन यांच्या निर्णयानंतर अमेरिकन सैनिकांनी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमधून माघार घेतली अन् इस्लामी कट्टरतावादी तालिबान्यांची सत्ता आली, त्याला आता सहा महिने उलटून गेले. अफगाणिस्तानवरील तालिबानी राजवटीच्या या सहामाहीत देशात अनेक बदल झाल्याचेही पाहायला मिळाले. स्वतःचीच सत्ता आल्याने तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील हिंसाचार, गोळीबार, बॉम्बस्फोटात बरीच घट केल्याचे इथले नागरिक आता अनुभवत आहेत. तथापि, आजही अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर फिरणार्या सशस्त्र तालिबानी लढवय्यांचे दृश्य सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण करतच आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पतनाच्या दिशेने वेगाने धावताना दिसत आहे.
दरम्यान, नव्वदच्या दशकाच्या अखेरीसही अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आली होती, तेव्हा मुलींच्या शाळेत जाण्यावर आणि महिलांच्या नोकरी करण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता मात्र तालिबानने अपवादात्मक परिस्थितीत महिलांना काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयासह काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक महिला नोकरीसाठी परतल्या आहेत. पण, अन्य मंत्रालयांतील महिला कर्मचारी अजूनही नोकरीवर परतण्याच्या प्रतीक्षेतच आहेत.
निवडक क्षेत्रात महिलांना नोकरी देणार्या तालिबानी सत्ताकाळात आता इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यापुढच्या इयत्ता सातवी व अन्य मुलींच्या देशाच्या बहुतेक भागांत शाळेत जाण्यावर बंदीच आहे, त्या अजूनही घरातच कैदेत आहेत. तत्पूर्वी मार्च अखेरपर्यंत अफगाणी नववर्षानंतर सर्वच विद्यार्थिनी शाळेत जातील, असे आश्वासन तालिबानने दिले होते. ते पूर्ण होते का, हे आता येत्या महिना-दीड महिन्यात दिसेलच. दरम्यान, चालू आठवड्यातच सोमवारी जगभरात ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा झाला. अफगाणिस्तानमध्येही तरुण-तरुणी ‘व्हॅलेन्टाईन डे’साठी उत्साहित होते. पण, इस्लामी धर्मांध तालिबान्यांना ‘व्हॅलेन्टाईन डे’ मान्यच नाही. त्याचमुळे त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’चा विरोध करतानाच हृदयाच्या आकाराच्या फुलांची-पुष्पगुच्छांची विक्री करणार्यांनाही ताब्यात घेतले. कट्टरतावादी पुरुषांचे वर्चस्व असलेले तालिबानी शासन प्रेमाविषयीच्या पाश्चात्य विचारांप्रती सहिष्णू नसल्याचेच यावरुन दिसून येते. महिलांनी नोकरी करणे, सर्वच मुलींनी शाळेत जाणे, तरुणांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करणे, या प्रत्येक मुद्द्यांतून तालिबान्यांची धर्मांध इस्लामी विचारसरणी पाहायला मिळते. पण, त्या विचारसरणीने देश चालवता येत नाही. त्यामुळेच इस्लामी कट्टरतावादी तालिबान्यांच्या राजवटीत अफगाणिस्तानची अवस्था कंगाल होत असल्याचे दिसून येते. देशातील दारिद्य्र, बेरोजगारी आणि उपाशी-अर्धपोटी राहाणार्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. परिणामी अफगाणिस्तानमध्ये आर्थिक अराजक माजण्याची पुरेपूर शक्यता आहे.
दरम्यान, तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर अफगाणिस्तानची नऊ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली. त्यात अमेरिकेत जमा असलेल्या अफगाणिस्तानच्या सात अब्ज डॉलर्सच्या संपत्तीपैकी साडेतीन अब्ज डॉलर्स ‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना दिले जातील, असे म्हटले होते, तर उर्वरित साडेतीन अब्ज डॉलर्स अफगाणिस्तानच्या साहाय्यासाठी दिले जातील. तथापि, तालिबान्यांनी अमेरिकेच्या निर्णयाचा निषेध केला आहे. अमेरिका अफगाणिस्तानच्या वाट्याचे पैसे घेत असल्याचा आरोप तालिबान्यांनी केला आहे, तर ‘इंटरनॅशन क्रायसिस ग्रुप’च्या ‘आशिया प्रोग्रॅम’चे वरिष्ठ सल्लागार ग्रीम स्मिथ यांच्या मते, “आर्थिक दडपणाने तालिबानी शासनातून देश मुक्त होणार नाही. पण, ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे लोकांचे पलायन वाढेल.” एकूणच, तालिबानी शासनात अफगाणिस्तानचे सारे काही आलबेल नाही, उलट त्या देशाची परिस्थिती आणखी बिकट होत चालल्याचे दिसते. इस्लामी कट्टरतावाद्यांच्या राज्यातून याहून वेगळे काही होऊही शकत नाहीच म्हणा!