अरूसाची जबाबदारी!

    17-Feb-2022   
Total Views |

arusa
 
 
कर्नाटकमध्ये ‘हिजाब’बद्दल अजून न्यायालयाने अंतीम निर्णय दिलेला नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘हिजाब’ किंवा कुणीही शिक्षणसंस्थेत नियमित पोशाखातच यावे, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे कर्नाटकमध्ये ज्या शाळा-महाविद्यालयांत गणवेश आहे, तिथे विद्यार्थ्यांना गणवेशातच येण्याची सक्ती आहे. ‘हिजाब’ घालून तिथे प्रवेश नाही. मात्र, कर्नाटकमध्ये ‘त्या’ मुलीने ‘हिजाब’ची जाहिरात करून असंख्य मुस्लीम मुलींच्या मानेवर पुन्हा ‘हिजाब’चे जोखड बसवले आहे. मुस्लीम पालकांना मनात असो की नसो, पण उगीच वादंग नको म्हणून ते आपल्या मुलींना ‘हिजाब’ परिधान करायला लावत आहेत. शाळेत ‘हिजाब’शिवाय प्रवेश नाही म्हणून मग मुलींना शाळा-महाविद्यालयांत पाठवतच नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘खुद को अच्छा मुसलमान साबित करने के लिए ‘हिजाब’ पहनने की जरूरत नही,’ असे जम्मू-काश्मीरमध्ये बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या अरूसा परवेझने म्हटले आणि तिने ‘हिजाब’ घालण्यासही नकार दिला. यावर दहशतवाद्यांनी चक्क तिला ठार मारण्याची आणि तिचा गळा चिरण्याची धमकी दिली. अरूसाने ‘हिजाब’ घातला नाही, म्हणून इस्लामचे नुकसान होत आहे? कोणताही धर्म असा कपड्यात असू शकतो का? कोणताही धर्म निरपराध मुलीचा क्रूर खून करण्याचे समर्थन करतो का? हे धर्मसंमत आहे का? याबाबत इस्लाम ‘स्कॉलर’ आणि विद्वानांनी एकदा तरी पुढे येऊन बोलावे. मुस्लीम पालकांनी विचार करावा की, आपल्या मुलींनी अभ्यास करून संपूर्ण राज्यात बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणार्‍या अरूसासारखे बनावे की, इतर वेळी मनाला वाटेल तसे पोशाख परिधान करणारी आणि पुढे कुणीतरी चिथावले म्हणून केवळ वाद निर्माण करण्यासाठी ‘पहले हिजाब’ म्हणणार्‍या त्या युवतीसारखे बनावे? सच्चा मुसलमान बननण्यासाठी बाहेरील पोशाखापेक्षाआंतरिक नीतिमूल्य आवश्यक आहे, असे म्हणणारी अरूसा ही केवळ मुस्लीमच नव्हे, तर जगभरात प्रतिकूल परिस्थितीत, लिंगभेदाच्या विषमतेत शिक्षणाची आणि प्रगतीची आस असणार्‍या सगळ्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे. अरूसाच्या संरक्षणाची आणि तिच्या वर्तमान- भविष्यातील प्रगतीमय आयुष्याची जबाबदारी केवळ तिच्या पालकांवर नाही, तर जगभरातल्या खर्‍या संवेदनशील मानवतावाद्यांवर आहे.

आभासी मैत्री आणि अत्याचार

सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ली मुली किंवा महिलेची कुणा अपरिचित व्यक्तीशी ओळख होते. मग त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीतही होते. पुढे मैत्रीची परिणती होते ती त्या सोशल मीडियाच्या कथित मित्राकडून त्याच मुलीवरच्या बलात्कारात! समाजातले हे वास्तव अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे, मुंबई पोलिसांचा बलात्कारासंबंधी नुकताच प्रसिद्ध झालेला वार्षिक अहवाल. त्यातलेच लेखाच्या प्रारंभी मांडलेले हे क्रूर सत्य. गेल्या वर्षभरात मुंबईत बलात्काराच्या 888 घटनांची नोंद झाली. यामध्ये ५३४ मुली अल्पवयीन होत्या. या मुलीची आणि संबंधित गुन्हेगाराची गेल्या तीन वर्षांपासून सोशल मीडियावर मैत्री होती. प्रेमाच्या आणाभाका आणि लग्नाचे आमिष दाखवून या मुलीवर बलात्कार करण्यात आला. असे काय आहे की ओळख, मैत्री, प्रेम वगैरेच्या आभासी नात्यात मुली इतक्या गुंतल्या की, अगदी त्यांच्यावर आमिष किंवा दडपण दाखवून बलात्कार झाले? या मुली त्या मुलांच्या नादात इतक्या वाहवत जात असताना त्यांच्या पालकांना याचा जराही कानोसा लागू नये? या विधानावर कित्येक जण आक्षेपही नोंदवतील कदाचित. पण, पालक या दुर्देवी घटनेबद्दल हात झटकून मोकळे होऊ शकत नाहीत, हे इथे समजून घेतले पाहिजे. तसेच सोशल मीडियामधून होणार्‍या ओळखी आणि त्यातील धोके याबद्दल मुलींना माहितीच नव्हती का? जरा डोळे आणि मन उघडे ठेवून पाहिले, तर जाणवते की, जगाच्या बर्‍यावाईट अनुभवातून दूर असणार्‍या अल्पवयीन मुलींना बाहेरच्या जगात काय धोके आहेत, याची जाणीव नाही. चित्रपटात, ‘वेबसीरिज’मध्ये आणि मालिकांमध्ये जी मैत्री आणि त्यातून पुढचे प्रेम दाखवतात, ते सगळे या मुलींसाठी खरे असते. त्यांच्या पालकांवरही या सगळ्यांचा प्रभाव आहेच. अर्थात यात प्रसारमाध्यमांचा दोष नाही. कारण, ‘जो बिकता है वही दिखता हैं।’ या सगळ्या प्रकारात असेही दिसते की, सोशल मीडियाच्या मैत्रीतून मुलींना पद्धतशीरपणे जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार करणार्‍या त्या नराधमांना कायद्याचा धाक नाही. तुरूंगात जावे लागेल, शिक्षा होईल, याची भीतीही नाही. यावर काही लोकांचे म्हणणे की, धनंजय मुंडे आणि संजय राठोड या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यात त्यांना हे असेच वाटणार म्हणा! कारण ‘यथा राजा तथा प्रजा!’
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.