मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेले क्लीनअप मार्शल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा येऊ लागल्या आहेत. हे क्लीनअप मार्शल मास्क लावलेल्या लोकांकडूनही दंड आकारात असल्याची तक्रार नागिरकांनी केली आहे. क्लीनअप मार्शलच्या अश्या वागण्याचा अनुभव अभिनेते किशोर कदम यांनासुध्दा आला आहे. अंधेरी पूर्वच्या नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार किशोर कदम यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून छायाचित्रासह उघडकीस आणला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून या क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली होती. विनामास्क फिरणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी २०० दुपाई दंड आकारण्याचे अधिकार या मार्शलला देण्यात आले आहेत. परंतु मास्क लावलेल्या नागरिकांकडूनही दंड वसूल केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी लोकांना पावती न देता त्यांच्याकडून थोडेथोडके पैसे घेऊन विनामास्क नागरिकांना सोडण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेकडे येत आहेत.
एवढंच नाही तर पाणी पिण्यासाठी मास्क खाली केला असता मार्शल्सकडून होणाऱ्या दंड वसूलीबद्दल आणि त्यांच्या उद्धट वागणुकींबद्दल नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहे. नागरिकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यावेळी हे प्रकार थांबले होते. परंतु आता पुन्हा नागरिकांकडून याबाबतच्या तक्रारी पुन्हा वाढीस लागल्या आहेत.