हजारो कोटींचे कर्ज फेडणारी मालविका

    16-Feb-2022   
Total Views |

Malvika Hegde
 
 
 
पतीने केलेली आत्महत्या आणि हजारो कोटींच्या कर्जाखाली दबलेली कंपनी ‘कॅफे कॉफी डे’... पण, मालविका हेगडे खचल्या नाहीत, उलट जबाबदारी घेत पुढे आल्या अन् ‘सीसीडी’ला कर्जमुक्तीकडे घेऊन गेल्या. त्यांच्याविषयी...
 
 
 
‘कॅफे कॉफी डे’ भारतातील सर्वांत मोठी ‘कॉफी शॉप चेन’ असून कंपनीची स्थापना व्ही. जी. सिद्धार्थ यांनी १९९६ साली केली. जगातल्या विविध देशात ‘कॉफी शॉप चेन’ची संकल्पना त्याआधीच प्रचलित होती. त्याच धर्तीवर भारतातही आपण ‘कॉफी शॉप चेन’सुरू केली. हा विचार व्ही. जी. सिद्धार्थ यांनी केला. त्यातूनच ‘कॅफे कॉफी डे’चा जन्म झाला. कर्नाटकातील व्ही. जी. सिद्धार्थ यांनी ‘कॉफी शॉप’ सुरू करण्याची योजना तयार केली आणि असंख्य अडचणींवर मात करत ती प्रत्यक्षात आणली. तथापि, कोणी काही नवे सुरू करत असेल, तर पाय मागे खेचणारे अनेक लोक असतात. तसेच व्ही. जी. सिद्धार्थ यांच्याबाबतीत झाले आणि अनेकांनी त्यांचा ‘कॉफी शॉप चेन’चा व्यवसाय चालणार नाही, असे म्हटले. पण, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले काम करण्यावरच व्ही.जी. सिद्धार्थ यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर ‘कॅफे कॉफी डे’नी गाठलेले यशाचे शिखर फक्त कर्नाटकच नव्हे, तर अवघ्या भारताने पाहिले.
 
 
 
आज देशातील जवळपास सर्वच मोठमोठ्या शहरांत ‘कॅफे कॉफी डे’ची शॉप्स आपल्याला दिसतात, ती व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या जिद्दीमुळेच. जवळपास दोन-अडीच दशके ‘कॅफे कॉफी डे’चे सर्वकाही सुरळीत चालू असल्याचे दिसत होते. पण, अचानक २०१९ साली एके दिवशी बातमी आली की, ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या केली. २९ जुलै रोजी व्ही. जी. सिद्धार्थ आपल्या वाहनचालकाबरोबर मंगळुरुजवळ पोहोचले होते. तिथे त्यांनी चालकाला थांबायला सांगितले आणि गाडीतून उतरून पायी चालू लागले. त्याचवेळी ते गायब झाले, परतलेच नाही आणि थेट ३१ जुलैला मंगळुरुजवळ वाहणार्‍या नेत्रावती नदी किनारी मच्छीमारांना व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळला. भारतीय उद्योगजगत आणि विशेषत्वाने शहरी भारतीयांना व्ही. जी. सिद्धार्थ यांचा अशाप्रकारे, कर्जाच्या बोजामुळे आत्महत्येद्वारे झालेला मृत्यू अचंबित करणारा होता.
 
 
 
व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण, त्यातही आता पुढे ‘कॅफे कॉफी डे’चे काय?, ‘कॅफे कॉफी डे’मध्ये काम करणार्‍या २५ हजार कर्मचार्‍यांचे काय?, ‘कॅफे कॉफी डे’ आता दिवाळखोरीत निघणार काय? असे प्रश्न कंपनीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर जवळपास कित्येक महिने ‘कॅफे कॉफी डे’ कंपनी मालकाविना होती. कंपनीसमोरच्या, कर्मचार्‍यांसमोरच्या अडचणी कमी झालेल्या नव्हत्या तर वाढतच होत्या. पण, त्या परिस्थितीत व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी पुढाकार घेतला. एका बाजूला पतीच्या आत्महत्येचे दुःख आणि दुसर्‍या बाजूला हजारो कोटींच्या कर्जाने वाकलेली कंपनी! मालविका हेगडे यांना ‘कॅफे कॉफी डे’ला बाजारात पुन्हा एकदा सर्वात मोठ्या स्पर्धकाच्या रुपात स्थापित करायचे होते आणि त्यांनी त्यासाठी प्राणपणाने काम सुरु केले. त्यानंतर त्यांनी केलेले काम आणि कंपनीची सुधारलेली स्थिती कोणत्याही अपयशाने खचलेल्या, कर्जात बुडालेल्या व्यक्तीला, उद्योजकाला नव्याने उभारी देणारेच म्हटले पाहिजे.
 
 
 
डिसेंबर २०२० मध्ये मालविका हेगडे ‘कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. परिस्थिती त्यांच्याविरोधात होती. परंतु, मालविका हेगडे यांनी यशाचा आदर्श निर्माण केला. ‘कॅफे कॉफी डे’ भारतातील शहरी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग झालेला आहे. देशातील १६५ शहरांत ‘कॅफे कॉफे डे’ची ५७२ कॅफे आहेत, ३३३ एक्सप्रेस किओस्क आहेत, तर ३६ हजार, ३२६ व्हेंडिंग मशीन आहेत. मालविका हेगडे इतक्या मोठ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या त्यावेळी कंपनी कर्जाखाली दबलेली होती. दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंत कंपनीवर सात हजार कोटींचे कर्ज होते. भारतातील कितीतरी उद्योगपतींनी बँकांची कर्जे घेतल्याचे, नंतर कर्जे बुडवून देशातून पलायन केल्याचे, परदेशात आश्रय घेऊन तिथले नागरिकत्व स्वीकारल्याचे अनेक दाखले आहेत. पण,कंपनीवर कर्जाचा डोंगर असूनही मालविका हेगडे घाबरणार्‍या नव्हत्या. त्यांनी आपल्या पतीचे स्वप्न आणि त्यांची कंपनी पुढे नेण्याचा निर्णय घेतला. ‘कॅफे कॉफी डे’मध्ये काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव त्यांना होती. सोबतच कंपनीसमोर उद्भवलेली परिस्थितीही त्या चांगल्याच ओळखून होत्या. मालविका हेगडे यांनी ‘कॅफे कॉफी डे’ कंपनी स्वतःच्याहिंमतीवर हाताळली आणि कंपनीची परिस्थिती बर्‍याच अंशी सुधारली.
 
 
 
कंपनीच्या मुख्य कार्यकारी म्हणून काम करताना मालविका हेगडे यांनी आपल्या धाडसी स्वभावाचा आणि क्षमतेचा परिचय करुन दिला. ‘कॅफे कॉफी डे’वर २०१९ साली सात हजार कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्यामुळेच व्ही.जी.सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली. पण, दि. २१ मार्च, २०२१ पर्यंत घटून कर्जाचा आकडा १ हजार, ७७९ कोटींवर आला. त्यात ५१६ कोटींच्या अल्पकालीन, तर १ हजार, २६३ कोटींच्या दीर्घकालीन कर्जाचा समावेश आहे. कर्जाच्या कमी झालेल्या रकमेवरुनच ‘कॅफे कॉफी डे’ची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे, बाजारात पुन्हा एकदा उभी राहत असल्याचे दिसते, ती अर्थातच मालविका हेगडे यांच्या निडर नेतृत्वामुळेच! आता कोरोनाचा प्रभाव जसजसा कमी होईल, तसतशी ‘कॅफे कॉफी डे’ची परिस्थिती आणखी सुधारु शकते. मालविका हेगडे यांच्यामुळे ‘कॅफे कॉफी डे’ कंपनी तर वाचलीच, पण तेथे काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांचा रोजगारही वाचला. आपल्या कर्तृत्वामुळे भारतीय उद्योग जगतासमोर मालविका हेगडे यांनी अद्भुत उदाहरण समोर ठेवले. त्यापासून नक्कीच इतरही अनेक लोक प्रेरणा घेतीलच.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.