
नावात बरेच काही आहे...!
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : आसामी संस्कृती आणि परंपरेच्या विरुद्ध असलेल्या शहरांची आणि गावांची नावे बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही नागरिकांकडून सुचना मागविण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू केले जाणार आहे, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी बुधवारी केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, नावात बरेच काही आहे. एखाद्या शहराच्या अथवा गावाच्या नावावरून संस्कृती आणि परंपरा दर्शविली जाते. त्यामुळे आमची संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात असणाऱ्या, जाती किंवा समुदायाचा अपमान करणारी शहरे - गावांची नावे आसाममध्ये बदलण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून सुचना मागविण्यात येणार असून विशेष पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी मंगळवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी गुवाहाटी येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपुजन करताना आसाममधील ‘कालापहाड’ आणि अन्य गावांची नावे बदलण्यात येतील, अशी घोषणा केली होती. ते म्हणाले, लोकांना उच्चारण्यास सोयीस्कर नसलेली आणि राज्यातील काही समुदायांसाठी अपमानास्पद अशी नावे काही शहरे व गावांना देण्यात आली आहेत. ती नावे बदलण्याची गरज आहे. उदाहरणादाखल बघायचे तर ‘कालापहाड’ या नावाने ‘कामाख्या’ हे नाव उध्वस्त केले. कोणत्याही गावाचे नाव ‘कालापहाड’ ठेवण्याचे कारण मला समजले नाही. अशाप्रकारची नावे लोकांशी चर्चा करून बदलणे अतिशय गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते.