मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यापासूनच भाजप विरुद्ध संजय राऊत असा सामना वारंवार पहायला मिळतो. आता या वादात आणखी एक ठिणगी पडण्याची परीस्थिती उद्भवली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करत १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांची पोलखोल करणार असल्याचा दावा केला आहे.
भाजपा केंद्रातील सत्तेचा वापर करत आणि केंद्रीय तपास यंत्रनांची मदत घेत महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्याचे काम करत असल्याचे आरोप संजय राऊत वारंवार करत असल्याचे दिसून येते. मात्र, अशातच आता संजय राऊतांनी मोठं विधान केले आहे. १५ फेब्रुवारी रोजी संजय राऊत शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेनंतर भाजपच्या साडेतीन नेत्यांना कारागृहात जावे लागेल आणि ज्या ठिकाणी अनिल देशमुख होते त्याच ठिकाणी त्यांना रहावे लागेल असे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे आता संजय राऊतांनी सांगितलेले भाजपाचे साडेतीन नेते कोण? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शेवटी "जो उकाडना है उखाड लिजिए", असं म्हणत राऊतांनी भाजपाला खुले आव्हान दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणात "आता तर फक्त टॉस झाला आहे, मॅच अजून बाकी आहे", असं सुचक विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मात्र, कोविड घोटाळा बाहेर येत आहे त्यामुळे या प्रकरणातून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी संजय राऊत अशी बेताल वक्तव्य करत असल्याचा पलटवार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.