‘स्वाईन फ्लू’ : दशकापूर्वीची महामारी आणि सद्यस्थिती

    15-Feb-2022
Total Views |

swaine flue
 
 
दशकभरापूर्वी कोरोनाप्रमाणेच ‘स्वाईन फ्लू’ने जगातल्या काही देशांत थैमान घातले होते. तेव्हा, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लूची लक्षणे, कोरोनाशी साधर्म्य-फरक, लसीकरण यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे घेऊन बरेच रुग्ण ‘फॅमिली डॉक्टर’कडे येतात. पण, दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीने सर्व संदर्भ बदलले. तापामध्ये लक्षणे कमी प्रमाणात असली, तरी प्रत्येकाला कोरोनाची व मृत्यूची भीती वाटू लागली. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, ज्यांना या आजाराच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागला, त्यांना या आजाराचा मोठा तडाखा बसला. अनेकांचा अकाली मृत्यू झाला, तर अनेकांनी प्रदीर्घ काळापर्यंत रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली. दि. १६ जानेवारीपासून भारतात कोरोनावरील लसीकरणास प्रारंभ झाला व आतापर्यंत १६० कोटी मात्रा देण्यात आले. याच प्रकारचा ‘एच1-एन1’, व्हायरस कुटुंबातील ‘स्वाईन फ्लू’ हा ‘व्हायरस’चा आजार काही वर्षांपूर्वी आला होता आणि त्याने रुग्णांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. सुदैवाने ही साथ लवकर आटोक्यात आली. जाणून घेऊया ‘स्वाईन फ्लू’ या आजाराबद्दल.
 
 
मार्च २००९ मध्ये मेक्सिकोमध्ये या ‘व्हायरस’चा उद्रेक झाला. हा ‘व्हायरस’ ‘स्पॅनिश फ्लू’ ‘व्हायरस’पेक्षा थोडा वेगळा होता. पक्षी, डुक्कर आणि मनुष्यातील ‘व्हायरस’च्या मिश्रणातून हा नवीन ‘व्हायरस’ तयार झाला होता. युरोपियन डुकरातील ‘फ्लू व्हायरस’मुळे हा आजार झाला म्हणून याला ‘स्वाईन फ्लू’ (डुक्कर फ्लू) म्हणून संबोधण्यात आले. एप्रिल २००९ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास पहिल्यांदा ‘आंतरराष्ट्रीय काळजीची सार्वजनिक आणीबाणी’ म्हणून घोषित केले. पुढे जून २००९ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास ‘महामारी’ म्हणून घोषित केले. जगभरात याची लागण झाली. एका वर्षात फक्त अमेरिकेत सहा कोटी लोकांना याची लागण झाली. जगभरात १०० ते १४० कोटी लोकांना या रोगाची लागण झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सुदैवाने ही साथ काही महिनेच राहिली. मे २०१० मध्ये साथीत लक्षणीय घट झाली आणि दि. १० ऑगस्ट २०१० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ही साथ आटोक्यात आल्याचे जाहीर केले.
 
 
या साथीच्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर अनेक ताशेरे ओढले गेले. त्यात एक आरोप असा होता की, औषध कंपन्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव टाकून ‘महामारी’ घोषित करण्यास भाग पाडले. महामारीचा सल्ला देणार्‍या तज्ज्ञ मंडळींचे औषध कंपन्या, ‘अ‍ॅण्टिव्हायरस’ औषध बनविणार्‍या कंपन्या, लस बनविणार्‍या कंपन्यांशी लागेबांधे होते, असा आरोप करण्यात आला. त्याही वेळेस या महामारीने जगभर प्रचंड भीती निर्माण केली होती. या आजारावर लस निर्माण झाली. परंतु, सुरुवातीस ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती. या लसीत काही अव्यवहार्य गोष्टी होत्या. ही लस महागडी होती. ‘व्हायरस’मध्ये सतत होणार्‍या बदलांमुळे (म्युटेशन) ही लस दरवर्षी घ्यावी लागणार होती. आज दशक उलटले, तरी या लसीबद्दलचे लोकशिक्षण व तिचा प्रसार अत्यल्प दिसतो. दरवर्षी नियमितपणे ही महाग लस घेणारे फार थोडे आहेत. हे तुटपुंजे लसीकरण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच पुरेसे नाही. आज तोच गोंधळ कोरोना लसीचा ‘बूस्टर डोस’बद्दल दिसत आहे. ‘बूस्टर डोस’ कुणी प्राधान्याने घ्यायचा? हा डोस दरवर्षी घ्यावा लागेल का? याबद्दल काही धोरण ठरविण्यात आले नाही. सर्वात न पटणारी गोष्ट म्हणजे कोरोना लसीकरणातून लहान मुलांना लांब ठेवण्यात आले होते. या सर्व गोंधळावरुन जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीबद्दल पुन्हा शंका घेण्यात येऊ लागली. ‘व्हायरस’मध्ये होणार्‍या ‘म्युटेशन’बद्दल व नवीन ‘व्हायरस’च्या ‘म्युटेशन’बद्दल माहिती आणि भीती, प्रसार माध्यमातून पटकन पसरविण्यात येते. मात्र, या दोन वर्षांत मानवी शरीरात झालेले बदल (म्युटेशन) त्याच्या प्रतिकारशक्तीत झालेली वाढ याबद्दलच्या संशोधनात आस्था दाखविली जात नाही व त्याला प्रसिद्धीही दिली जात नाही. २०१० नंतरही ‘स्वाईन फ्लू’च्या काही केसेस आढळतात. परंतु, जसा जसा काळ गेला, तशी याची दहशत कमी झाली.
 
‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे
 
ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे प्रामुख्याने आहेत. हीच लक्षणे सध्या ‘फ्लू’च्या आजारातदेखील आढळतात. ‘स्वाईन फ्लू’चे निदान करण्यासाठीची चाचणी सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होते. पण, तेथे जाण्याची रुग्णाची मानसिकता नसते. काही वर्षांपूर्वी या चाचणीला खासगी प्रयोगशाळेत सुमारे साडेचार हजार रुपये लागत होते. चाचणी करावी की न करावी, हा यक्षप्रश्न डॉक्टर आणि रुग्णांपुढे उभा राहतो. संशयित रुग्णात चाचणी करणे हिताचे. कारण, स्वाईन फ्लू हा जरी ‘व्हायरल’ आजार असला, तरी त्यावर प्रभावी औषध उपलब्ध आहे. ‘ओसेलटॅमिवीर’ (टॅमीफ्लू) हे औषध उपलब्ध आहे. हे औषध फक्त मर्यादित रुग्णांसाठी वापरले जाते. ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णाशी संपर्क होऊन येऊन ताप येणे, ‘स्वाईन फ्लू’ची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ येणे, रुग्णांची काळजी घेणारे नातेवाईक, आरोग्य कर्मचारी यांना मर्यादित दिवसांसाठी ‘टॅॅमीफ्लू’च्या गोळ्या दिल्या जातात. हे औषध ‘स्वाईन फ्लू’वर प्रभावी आहे. रुग्णामध्ये गुंतागुंत आढळली तर त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करावे.
 
 
सर्व ‘व्हायरल’ आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय आहे, तो म्हणजे संपूर्ण विश्रांतीचा. याने आजारापासून लवकर बरे होण्यासाठी मदत होते व रुग्ण घरी बसून राहिल्यामुळे आजाराचा प्रसार होण्याची शक्यता कमी होते. व्यवस्थित जेवण व पथ्य पाळल्यास रुग्ण आजारातून लवकर बरा होतो.
 
प्रतिबंधात्मक उपाय
 
ही लस दहा वर्षांपूर्वी उपलब्ध झाली असली, तरी हिचा वापर कमी प्रमाणात होताना दिसतो. लसीच्या वापरास खालील कारणांमुळे मर्यादा आहेत.
 
(१) लस महागडी आहे. प्रत्येक मात्रेला सुमारे ८०० ते एक हजार रुपये लागतात.
(२) ही लस सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाही.
(३) ही लस दरवर्षी घ्यावी लागते.
 
लसीचे वेळापत्रक
 
ही लस वयवर्षे सहा महिन्यांच्या वरच्या सर्व रुग्णांना देता येते. सहा महिने ते तीन वर्षांच्या मुलांना एक महिन्याच्या अंतराने दोन मात्रा दिल्या जातात. तीन वर्षांवरील सर्वांना एक मात्रा दिली जाते. ही मात्रा दरवर्षी घ्यावी, अशी अपेक्षा आहे. अनेक सुखवस्तू आणि सुशिक्षित कुटुंबेही लस टाळताना दिसतात. दरवर्षी लस टोचून घेण्याची मानसिकता अजून तयार व्हायची आहे. देवी, कांजिण्या, गोवर, गालगुंड, ‘हिपॅटायटिस अ’ आणि ‘ब’ हेदेखील ‘व्हायरस’ आजार आहेत. देवीच्या आजाराचे संपूर्ण जगातून निर्मूलन झाले आहे. कांजिण्या, गोवर, गालगुंड हे आजार आयुष्यात एकदा होऊन गेले की पुन्हा होत नाही, असे जुन्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारांच्या लसी दरवर्षी घ्याव्या लागत नाही. कधी कधी असे वाटते की, संशोधनाच्या नावाखाली आम्ही लसीकरणाचा अतिरेक तर करत नाही ना!
 
‘स्वाईन फ्लू’ आणि कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य लोकशिक्षण, स्वच्छता अभियान, मानसिक आरोग्य व पर्यावरणाचा र्‍हास रोखणे महत्त्वाचे वाटू लागले आहे.
 
- डॉ. मिलिंद शेजवळ