डाव्या विचारसरणीतच घोळ

    15-Feb-2022   
Total Views |

Rana Ayyub
 
 
वरकरणी कोणाला कितीही आकर्षक वाटत असली तरी डाव्या-उदारमतवादी विचारसरणीत घोळ आहेतच. साधेसुधे कुर्ते पायजमे घालणारे, गळ्यात झोळी घेऊन फिरणारे, वयाच्या ४०व्या वर्षांपर्यंत विद्यापीठांत पडीक राहणारे डावे-उदारवादी मनातूनच दगाबाज आहेत. कोणताही विचार न करता निर्दोष लोकांना फसवण्यात डावे-उदारमतवादी निपुण आहेत. पण, आपण दगा देऊन, फसवणूक करुनही नामानिराळे राहू, कधीही पकडले जाणार नाही अन् पकडले गेलो तरी माफ केले जाईल, अशा दिवास्वप्नात वावरणे हे डाव्या-उदारवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. तिस्ता सेटलवाड, साकेत गोखले आणि आता राणा अयुब यांच्या कृतींवरुन तेच दिसते. ही तिन्ही मंडळी डावी-उदारमतवादी तर आहेतच, पण तिघांवरही आर्थिक दगाबाजीचा आणि पैशांच्या हेराफेरीचा आरोप आहे. तसेच घोटाळे करूनही आपण कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, असेही त्यांना वाटते. म्हणजेच, आपल्या कथित गुन्ह्यांविरोधात भारतीय कायदे कारवाई करणार नाही, असे त्यांना वाटते आणि कारवाई केलीच तर मात्र या लोकांसाठी भारत फॅसिस्टवादाचा अड्डा होऊन जातो. २००२ सालच्या गुजरात-गोध्रा दंगलीतील पीडितांच्या साहाय्यासाठी तिस्टा सेटलवाड यांनी निधी गोळा केला होता. नंतर मात्र तिस्टा सेटलवाड आणि पती जावेद आनंद यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीस’ आणि ‘सबरंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थांवर घोटाळ्याचे आरोप केले गेले. २०१५ साली गुजरात पोलिसांनी तिस्टा सेटलवाड आणि पती जावेद आनंद यांनी पीडितांसाठीचा निधी वैयक्तिक बाबींवर खर्च केल्याचे सांगितले. संपुआ सरकारच्या कार्यकाळात तिस्टा सेटलवाड यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची फसवणूक करत आर्थिक मदत मिळवल्याचा आणि १.५१ कोटी रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर ‘सिटीझन फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीस’ने गोळा केलेला निधी दारुवर खर्च केल्याचा आरोप गुजरात दंगलीतील पीडितांनी केला होता व हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले होते. तर २०१६ साली केंद्र सरकारने या लोकांच्या ‘सबरंग ट्रस्ट’ची ‘एफसीआरए’ परवानगी रद्द केली होती. इथेच डाव्या-उदारमतवाद्यांनी उत्साहाने कौतुक केलेल्या तिस्टा सेटलवाड यांचा खरा चेहरा दिसून येतो.

कायदा आपले काम करेल

डाव्या-उदारवाद्यांचेच आणखी एक लाडके नाव म्हणजे साकेत गोखले. जनहित याचिका आणि माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून भारतात सत्ता परिवर्तन करू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र, याच साकेत गोखले यांनी ‘आरटीआय अ‍ॅक्टीव्हिजम’च्या नावाखाली पैसा गोळा केला होता. मोदीविरोधात आंधळे झालेल्या अनेक डाव्या-उदारमतवाद्यांनी त्यांना पैसे दिले होते. नंतर मात्र याच लोकांनी साकेत गोखलेंनी दानाद्वारे गोळा केलेल्या पैशांचे तपशीलवार विवरण द्यावे, अशी मागणी केली होती. कट्टर मुस्लीम लेखक हुसैन हैदरी यांचा त्यात समावेश होतो आणि हे प्रकरण ७६ लाख रुपयांचे होते. पण, आपण दान घेतल्याने ते देणार्‍यांना उत्तरदायी नाही, असे उत्तर साकेत गोखले यांनी यावर दिले होते, तर आता राणा अयुब यांच्याशी संबंधित एक हेराफेरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या भारतविरोधी प्रकाशनात राणा अयुब स्तंभलेखक आहेत. आपला पंतप्रधान मोदीविरोध, हिंदूविरोध राणा अयुब ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या माध्यमातून प्रसारित करत असतात. पण, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने यासाठी दिलेल्या बिदागीव्यतिरिक्त अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्याकडे १.१७ कोटींची अधिकची रक्कम आढळली. तसेच राणा अयुब यांनी दानाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गोळा केले आणि त्याचा वापर वैयक्तिक खर्चासाठी केल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत.
राणा अयुब यांनी दान मिळवण्यासाठी २०२० साली झोपडपट्टीवासीयांसाठी निधी आणि आसाम, बिहार व महाराष्ट्रासाठी मदतकार्य आणि २०२१ साली ‘कोविड-१९’ प्रभावितांसाठी मदत, असे तीन उपक्रम राबवले होते. पण, त्यांनी यातून गोळा केलेला पैसा पीडितांसाठी नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठी वापरल्याचा आणि ‘एफसीआरए’अंतर्गत परवानगी नसतानाही परकीय निधी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अशाप्रकारे डाव्या-उदारमतवादी विचारसरणीतील लोक आर्थिक फसवाफसवी करत असल्याचे दिसून येते. पण, त्यांचे कुकृत्य पकडले गेले की, स्वतःलाचपीडित ठरवण्यातही हे लोक प्रवीण असतात. वरील तिघांनीही असेच केले होते, आपला गुन्हा माफ करावा, आपल्याला काही शिक्षा होऊ नये, असे त्यांना वाटत होते. पण, कायदा त्यांच्यापेक्षा वरचढ आहे, तो आपले काम करेलच.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.