मुंबई: मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असलेल्या चेंबूर स्थानकाला दुर्गंधीने वेढले आहे. स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांमुळे लोकांना स्थानक परिसरातून ये -जा करताना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. या दुकानांच्या कचऱ्यातून वाट काढत जाण्याची वेळ सध्या चेंबूरकरांवर आली आहे. पालिकेकडून तसेच रेल्वेकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने चेंबूरकर या घाणीतूनच वाट काढत जात असतात.
स्थानक परिसरात तिकीट घरच्या शेजारीच हे फेरीवाले बसतात. त्यांच्याकडे स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळत असल्याने लोकांची गर्दीही होते. पण रात्री दुकान बंद करताना हे विक्रेते त्यांचा कचरा तिथेच टाकून निघून जातात. हा कचरा दिवसेंदिवस तिथेच पडून असतो. त्या कुजलेल्या कुबट वासामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. कोरोना महासाथीने सार्वजनिक आरोग्याचे महत्व अधोरेखित केले आहे. या नंतरही पालिकेकडून होणारे हे दुर्लक्ष संतापजनक आहे.