नवी दिल्ली : पत्रकार राणा अय्युब यांची १ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध संपत्ती काही दिवसांपूर्वी ईडीकडून जप्त करण्यात आली. केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हिंदू आयटी सेल या एनजीओचे संस्थापक विकास संक्रितायन यांनी हा आरोप केला होता.
राणा अय्युब यांनी केट्टोवर रिलीफ फंडच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जनतेचा पैसा कमावला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच आधारावर ईडीने ही कारवाई केली आहे. २०२० ते २१ या काळात तीन मोहीमांसाठी राणा अय्युब यांनी केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन निधी गोळा केला होता. आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातल्या पुरग्रस्तांसाठी तसेच झोपडपट्टीवासियांना मदत म्हणून कोरोना काळातली मदत मोहीम यासाठी त्यांनी हा फंड उभा केला होता.
जवळपास २ कोटी ६९ लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला असून यातले ७२ लाख स्वतःच्या नावावर, ३७ लाख बहिणीच्या खात्यात आणि १ कोटी ६० लाख वडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे. तसेच राणा अय्युब यांनी याच पैशातून ५० लाख रुपयांची एफडी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच ७४ लाख रुपये अय्युब यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंड मध्ये जमा केल्याचे सांगण्यात येत आहे.
राणा अय्युब यांच्याकडून आरोपांचे खंडन
क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म केट्टोवर पैसे कसे उभे केले आणि त्यानंतर कसे खर्च केले याचे तपशील मांडले आहेत. "माझ्यावर केलेले आरोप निराधार, भ्रामक आणि काल्पनिक आहेत. माझ्याद्वारे हाती घेतलेल्या मदत कार्यासंबंधातील सर्व बिले आणि पावत्या मी पुरवल्या आहेत.", असे राणा अय्युब यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
काही बिलं खोटी...
३१ लाख रुपये मदतीसाठी वाटण्यात आल्याचे राणा अय्युब यांनी सांगितले. पण त्यांनी प्रत्यक्षात १७ लाख रुपयांचीच बिलं दिली आहेत. त्यामुळे काही बिलं खोटी असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.