दर्जेदार शिक्षणासाठी धडपडणारा संतोष

    13-Feb-2022   
Total Views |

santosh
 
 
 
आजच्या युगात दर्जेदार शिक्षण काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आणि वडिलांची इच्छा म्हणून डोंबिवली पश्चिमेतील संतोष भोईर यांनी सेंट झेव्हीयर्स शाळेची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा आढावा...
 
 
 
संतोष भोईर डोंबिवली पश्चिमेतील जयहिंद कॉलनी परिसरात राहतात. त्यांचा जन्म डोंबिवलीत झाला. ‘स्वामी विवेकानंद विद्यालय’, ‘अरूणोदय’ या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्याकाळात डोंबिवलीत तीन ते चारच शाळा होत्या. इंग्रजी शाळेचे विशेष ‘फॅड’ही नव्हते. त्यामुळे वडिलांनी संतोष यांना मराठी माध्यमातूनच शिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी ‘डिप्लोमा’ करण्याचा निर्णय घेतला. ‘जोंधळे पॉलिटेक्निक महाविद्यालया’तून त्यांनी ‘डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतले. ‘डिप्लोमा’ करीत असताना त्यांनी उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये येण्याचादेखील मान मिळविला. त्यांनी पहिल्या वर्षाला असताना द्वितीय आणि दुसर्‍या वर्षाला तिसरा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत नाव झळकवले होते. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांनाप्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले आहे. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्यांनी ‘बीई सिव्हील’चे शिक्षण पनवेलजवळील ‘महात्मा गांधी मिशन’ महाविद्यालयातून पूर्ण केले. संतोष यांचे वडील नामदेव भोईर बांधकाम व्यवसायात होते. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संतोष यांनीदेखील सिव्हील अभियंता होण्याचे ‘करिअर’ निवडले. संतोष डोंबिवलीच्या मोठागावातील पहिले अभियंता होते. त्यामुळे त्यांचा सगळीकडे सत्कार होत होता. १९९९ ला संतोष यांनी ‘बीई सिव्हील इंजिनिअरिंग’ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नोकरीचा मार्ग स्वीकारला. सिव्हीलची थोडीफार कामेही ते करीत होते.
 
 
 
अंबरनाथ येथे त्यांनी काही काळ नोकरी केली. चार ते पाच वर्ष ते सिव्हिलची कामेदेखील करीत होते. संतोष यांचे वडील नामदेव यांची शैक्षणिक संस्था उभारावी अशी इच्छा होती. त्यांच्या वडिलांचा ‘डॉन बास्को शाळे’च्या उभारणीत मोलाचा वाटा होता. या पार्श्वभूमीवर संतोष यांनी स्वतः शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्धार पक्का केला. आगरी समाजात त्याकाळी फार कमी लोक उच्च शिक्षण घेत असत. त्याकाळात संतोष यांनी इंजिनियरींगचे शिक्षण घेतले. त्यामुळे संतोष यांचा विविध ठिकाणी सत्कार होत होता. आता संतोष यांच्या कुटुंबांतील अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. संतोष यांनी डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथे शाळेची मुहूर्तमेढ रोवली. शाळेसाठी जागा होती. पण इतर परवानगी मिळविणे गरजेचे होते. सर्व आवश्यक परवानग्या मिळविल्या आणि २००२ साली त्यांची ‘सेंट झेव्हियर्स’ ही शाळा खर्‍या अर्थाने सुरू झाली. सुरुवातीला फक्त २३ मुले शाळेत येत होती. हळूहळू शाळेचा पसारा वाढत होता. दर्जेदार शिक्षण देणे हे तत्त्व जोपासल्याने दर वर्षागणिक विद्यार्थी संख्या वाढत गेली. आता तिन्ही भाऊ मिळून शाळेचे कामकाज सांभाळत आहेत. संतोष आता शाळेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहेत. संतोष यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील ‘करिअर’ सोडून पूर्णपणे शाळेची जबाबदारी हाती घेतली आहे. आता या शाळेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात नाही. कमी शुल्कामध्ये जास्तीत जास्त ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ देण्याचा प्रयत्न केला जातो.
 
 
 
शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेला अनेक बक्षिसे मिळवून दिली आहेत. शाळेत आवश्यक सर्वसामान्य सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता शाळेच्या दोन इमारती आहेत. एका इमारतीत संपूर्ण प्राथमिक विभाग सुरू केला आहे आणि दुसर्‍या इमारतीत पहिली ते दहावीचे वर्ग भरतात. वाचनालय, संगणक कक्ष आहेत. शाळेत ७० शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकेतर कर्मचारीही आहेत. शाळेत दहा वर्षांपूर्वी दहावीच्या पहिल्या बॅचने परीक्षा दिली. दहावीचा शाळेचा निकालही चांगला लागतो. एकही विद्यार्थी अद्यापपर्यंत अनुत्तीर्ण झाला नाही. दहावीच्या बॅचमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी ९३ टक्क्यांच्यावर गुण मिळवित आले आहेत. नर्सरी ते दहावीपर्यंत ही शाळा आहे. कोरोनामुळे शाळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने सुरू होती. मात्र, आता कोरोनाचे नियम शिथील झाल्यानंतर शाळा ‘ऑफलाईन’ पद्धतीने सुरू झाली आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांची ‘ऑफलाईन’ शाळेसाठीची मानसिकता तयार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे त्यासाठी समुपदेशनदेखील केले होते. स्वत: अभियांत्रिकी पदवीधर असल्याने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘करिअर’ घडविण्यासाठी कसे प्रयत्न करावे, याचे धडे देणे सोपे जाते, असे संतोष भोईर यांना वाटते. मुलांना प्रोत्साहित करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो आहे. भोईर यांना वाचनाची आवड आहे. त्यांनी शैक्षणिक विषयावर भरपूर वाचन केले आहे. त्याचा उपयोग शाळेचे व्यवस्थापन चालवताना मोठ्या प्रमाणात होतो, असे ते आवर्जून सांगतात.
 
 
 
संतोष भोईर यांचे पूर्ण कुटुंब साईभक्त आहे. गेली २०हून अधिक वर्षे भोईर कुटुंबीय दरवर्षी भव्य साई भंडारा आयोजित करतात. ज्या भक्तांना शिर्डीला जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी साईबाबांच्या पादुकांची पालखी फिरवण्यात येते. डोंबिवलीतील शेकडो साईभक्त यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतात. संतोष यांचा आता महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे लवकरच सर्व सोईंनीयुक्त महाविद्यालयीन शिक्षणही या संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी धडपडणार्‍या संतोष भोईर यांना पुढील कारकिर्दीसाठी दै.‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.