मुस्लीम महिलांचे शत्रू!

    12-Feb-2022   
Total Views |

Hijab Karnataka
 
 
 
‘हिजाब’पेक्षा शिक्षणाचे महत्त्व शून्य सांगणारे हे कोण लोक आहेत? माझ्या मते हे सारे मुस्लीम महिलांचे शत्रू आहेत. त्यांना वाटते मुलीबाळी शिकल्या, तर त्या तर्कसुसंगत विचार करतील, विज्ञाननिष्ठ बनून मानवी हक्कांबद्दल आवाज उठवतील. समाजातील मुली शिकल्या, तर मग हे धर्म ‘जहन्नूम’, ‘दोजख’ वगैरेची भीती कुणाला दाखवतील? बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक, ‘हलाला’ आणि ‘खतना’ वगैरे रितीरीवाजांनी ते कुणाचे शोषण करतील? अर्थात, कोणत्याही समाजात महिलांचे शत्रू काही लोकच असतात. पण, हे काही लोक त्यांच्या दावणीला सगळा समाज बांधतात आणि बळी जातो तो निष्पाप मुलीमहिलांच्या भविष्याचा! १५ वर्षांत सामाजिक जीवनात मुस्लीम भगिनींशी माझा संपर्क संवाद आहे. त्यांची अनुभवलेली मानसिकता या लेखातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
कर्नाटकमधली ‘बुरखा घालूनच महाविद्यालयात जाणार’ असे म्हणणारी ‘ती’ तरुणी. तिचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला. त्यानंतर हिंदू मुलं आणि मुली यांचा घोळकाही सगळ्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाला. तसेच ही मुलगी केवळ महाविद्यालयात ‘स्टंट’ करण्यासाठी बुरखा घालून आली आणि इतरवेळी ती आधुनिक कपडे परिधान करते, असे फोटोही समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. हिला प्रसिद्धी आणि ‘उलेमा’सारख्या संस्थेकडून पाच लाख रुपयांची बिदागीही मिळाली. पण,माझ्या मते, ही मुलगी भारतातील गरिबाघरच्या मुस्लीम मुलींची गुन्हेगार आहे. कारण, तिच्यामुळे आता बहुसंख्य घरच्या मुस्लीम मुलींना बुरखा घालण्याची सक्ती होणार. तसेच ‘पहले हिजाब, फिर किताब’ची तालिबानी मानसिकता हलकेच मुस्लीम पालकांच्या डोक्यात उतरवण्याचा हा कट दिसतो. त्यामुळे तर आधीच मुलींच्या शिक्षणाच्याबाबतीत सगळा आनंदी आनंद असणार्‍या मुस्लीम समाजात मुलींनी शिकण्यापेक्षा बुरखा घालून घरात गपगुमान बसावं, ही मानसिकता बोकाळणारच! बुरखा घालून ‘स्टंट’ करणार्‍या या मुलींवर काही कट्टरतावादी ‘शेरनी’ वगैरे म्हणत आहेत. पण, ही तथाकथित ’शेरनी’ मुलींसाठी बुरखा, मग मुलांसाठी काय, हा प्रश्न अगदी तिच्या आईवडिलांनाही विचारू शकते का? तर नाही. पण, या मुलीचीही म्हणा त्यात काही चूक नाही. या मुलीलाच नव्हे, तर जगभरातील बहुसंख्य गरीब घरच्या मुस्लीम मुलींना ‘बुरख्यातच तुझा धर्म आहे’ असे सांगितले जाते. इस्लाम धर्माचा असा अपमान त्याच धर्माचे लोक करतात. मात्र, त्याला ‘अल्लाचा कानून’ वगैरे म्हणून तो विषय टाळला जातो.
 
 
 
गेल्या १५ वर्षांच्या सामाजिक जीवनात विविध प्रश्नांवर मुस्लीम भगिनी आणि बांधवांशी मी अगदी मनमोकळेपणे संवाद साधला. त्यावेळच्या घटना आजही मनावर कोरलेल्या आहेत. ‘तिहेरी तलाक’ विरोधी कायदा पारित झाला, तेव्हा मुंबईतील काही वस्त्यांमधील भगिनींशी संपर्क केला होता. कडेवर आणि हातात आजुबाजूला मूलच मूलं असलेल्या त्या महिला. त्यांना विचारले,“तिहोरी तलाकविरोधी कायदा झाला. तुम्हाला काय वाटते?” तर त्यांचे उत्तर होते ”अल्लाने तलाकचा हक्क मर्दला दिला आहे. अल्लाचा कायदा आहे. तो तोडून आम्हाला ‘जहन्नूम’ मिळावं म्हणून हा कायदा केला.” त्यांना म्हटले, “अरे पण तुम्हाला सुरक्षा मिळते ना? तुमचा नवरा तलाक म्हणून तुम्हाला आता सोडू शकत नाही.” यावर त्यांचे म्हणणे होते, ”आपकू क्या लगता बीबी को छोडने वास्ते मर्दे कोर्टकचेरी करेंगे। मुल्ला और जमात जो करेंगे वही होगा। और मुल्ला भी तो मर्द हैं। जमात भी तो मर्दोसे बनती हैं।” मला इतके सोपे माहिती नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या अल्पशिक्षित, रोजंदारीवर काम करणार्‍या मुलाबाळांचं लटांबर सांभाळत काम करणार्‍या महिलांचे म्हणणे एका अर्थी योग्यच होते. ‘मुल्ला भी तो मर्द हैं।’
 
 
 
म्हणूनच मग तिहेरी तलाक कायद्याविषयी मुस्लीम पुरूष मंडळींचे मत जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. त्यातल्या त्यात उच्चशिक्षित आणि पुरोगामी, अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज वगैरे उठवतात, अशी छबी असणार्‍या मुस्लीम समाजातील पुरूषमंडळींशी बोलण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर थेट म्हटले ‘नो कमेंट्स.’ काहींनी म्हटले, “आमच्या धर्मात ढवळाढवळ खपवून घेणार नाही,” तर काहींनी या कायद्याचे स्वागतही केले. पण, स्वागत केलेल्यांपैकी ९० जणांनी प्रतिक्रिया मात्र दिल्या नाहीत. “आमच्याशी या विषयावर चर्चा झाली आणि आम्ही या निर्णयाचे स्वागत करत आहोत हेसुद्धा तुम्ही कुणाला सांगू नका,” असे चक्क काकुळतीला येऊन ही पुरूषमंडळी सांगत होती. मी म्हणाले, “ठीक आहे, नाही सांगणार. पण, हे असे का?” तर त्यांचे म्हणणे, ”आम्हाला माहिती आहे हा कायदा आमच्या भल्यासाठी आहे. पण, आम्ही जमातच्या विरोधात जाऊ शकत नाही. ते अल्लाचा कायदा आहे म्हणतात. आम्ही त्याला विरोध केला, तर ते आम्हाला अल्लाचे विरोधक ठरवतील. मेल्यावर जहन्नूम मिळेल सांगतील. तो त्यांच्या बोलण्याने मिळणार नाही. पण, त्यांना आमचे मत कळले, तर आमची जिंदगी जहन्नूमपेक्षा पण वाईट होईल.” थोडक्यात, या महिला आणि पुरूषांना स्वत:ची वैयक्तिक मते काहीही असली तरी ती मांडण्याची निर्भयता आणि धीर मात्र त्यांच्यात नव्हता.
 
 
 
एकदा मी मुस्लीम समाजातील महिलांमधील ‘खतना’ पद्धती यावर लेख लिहिला. त्यावर प्रातिनिधिक छायाचित्रही ‘गुगल’वरुन साभार घेतले. लेख प्रकाशित झाल्यावर काही दिवसांनी मला मुस्लीम समाजातील एका मोठ्या संघटनेतील पदाधिकारी महिलेचा फोन आला. तिने इंग्रजीत संभाषणाला सुरुवात केली. तिचे म्हणणे, तुम्ही त्या लेखाचा संकेतस्थळावरील तो फोटो हटवा. कारण, त्यात जी मुलगी दाखवली होती आणि तिने जो बुरखा परिधान केला होता, तो मुस्लीम धर्मातील एका विशिष्ट समुदायातच घालतात. त्यामुळे म्हणे त्या समुदायाच्या भावना दुखावत होत्या. मी विचारले, “मग या समुदायात महिलांचा ‘खतना’ होत नाही का?” तर यावर तिचे म्हणणे ”मग काय झालं, माझाही ‘खतना’ झाला आहे आणि ते काही इतके वेदनादायी नसते. धर्म जपायचा तर रितीरिवाज जपायला पाहिजेत.” शेवटी फोटो हटवण्यावरून ती या मुद्द्यावर आली की, ”जे लोक मुलींंच्या ‘खतना’ पद्धतीबद्दल बोलतात ना, त्यांना मुस्लीम धर्माबद्दल आकस आहे म्हणूनच ते बोलतात. जर ही पद्धत वाईट असती, तर आम्ही बोललो नसतो का? धर्मासाठी थोडी वेदना सहन केले तर काय होते? तुमच्या राणी पद्मिनीने नाही का जोहर केलेला. ती पण जगू शकत होती. पण, मरण स्वीकारलं ना तिने? अगदी तसेच.” तिला म्हणाले, “राणी पद्मिनीची आणि या ‘खतना’मुळे वेदना होणार्‍या स्त्रीची कधीही तुलना होऊ शकत नाही.” तर तिचे म्हणणे, ”धर्मासाठी वेदना सहन कराव्या लागतात.” त्याग, बलिदान वगैरे वगैरेबद्दल मग ती तावातावाने माझ्याशी भांडू लागली. तिच्याशी चर्चा करून शेवटी माझ्या मनात एकच भाव उरला, ‘मर तुला मरायची हौस असेल तर...!’ पण, क्षणार्धात असेही वाटले, अरे देवा, इतक्या उच्चशिक्षित मुलीचे हे विचार? त्रास, वेदना वगैरेंचा संबंध धर्मबलिदान, त्याग असा तिला शिकवला गेला आहे. ती हे विचार जन्मजात घेऊन आली नसेल. तिच्या मनात, विचारात आणि रक्तात ज्या पद्धतीने हे सगळे रूजवले गेले, ती पद्धत किती पक्की आणि काटेकोर आहे.
 
 
 
पुढे तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला. तिथल्या महिलांचे दुदैवी व्हिडिओ पाहिले. त्यावर मुस्लीम महिलांचे मत काय असेल? त्यातल्या त्यात अतिउच्च शिक्षित आणि चप्पलपासून ते गॉगलपर्यंत ब्रॅण्डेड आधुनिक वस्तू, कपडे वापरणार्‍या श्रीमंत घरच्या युवतीस विचारले, तर तिचे म्हणणे ”सो सॅड. बिचार्‍या अफगाणी मुली. पण, तुम्हाला माहितीयं का हे सगळे अमेरिकेचे कारस्थान आहे. त्यांना अफगाणमधल्या मुस्लीम मुलींना त्रास द्यायचा होता, म्हणून त्यांनी अफगाणमधून सैन्य परत घेतले. अमेरिकेने सैन्य माघारी घेतले म्हणून तर तालिबानी सत्तेत आले ना?” तिला विचारले, “अगं पण तालिबानी त्या महिलांवर अत्याचार करतात. त्यांचा निषेध म्हणून काही बोलशील का? तर तिचे म्हणणे ’‘तालिबानी इज ऑफ्टरऑल मुस्लीम.’ मी कट्टर मुस्लीम असल्यामुळे मुस्लिमांविरोधात बोलू शकत नाही. यु नो मुस्लीम बद्ररहूड. मी ते स्ट्रिकली फॉलो करते.” तिला विचारले, “मुस्लीम सिस्टरहूड आहे का गं काही?” तर तिचे म्हणणे की, असे काही तिने ऐकलेले नाही, मदारशामध्ये असे शिकवले नाही. माझ्या माहितीप्रमाणे, तिने मुंबईतल्या नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेतले होते. तिला विचारले, “पण, तू तर कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली ना!” तर तिचे म्हणणे, “ते तर मजबुरी म्हणून शिकावे लागले. पण, खरे ज्ञान मिळाले ते मदरशामधूनच.” आजपर्यंत या युवतीचा पोशाख आणि राहणीमान यापेक्षा ती खूप वेगळे बोलत होती. मुंबईच्या मुस्लीम वस्त्यांमध्ये तालिबान्यांना ‘हिरो’ म्हणूनही दाखवण्याचे काम काही देशद्रोही मंडळी करणार, हे माहिती होतेच. त्यामुळे या वस्त्यांमध्ये तसेच साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या काही मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्या महिलांना, विचारवंतांना म्हटले, आपण या वस्त्यांमध्ये जाऊया. तालिबानी विचार कसे वाईट आहेत, यावर चर्चा-व्याख्यान असे उपक्रम करू. काहीच नाही, तर किमान तुम्हाला समाजात मान आहे. तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन किंवा मुंबईच्या ‘गेटवे ऑफ इंडिया’वर काळे झेंडे वगैरे घेऊन तालिबान्यांचा निषेध करू.
 
 
 
प्रसारमाध्यमात सर्वत्र यावर चर्चा करू. मात्र, त्यानंतर या महिलांशी अनेकदा संवाद साधूनही त्यांचा फोन ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिया’ लागत होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्यातल्या काहीजणी भेटल्या. त्यांना काय झाले म्हणून विचारणा केल्यावर त्यांचे म्हणणे, ”जाने दो यार, हमको फ्रंट मे नही आना हैं। ये टॉपिक छोडो।” हिंदू धर्मातील महिलांना शनीशिंगणापूर किंवा शबरीमलामध्ये प्रवेश असावा यासाठी माझ्याशी चर्चा करणार्‍या त्या (चर्चा यासाठी की, या विषयावर माझी सहमती असल्याने त्या वाद घालू शकल्या नाहीत!) आता एकदम गप्प होत्या आणि हो ‘पहले हिजाब, फिर किताब’ यावरही त्यांची काहीएक प्रतिक्रिया नाही. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी वगैरे मात्र निर्भिडपणे आपले विचार व्यक्त करतात, हे ही इथे प्रकर्षावे नमूद करायलाच हवे.
 
 
 
असो. मी जन्माने, कर्माने आणि विचाराने हिंदू आहे म्हणून आठवून आठवून हे सगळे प्रसंग लिहिले, असा गैरसमज कृपया कुणीही करू नये. कारण, मुलगी म्हणून, स्त्री म्हणून या सगळ्या मुली-महिलांच्या मनातही अल्लड, सुंदर स्वप्न असतात. आपल्यालाही मुक्त, स्वच्छंद आणि मनासारखे जगता यावे, असे त्यांनाही वाटते. पण, त्या काही करू शकत नाहीत. करायचे तर सोडाच, बोलूही शकत नाहीत. नेमके हे या भगिनींचे दुर्बलपण माणूस म्हणून मला अस्वस्थ करते. आपल्यावर अत्याचार, अन्याय होतोय किंवा रितीरिवाजांच्या नावावर शोषण होते, हे यातल्या कित्येक जणींच्या गावीही नाही. आपल्याला असेच जगायचे आहे, नव्हे, जगावे लागेल ही त्यांची मानसिकता आहे. या मानसिकतेच्या जोखडातून यांची सुटका कधी होणार? स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, ”स्त्रियांच्या प्रगतीबद्दल बोलणारा किंवा त्यांची प्रगती करणारा मी कोण? जोपर्यंत स्त्रियांना वाटत नाही आणि जोपर्यंत त्या स्वत:च स्वत:ची प्रगती करणार नाहीत, तोपर्यंत त्या प्रगत होणार नाहीत.”
 
 
 
हे सगळे लिहित असताना असेही वाटते की, हाथरस असो की, आणखी काही अत्याचार होतो, असे म्हणत डफली वाजवत गाणी म्हणणारी भारताचे तुकडे मोजू पाहणारी ती गँग, नक्षवाद्यांवर कारवाई झाल्यावर मानवता, मानवी हक्क वगैरे म्हणत पटापट आंदोलन करणारे, पुरस्कार परत करणारी ती गँग या मुस्लीम भगिनींच्या हक्कांबद्दल काही बोलणार की नाही? की त्यांच्या मतेही या मुस्लीम भगिनी माणूस नाहीत?
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.