मुंबई: महात्मा फुले मंडईच्या पुनर्विकासामुळे, तसेच कोरोना निर्बंध, वेळेचे बंधन यांमुळे मंडईतील गाळेधारकांना व्यवसाय करणेसुद्धा अवघड बनत असल्याची तक्रार समोर आली आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरातील महात्मा फुले मंडईचा पुनर्विकास सुरु असल्याने तेथील विक्रेत्यांना तात्पुरते डी. एन. रोडवरील वाहनतळाच्या जागेत तात्पुरते हलवण्यात आले आहे. पण या नव्या जागेत सामानाचे ट्रक, टेम्पो उभे करण्यासाठी , सामान उतरवून घेण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे हे ट्रक रस्त्यावर उभे करावे लागतात. या ट्रक्स, टेम्पो वर पालिकेच्या वाहतूक विभागाकडून कारवाई होते, दंड वसूल केला जातो यांमुळे हे सर्व विक्रेते त्रस्त झाले आहेत.
पालिकेने हे सामानाचे ट्रक्स उभे करण्यासाठी जागा दिली आहे पण ही या नव्या जागेच्या टोकाला असल्याने खूपच गैरसोयीची आहे. आधीच नवी जागा त्यात अशी गैरसोय, वाहतूक विभागाची कारवाई यांमुळे धंदा कसा करायचा हा प्रश्नच या विक्रेत्यांसमोर उभा राहिला आहे. "रस्त्यावर ट्रक, टेम्पो उभे केल्यामुळे होणाऱ्या कारवाईमुळे ट्रक, टेम्पो चालकसुद्धा हैराण झाले आहेत, गाळेधारकांकडे माळ कमी येत असल्याने ग्राहकांनी मंडईकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यवसाय रुळावर येईल असे वाटले होते पण हे नावेच संकट उभे राहिल्याने गाळेधारक हवालदिल झाले आहेत" असे महात्मा फुले मार्केट दुकानदार सेवा संस्था अध्यक्ष रत्नाकर कारले यांनी सांगितले.